त्वग्रंध्रे : (लॅ. स्टोमॅटा). वाहिनीवंत (पाणी किंवा अन्नरसाची ने–आण करणारे शरीरघटक असलेल्या) वनस्पतींच्या वायवी (हवेत वाढणाऱ्या) अवयवांच्या (विशेषतः पानांच्या) अपित्वचेत (सर्वांत बाहेरच्या त्वचेत) प्रामुख्याने आढळणाऱ्या सूक्ष्म छिद्रांना ‘त्वग्रंध्रे’ असे कित्येकदा म्हटले जाते तथापि ती छिद्रे व त्यांभोवतीच्या दोन रक्षक कोशिका–म्हणजे पेशी–(आणि कधीकधी आढळणाऱ्या दोन गौण कोशिका) यांचा अंतर्भाव त्वग्रंध्र या संज्ञेत करावा, अशी विचारसरणी सर्वमान्य आहे. कोवळ्या खोडावर आणि कित्येकदा पुष्पदलांवरही त्वग्रंध्रे आढळतात. मुळे, भूमिस्थित (जमिनीतील) अवयव व पाण्यात बुडालेले (निमग्न) भाग यांवर ती नसतात. काही बीजुककोशांवर (ऑफिओग्लॉसेसी) व बीजुकधारींवर (बीजुके निर्माण करणाऱ्या अलैंगिक पिढीवर) ती आढळतात. भरपूर सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या अनेक वनस्पतींच्या पानांवर फक्त खालच्या बाजूस व कधीकधी फक्त वरच्या बाजूसही (सावलीत वाढणाऱ्या वनस्पतींच्या पानांवर) ती असतात. तसेच काही पानांवर ती दोन्ही बाजूंस असतात. त्यांच्या संख्येचा पल्ला फार मोठा असतो दर चौ. सेंमी. मध्ये शून्यापासून ते एक लक्षापर्यंत ती असू शकतात. बहुधा रक्षक कोशिका अपित्वचेच्या इतर कोशिकांच्याच पातळीत असतात परंतु कधी त्या वरच्या पातळीवर आढळतात. मरुवनस्पतींत बहुधा त्या खाचेत असतात. बहुसंख्य वनस्पतींत त्यांचे स्वरूप मूत्रपिंडासारखे किंवा अर्धचंद्राकृती असून गवतांमध्ये डंबेलासारखे असते. त्याचे कोशिकावरण कमीजास्त जाडीचे असून कोशिकेत भरपूर प्राकल (जीवद्रव्य), मोठा प्रकल, हरित्कणू व स्टार्च असतात [⟶ कोशिका]. प्रत्येक रक्षक कोशिकेला चिकटून एकेक गौण कोशिका काहींत [⟶ गवते ग्रॅमिनी] आढळते. वनस्पतीबाहेरचे व वनस्पतीतील वातावरण छिद्रांमुळे परस्परांशी संबंधित राहिल्याने वायुविनिमय, श्वसन, बाष्पोच्छ्‌वास, ⇨ प्रकाशसंश्लेषण इ. प्रक्रिया विशेष सुलभ रीतीने चालू राहतात. रक्षक कोशिकांत प्रकाशसंश्लेषण, अन्ननिर्मिती चालू राहते. त्यामुळे व जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेमुळे रेणूंचे तुकडे होणे), संघटन इ. क्रियांमुळे अपित्वचा कोशिका व रक्षक कोशिका यांमध्ये स्फीततेचा (फुगीरपणाच्या बाबतीत) फरक पडतो. रक्षक कोशिकांतील पाण्याचा दाब कमी झाल्यास छिद्र बंद होते व तो भरपूर असल्यास ते उघडून बाष्परूप पाणी बाहेर येते. तापमान, प्रकाश, आर्दता इत्यादींचा या प्रक्रियेशी संबंध असतो. रक्षक कोशिका अपित्वचेच्या प्रारंभीच्या अवस्थेतील एका कोशिकेच्या विभागणीने बनतात जरूर तेथे गौण कोशिकाही तशाच बनतात.

‘अपित्वचा’ या नोंदीतील आकृती पहावी.

पहा : अपित्वचा ऑफिओग्लॉसेलीझ वनस्पति व पाणी.

परांडेकर, शं. आ.