येना : पूर्व जर्मनीच्या गेरा जिल्ह्यातील झाले नदीवर वसलेले एक इतिहासप्रसिद्ध शहर. हे शहर नवव्या शतकात ज्ञात होते, पुढे तेराव्या शतकात त्याला सनद देण्यात आली. नेपोलियनने १४ ऑक्टोबर १८०६ रोजी येथेच प्रशियन सैन्याचा पराभव केला होता. ð येनाची लढाई ही इतिहासप्रसिद्ध आहे. येथील येना विद्यापीठ (स्था. १५५७-५८) हेही इतिहासप्रसिद्ध असून त्याचे विद्यमान नाव फ्रीड्रिख शिलर विद्यापीठ असे आहे. येथील चष्म्याच्या काचांचा प्रसिद्ध निर्मितीउद्योग १८४६ साली कार्ल त्साइस ह्या उद्योजकाने सुरू केला. काच आणि रासायनिक उद्योग हे या शहराच्या आर्थिक व्यवहाराचे आधारस्तंभ आहेत. तेराव्या शतकात हे शहर व्हेटिन या सरदार घराण्याच्या (दहावे ते पंधरावे शतक) ताब्यात होते. या घराण्याकडेच पुढे सॅक्सनीचे उमरावपद आले. विद्यापीठाच्या स्थापनेमागे येनाचा ल्यूथरपंथीय सॅक्सनीचा सरदार पहिला जॉन फ्रीड्रिख याची प्रेरणा होती मात्र विद्यापीठाची प्रत्यक्ष स्थापना त्याच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी झाली. जर्मन विचारप्रणालीतील उदारमतवादी शाखेचे केंद्र या विद्यापीठात होते. या विद्यापीठाच्या उत्कर्षकाळात (अठरावे व एकोणिसावे या शतकांचे अनुक्रमे उत्तरार्ध व पूर्वार्ध) जॉर्ज हेगेल, योहान फिक्टे, फ्रीड्रिख शेलिंग यांसारखे तत्त्वज्ञ, फ्रीड्रिख फोन शिलर यांसारखे कवी व नाटककार आणि फ्रीड्रिख फोन श्लेगेल यांसारखे लेखक-समीक्षक येथे अध्यापनकार्य करीत असत.
या शहरात विद्यापीठाची जुनी वास्तू, चौदाव्या शतकातील नगरभवन, अकराव्या शतकातील सेंट जॉन चर्च आणि सेंट मायकेल चर्च, त्साइस खगोलालय इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत.
क्षीरसागर, सुधा