युफ्रेटीस : पश्चिम आशियातील सर्वांत लांब नदी. लांबी २,७०० किमी. नदीचे अल्‌-फरात हे अरबी, तर फिरात किंवा फ्रात हे तुर्की नाव आहे. तुर्कस्तानच्या मध्यपूर्व भागाच्या प्रदेशातील पर्वतीय कारास्यू (पश्चिम युफ्रेटीस) व मुरात्स्यू (पूर्व युफ्रेटीस) या शीर्षप्रवाहांच्या एलाझ येथील संगमापासूनच्या पुढील संयुक्त प्रवाहास युफ्रेटीस असे संबोधले जाते. तुर्कस्तानातून युफ्रेटीस प्रथम दक्षिणेस सिरियाकडे, त्यानंतर सिरिया व इराक या देशांतून आग्नेयीस वाहत जाऊन बसऱ्याच्या वरच्या बाजूस कुर्ना येथे ती टायग्रिसला मिळते. तेथून त्यांचा संयुक्त प्रवाह शट अल्‌ अरब या नावाने ओळखला जात असून त्याच नावाने तो इराणच्या आखाताला मिळतो. नदीचे ४०% खोरे तुर्कस्तानात, १५% सिरियात व बाकीचे इराकमध्ये आहे.

भरपूर पर्जन्य व हिमवृष्टी होणाऱ्या आर्मेनियन पठारी प्रदेशात नदीचे शीर्षप्रवाह आहेत. शीर्षप्रवाह वेगवान व भरपूर पाण्याचे असून त्यांनी उगमाकडील उच्चभूमीच्या प्रदेशात खोल कॅन्यन व घळ्या यांची निर्मिती केलेली आहे. कारास्यू नदी सस.पासून २,६२० मी. उंचीवर, तर मुरातस्यू नदी सस. पासून ३,५०० मी. उंचीवर उगम पावते. त्यामुळे या दोन्ही नद्यांचे ढाळमान जास्त आहे. कारास्यू व मुरातस्यू या दोन्ही नद्या पूर्व तुर्कस्तानातून नैर्ऋत्य दिशेत एकमेकींना साधारण समांतर वाहत जातात. पुढे मात्र कारास्यू नदी एक मोठे वळण घेऊन आग्नेयवाहिनी होते व एलाझ शहराजवळ मुरातस्यू नदीला येऊन मिळते. केबान या ठिकाणाजवळील एका खोल घळईवर या नदीवर केबान धरण बांधण्यात आलेले आहे (१९७४).

जेराब्ल्यूस येथे युफ्रेटीस तुर्कस्तानातून सिरियात प्रवेश करते. तेथे ती प्रथम सिरियाच्या उत्तर-मध्य भागातून दक्षिणेकडे वाहू लागते त्यानंतर आग्नेयवाहिनी होऊन सिरियाच्या पूर्व भागाकडे वाहात जाते. या वळणाच्या भागातच मेडिनेत अल्‌ शाब (ताबाका) येथे युफ्रेटीसवर रशियाच्या मदतीने ७० मी. उंचीचे धरण बांधण्यात आले असून त्यामुळे निर्माण झालेल्या ८० किमी. लांबीच्या सरोवरामुळे सिरियातील ६,०७,००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या धरणाची जलविद्युत्‌निर्मितीक्षमता १,०७० मेवॉ. आहे. मध्यपूर्वेतील सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असून त्याचे विस्तार कार्य अजून चालू आहे. धरणाच्या खालच्या बाजूस बलीक व खाबूर या दोन प्रमुख उपनद्या युफ्रेटीसला येऊन मिळतात. सिरियाच्या डोंगराळ व मैदानी प्रदेशातून वाहू लागल्यावर नदीतील पाण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसते. नदीचा दुसरा टप्पा सिरियात येत असून तेथे विस्तृत पूरमैदाने तयार झालेली आहेत. येथे नदीचा जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

ॲबू केमॅल येथे युफ्रेटीस इराकमध्ये प्रवेश करते व इराकच्या मध्य भागातून टायग्रिसच्या पश्चिमेकडून तिच्याशी काहीशी समांतर आग्नेय दिशेत वाहत जाते व बसऱ्याच्या उत्तरेस टायग्रिसला मिळते. सिरियाच्या वाळवंटातून व इराकच्या मैदानातून वाहताना नदीचा वेग एकदम मंदावलेला असतो. उत्तर इराकमध्ये काही ठिकाणी बेटांची निर्मिती झालेली असून त्यांपैकी काहींवर प्राचीन किल्ल्यांचे अवशेष आढळतात. ॲबू केमॅल ते हिट यांदरम्यानच्या नदीप्रवाहात दोन बेटे तयार झाली असून त्यांवर अनुक्रमे ॲना व रावा ही दोन छोटी नगरे आहेत. हिटच्या दक्षिणेस नदीचा मोठ्या प्रमाणावर जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. रामादीच्या दक्षिणेस एका खोलगट भागात हॅब्बानीया नावाचे सरोवर निर्माण झाले असून त्याच्या तिन्ही बाजूंनी कमी उंचीच्या टेकड्या आहेत. येथील जलसाठवण आणि पूरनियंत्रक हॅब्बानीया सरोवर द्वारक बंधारा बांधून नदीतील पुराची तीव्रता कमी करण्यात आली असून त्याचा पाणी टंचाई काळात जलसिंचनासाठी उपयोग करून घेतलेला आहे. रामादी ते हिंदीया यांदरम्यानच्या २२५ किमी. लांबीच्या नदीप्रवाहापासून अनेक कालवे काढण्यात आलेले आहेत. इराकमधील मुसायिबाच्या दक्षिणेस युफ्रेटीस नदी हिंदीया व हिल्ला या दोन मुख्य शाखांत विभागली असून अगदी अलीकडच्या काळापर्यंत या दोन्ही शाखा सारख्याच महत्त्वाच्या होत्या. परंतु हिल्ला शाखेतील पाण्याचे नियमन करण्यासाठी आणि कालवे काढण्यासाठी हिंदीया हा जलसिंचन पूरनियंत्रक बंधारा बांधण्यात आला (१९०८). त्यामुळे हिंदीया ही प्रमुख नदीशाखा बनली. तसेच या बंधाऱ्यामुळे हिल्ला शाखा कोरडी पडण्याचा धोका टाळता आला. टायग्रिसला मिळण्यापूर्वी युफ्रेटीसला अनेक फाटे फुटलेले दिसतात. या भागात दलदलीचे प्रदेश व सरोवरे निर्माण झाली आहेत. सॅमॅवापासून खालचा प्रदेश अस्थिर व विशेष दलदलीचा आहे. नासिरियाच्या पुढील लेक हामार या विस्तृत सरोवराच्या जलाशय भागातून नदी पूर्वेस टायग्रिसला मिळावयास जाते. टायग्रिस नदीकाठावरील कूट येथून निघणारा गाराफ कालवा दक्षिणेस युफ्रेटीसला येऊन मिळतो. त्यामुळे या कालव्याने टायग्रिस-युफ्रेटीस या दोन्ही नद्या एकमेकींना जोडल्या गेल्या आहेत.

टायग्रिस-युफ्रेटीस यांच्या संगमानंतरचा संयुक्त प्रवाह शट अल्‌ अरब या नावाने ओळखला जात असून, त्याच नावाने तो इराणच्या आखाताला मिळतो. उत्तरेकडून इराणच्या खुझिस्तान विभागाकडून वाहत येणारी कारून नदी खुर्रामशहराजवळ शट अल्‌ अरबला मिळते. एका करारानुसार येथपासून समुद्रापर्यंतचा शट अल्‌ अरब नदीप्रवाहाचा जलवाहतुकीस उपयोग करण्याचा समान हक्क इराक व इराण या दोन्ही देशांना देण्यात आलेला आहे. नदीच्या उजव्या तीरावरील बसरा हे इराकचे, तर डाव्या तीरावरील खुर्रामशहर हे इराणचे प्रमुख बंदर आहे. याशिवाय आबादान (इराण) व अल्‌ फाऊ (इराक) ही शट अल्‌ अरब नदीवरील प्रमुख बंदरे आहेत. सिरियातील अर्‌ राका, दाइर अझ झॉर, मेयॅडीन व ॲबू केमॅल, तर इराकमधील हिट, रामादी, हिल्ला, सॅमॅवा, नासिरिया व बसरा ही युफ्रेटीसच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.

युफ्रेटीस व टायग्रिस यांच्यामधील सुपीक जमिनीचा मेसोपोटेमिया प्रदेश म्हणजे मध्यपूर्व आशियातील अनेक प्राचीन संस्कृतींचे आरंभस्थान असून सुमेरिया, बॅबिलोनिया व ॲसिरिया ही प्राचीन राज्येही या भागात होती. सिपार, ईरेक, अर व बॅबिलन या प्राचीन संस्कृतींच्या वैभवाच्या काळात या नदीच्या तिसऱ्या टप्प्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात असे. त्यामुळे त्या काळी या दोन्ही नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. प्राचीन काळाप्रमाणेच आधुनिक काळातही या नदीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. अनेक प्राचीन अवशेष या खोऱ्यात पहावयास मिळतात. पूर्वी भारत, इराणचे आखात ते भूमध्य समुद्र यांदरम्यानचा व्यापार युफ्रेटीसच्या उजव्या तीरावरून चालत असे तसेच युफ्रेटीस ही ॲसिरियन व हिटाइट साम्राज्यांच्या दरम्यानची सरहद्द होती.

नदीखोऱ्याच्या वरच्या टप्प्यात हिवाळ्यात होणारा पर्जन्य व हिमवृष्टी यांपासून नोव्हेंबर ते मार्च या काळात, तर वसंत ऋतूत प्रामुख्याने एप्रिल-मे महिन्यात बर्फ वितळून नदीला पूर येतात. पर्जन्यापासून येणारे पूर अनिश्चित स्वरूपाचे असतात. मात्र बर्फ वितळून येणारे पूर निश्चित व महत्त्वपूर्ण असतात. जून महिन्यात नदीतील पाण्याचे प्रमाण कमी होते. वरच्या टप्प्यातील सरासरी पर्जन्यमान ५१ सेंमी. असून सिरिया व इराक यांमध्ये ते २५ सेंमी. पेक्षाही कमी आहे. नदीचा मधला व खालचा हे दोन टप्पे ओसाड व निमओसाड स्वरूपाचे आहेत. शेती हा युफ्रेटीसच्या खोऱ्यातील मुख्य व्यवसाय आहे. ॲनाच्या उत्तरेस द्राक्षे, ऑलिव्ह, तंबाखू व समशीतोष्ण कटिबंधीय फळांचे उत्पादन घेतले जाते. येथे महत्त्वाचे कालवे नसून त्यांऐवजी उद्धरण सिंचन पद्धतीचा अवलंब अधिककरून केला जातो. याउलट दक्षिण भागात वेगवेगळ्या जलसिंचन पद्धतींचा अवलंब करून गहू, सातू, बारीक तृणधान्ये, तांदूळ, खजूर ही कृषिउत्पादने घेतली जातात. खोऱ्यात ताडीचीही झाडे बरीच आढळतात. नदीने वाहून आणलेल्या गाळाचे मेसोपोटेमियन मैदानात संचयन होऊन तेथे कृषियोग्य सुपीक जमीन तयार झाली आहे. उष्ण उन्हाळे व बेताचा पाऊस यांमुळे मैदानी प्रदेशातील शेती नदीपासून केलेल्या जलसिंचनावरच अवलंबून असते. मात्र कोरड्या हवामानामुळे जलसिंचित भागावरील पाणी बाष्पीभवनाने चटकन आटून जात असल्याने तेथील जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने जमीन निरुपयोगी बनत जाते. नदीखोऱ्यातील गवताळ प्रदेशांत पशुपालन व्यवसाय चालतो. शट अल्‌ अरब नदीकाठावरील ५ किमी. पर्यंतचीच पट्टी शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची असून वसाहतीही तेवढ्याच भागापुरत्या मर्यादित आहेत. युफ्रेटीसचा खालचा टप्पा व शट अल्‌ अरब खोरे खजूर उत्पादनासाठी जगात अग्रेसर असून येथून जगभर खजुराची निर्यात केली जाते. जलवाहतुकीच्या दृष्टीने मात्र ही नदी विशेष महत्त्वाची नाही.

चौधरी, वसंत.