यूरिप्टेरिडा : पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) संधिपाद संघातील नामशेष झालेले हे प्राणी क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. यांचे अवशेष सु. ४९ ते ४६ कोटी वर्षांपूर्वीच्या पूर्व ऑर्डोव्हिसियन खडकांत प्रथम आढळतात. पर्मियन काळात सु. २४·५ कोटी वर्षांपूर्वी यांचा अस्त झाला असावा. इतर संधिपाद प्राण्यांशी असलेले यांचे संबंध व यांचा क्रमविकास यांविषयी मतभेद आहेत, तरी पण यांचा सामवेश कीलिसेराटा उपसंघातील मेरोस्टोमॅटा या वर्गात केला जातो. ⇨ट्रायलोबाइट आणि ⇨ॲरॉकिनडा यांचे हे दूरचे नातेवाईक असावेत,असे यांच्या जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) वाटते. यांच्या शरीररचनेवरून हे मचूळ व गोड्या पाण्याच्या तळाशी राहत असावेत. यांची दहा कुले व सु. २०० जाती आहेत. यांच्या जीवाश्मांवरून यांची शरीररचना पुनर्रचित केली आहे. तीनुसार यांचा आकार विंचवासारखा लांबट असून शरीराच्या अग्रभागास शिरोवक्ष व पश्चभागास उदर असे म्हणतात. शरीराची लांबी काही जातींत ३० सेंमी. तर काहींत २०० सेंमी. इतकी असते. हे मांसाहारी असावेत. शिरोवक्षावर पृष्ठवर्माचे (पाठ झाकणाऱ्या कायटिनमय ढालीसारख्या संरचनेचे) आवरण असते. यावर मध्यस्थित अक्षिका [⟶ डोळा] असतात व बाजूस दोन मोठे संयुक्त नेत्र असतात. अग्रटोकाच्या मागे अधर (खालील) बाजूस तोंड असते. तोंडाच्या कडेस एक पट्टीका असते. हा भिन्नलिंगी प्राणी आहे.
सर्व यूरिप्टेरिडांच्या शिरोवक्षावर झिफोसूरा व ॲरॅक्निडा (विंचू) यांच्याप्रमाणे अधर भागावर उपांगाच्या (प्राण्यांच्या शरीराला जोडलेल्या इंद्रियांच्या) सहा जोड्या असतात. पहिल्या जोडीस नखरिका म्हणतात. या उपांगांचे आकार निरनिराळ्या जातींत त्यांच्या कार्यास योग्य असे असतात. यांचा पृष्ठभाग दंतुर असतो. यापुढच्या उपांगांच्या चार जोड्या पायांसारख्या वापरल्या जातात. त्यांपैकी पहिली जोडी स्पर्शग्राही इंद्रिय व दुसरी वस्तू पकडण्याचेही काम करते. पहिल्या पायास सहा सांधे, दुसऱ्यास व तिसऱ्यास सात, तर चौथ्यास आठ सांधे असतात. यानंतरच्या म्हणजे सहाव्या जोडीच्या उपांगांत खूपच परिवर्तन झालेले आढळते. याचा चालण्यास तसेच पोहण्यासही उपयोग होतो. नखर (नख्या) सोडून यास आठ सांधे असतात.
उदर बारा खंडांचे बनलेले असते. हे खंड दृढ नसतात त्यामुळे शरीरास लवचिकपणा येतो. बाराव्या खंडाच्या शेवटी एक काटा असतो. उदराचा आकार निरनिराळ्या जातींत वेगवेगळा असला, तरी सर्वसाधारणपणे ते विंचवासारखे असते. पृष्ठभागावर बारा पृष्ठक (झाकणासारख्या संरचनेचे भाग) असतात अधर भागावर मात्र असे अकराच अधरक असतात. पहिला अधरक शिरोवक्षाशी संलग्न झालेला असतो. दुसऱ्या अधरकापासून सहाव्यापर्यंत प्रत्येक अधरकावर क्लोमांची (कल्ल्यांची) एक जोडी असते. उदराच्या द्वितीय खंडाच्या दुसऱ्या पृष्ठकाखाली असणाऱ्या पहिल्या अधरकावर दोन्ही लिंगांत जननविषयक प्रच्छद (झाकण्यासारखी संरचना) असते आणि यावर जननउपांग व जननरंध्रही असते.
“