यूईस्मांस, झोरीस–कार्ल : (५ फेब्रुवारी १८४८ – १२ मे १९०७). फ्रेंच कादंबरीकार व कलासमीक्षक. त्याचे वडील डच होते आणि आई फ्रेंच होती. पॅरिसमध्येच तो जन्मला, शिकला आणि मुख्यत: पॅरिसमध्येच त्याचे वास्तव्य होते. तीस वर्षे तो फ्रान्सच्या सुरक्षा व गुप्तहेर संचालनालयात नोकरीस होता. ल द्राझ्वा ओझेपीस (१८७४) हे यूईस्मांसचे प्रसिद्ध झालेले पहिले पुस्तक. हा एक गद्यकाव्यसंग्रह असून त्यावर बोदलेअर ह्याचा प्रभाव दिसून येतो. पण त्याच्या कादंबऱ्या मात्र एमिल झोलाप्रणीत निसर्गवादी संप्रदायाच्या प्रभावाखाली लिहिल्या गेल्या आहेत. मार्थ इस्त्वार द्यून फीय (१८७६, इं. भा. मार्थ, १९५७), ले सर व्हातार (१८७९, इं. शी. व्हातार सिस्टर्स) आणि आं मेनाझ (१८८१) ह्या तीन कादंबऱ्या त्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. त्यानंतर मात्र यूईस्मांस निसर्गवादाच्या तांत्रिक आणि औपचारिक चौकटीतून बाहेर पडून आपले स्वतंत्र वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आपल्या लेखनातून प्रकर्षाने दर्शवू लागला. त्याची सर्वांत गाजलेली कादंबरी आ रबूर (१८४४, इं. भा. अगेन्स्ट द ग्रेन, १९२२) हिचा निर्देश त्या संदर्भात करावा लागेल. नित्याच्या जीवनाचा एकसुरीपणा आणि सामान्यपणा ह्यांच्यापासून दूर जाण्यासाठी नायकाने चालविलेले अटीतटीचे प्रयत्न ह्या कादंबरीत यूईस्मांसने प्रभावीपणे चित्रित केले आहेत. निसर्ग आणि समाज ह्यांच्या प्रवाहाविरुद्ध आपली कलाधारणा घेऊन जाणारा हा नायक आहे. वॉल्टर पेटरच्या सौंदर्यवादी संप्रदायाशी ह्या नायकाच्या विचारांचे काही नाते आहे, असे जाणवले, तरी ते दूरवरचे असून प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या ह्या नायकाच्या धडपडीमागे वेगळी धार्मिक – आध्यात्मिक मूल्ये शोधण्याचा सखोल व तळमळीचा प्रयत्न दिसून येतो, असे काही समीक्षकांचे मत आहे. यूईस्मांसच्या यानंतरच्या कादंबऱ्या लाबा (१८९१), आं रूत (१८९५), ला कातेद्राल (१८९८) आणि लोब्ला (१९०३) या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आहेत. त्यांचा नायक द्यूर्ताल ह्याचा सैतानवाद ते रोमन कॅथलिक प्रणालीचा स्वीकार हा आध्यात्मिक प्रगतीचा आलेख या कादंबऱ्यांमधून आलेला आहे. यूईस्मांसने स्वत: मानसिक अंतर्द्वंद्वानंतर रोमन कॅथलिक पंथाची दीक्षा घेतली होती. यांखेरीज त्याने लार मॉदॅर्न (१८८३), सॅर्‌तँ (१८८९) ही संस्कारवादी चित्रकारांच्या कलाकृतींचे रसग्रहण करणारी पुस्तकेही लिहिली आहेत. आधुनिक जीवनाचा आध्यात्मिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्याने आपल्या कादंबऱ्यांत आणि कलासमीक्षेतही केलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील फ्रान्समधील कलात्मक आणि बौद्धिक जीवनाचे प्रतिबिंब यूईस्मांसच्या कादंबऱ्यांत पडले आहे, असेही दिसून येते.

पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Baldick, Robert, The Life of Joko Huysmans, New York, 1955.

2. Ridge, George Ross, Joris Karl Huysmans, New York, 1968.

कळमकर, य. शं.