येहोवा : ज्यू किंवा यहुदी लोकांचा देव. हिब्रू भाषेतील YHWH या शब्दाचा ख्रिश्चन लेखकांनी केलेला ‘येहोवा’ (इंग्लिश उच्चार ‘जिहोउव्ह’) हा उच्चार यहुदी धर्मियांना मान्य नाही. १५०० च्या सुमारास पोप लिओ दहावा याच्या लेखनात हा उच्चार प्रथम आढळतो. हिब्रू भाषेतील नियमाप्रमाणे या शब्दाचा उच्चार ‘इआहवे’असा आहे. बायबलमधील (जुना करार) ‘एक्सोडस’ ३ : १३–५ मध्ये देवाने इझ्रायली लोकांना दिलेले वचन ‘आय विल बी दॅट आय विल बी’ (यातील ‘दॅट’शब्द रोमन कॅपिटल अक्षरात आहे) असे लिहिले आहे. यावरून ‘येहोवा’ म्हणजे जो इतिहासक्रमात स्वतःला प्रगट करतो तो देव, अशी या शब्दाची व्युत्पत्ती लावली जाते.
सर्व पुरातन समाजांत ईश्वराची कल्पना मानवावर व साऱ्या विश्वावर अधिकार गाजविणारी कोणीतरी महान विभूती अशी आढळते. प्राचीन ज्यू समाजातही अशीच कल्पना होती. ⇨मोझेसच्या काळात ही कल्पना राष्ट्र व संस्कृती यांच्या ऐक्याला कारणीभूत झालेली आढळते. नंतर ज्यू द्रष्ट्यांनी येहोवाची ही कल्पना ज्यू समाजाच्या धर्म, नीती, संस्कृती यांची बैठक अधिक स्थिर करण्यासाठी वापरली. मोझेसला मिळालेल्या ‘दहा आज्ञा’ या येहोवाने सांगितल्या आहेत. त्यांचा भंग केला तर येहोवा शिक्षा करतो त्यांचे पालन केले, तर तो संतुष्ट होतो या गोष्टी येहोवाशी निगडित झालेल्या आढळतात. पुढे पुढे येहोवा हा स्वर्ग व पृथ्वी निर्माण करणारा देव म्हटला गेला. त्यांची सुस्थितीही तोच राखतो. या देवाचे अनेक देवदूत आहेत व हे देवदूत शुद्ध जीवन जगत असतात. येहोवा मानवजातीला नीती, सत्य व प्रेम या मार्गांनी जाण्याचा आदेश देतो. बायबलच्या नंतरच्या भागात याच येहोवाची येशूने साऱ्या मानवजातीचा पिता म्हणून ओळख करून दिली, असा विचार आढळतो. बायबलचा ‘जुना करार’व ‘नवा करार’ हे दोन भाग या बाबतीत वेगळ्या उद्दिष्टांनी लिहिलेले आहेत.
पहा : ज्यू धर्म बायबल.
संदर्भ : 1. Motyer, J. A. The Revelation of the Divine Name, London, 1959.
2. Porter, J. R. Ed. Proclamation and Presence, London, 1970.
माहुलकर, दि. द.