युद्धनौका : नाविक युद्धात प्रत्यक्ष लढण्यासाठी किंवा लढाईला साहाय्यक होईल, अशा हेतूने मुद्दाम बांधलेल्या नौका म्हणजे युद्धनौका होय. लढाऊ आणि बिगरलढाऊ असे युद्धनौकांचे दोन ठोकळ वर्ग असतात. नाविक लढायांतील विशिष्ट कार्य रणनौका, ⇨क्रूझर, ⇨फ्रिगेट, ⇨विनाशिका, गस्ती ⇨पाणबुडी, मोटार-नौका, ⇨सुरुंग निक्षेपक व संमार्जक, विमानवाहक इ. प्रकारच्या युद्धनौका पार पाडतात. याखेरीज संयुक्त कारवाई [⟶ संयुक्त सेनाकारवाई], दुरुस्ती व क्षमता-विकास असेही युद्धनौकांचे वेगळे विभाग असतात. युद्धनौकांचा भांडवली व परिरक्षा खर्च लक्षात घेऊन सामान्यतः बहुउद्देशीय व बहुकामी युद्धनौका बांधणे क्रमप्राप्त ठरते. उदा., सैनिक, माल, रणगाडा व हेलिकॉप्टर वाहून नेणे इत्यादी. युद्धनौकांचा इतिहास सु. ४,५०० वर्षांचा असून तो प्रामुख्याने ग्रेट ब्रिटन, फ्रान्स व हॉलंड या सागरी-व्यापारी व वसाहतवादी यूरोपीय राष्ट्रांशी निगडित आहे. भारतासारख्या काही आशियाई राष्ट्रांना भरपूर सागरी किनारा असूनही ती सागरी पर्यटन करू शकणाऱ्या युद्धनौका बांधण्यात असमर्थ ठरली कारण तेथील राज्यकर्त्यांची दृष्टी भू-राज्य विस्ताराकडे असे. सातवाहन व चोल राजांनी सागरी व्यापार व देशाबाहेर वसाहती केल्या पण त्यांना सागरी क्षेत्रावर इतरांशी चढाओढ करावी लागली नाही. नौकांचा जागतिक व भारतातील इतिहास जिज्ञासूंना नौका या नोंदीत पहावयास मिळेल.
पुढे चौदाव्या शतकात स्फोटक दारूचा शोध लागल्यावर, नौकांवर तोफा वापरणे सुरू झाले मात्र त्या युद्धनौका नव्हत्या. व्यापारी नौकांमध्ये तोफा बसवीत. पंधराव्या शतकात एकसंधी काशाच्या तोफांचा शोध लागला नौका-तोफांतून तीस किग्रॅ. वजनाचे लोखंडी तोफ-गोळे डागता येऊ लागले व नौकांना बुडवून टाकणे शक्य झाले. पंधराव्या शतकातच शिडांच्या नौका प्रचारात आल्या. व्यापारी नौकांचाच लढाईकरिताही वापर केला जाई. अठराव्या शतकात तोफा, गोळाबारूद, शिडे व त्यांची अवजारे यांच्यात नवे शोध लागले त्यामुळे नौकांवर जास्तीत जास्त तोफा ठेवणे क्रमप्राप्त झाले. परिणामतः नौकांचे व्यापारी आणि युद्ध असे दोन स्वतंत्र वर्ग पडले. सागरी व्यापार हा राजकीय विषय झाल्याने युद्धनौका राष्ट्रीय महत्त्वाच्या ठरल्या. हजार टनांच्या १०० तोफा असलेल्या लाकडी नौका ब्रिटनमध्ये बांधण्यात येऊ लागल्या. साहजिकच जल- आलेखन, द्रव अभियांत्रिकी, सागरविज्ञान, नकाशाविद्या, नौका-शिल्प, गोद्या-बंदरे यांच्यात नवे शोध लागले आणि प्रगती झाली. [⟶ जहाजबांधणी बंदरे]. अठराव्या शतकात नौकाया-तळावर तांब्याचे कवच चढविण्याच्या शोधामुळे नौकांचा वेग व पर्यटनकाल यांत वाढ झाली. फ्रिगेट ही वेगवान युद्धनौका प्रचारात आली. एकोणिसाव्या शतकातील नौकाविकासाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत : (१) वाफेची एंजिने आल्याने शिडांचा लोप झाला. (२) मळसूत्र परिचालक व त्यामुळे वेगवृद्धी (१८४३−५०) झाली. (३) तोफांची विध्वंसक क्षमता वाढल्याने लाकडी नौकांवर लोखंडी कवच घालणे आवश्यक ठरले. (४) ब्रिटिश लाकडी युद्धनौकांचा विध्वंस करण्यासाठी एका फ्रेंच तोफतज्ञाने स्फोटक तोफ-गोळ्यांचा शोध लावला व १८३७ मध्ये स्फोटक तोफगोळे मारू शकणाऱ्या तोफा रूढ झाल्या. (५) १८५७ मध्ये लोखंडी चिलखती नौका व तरता तोफखाना (बॅटरी तोफा) निर्माण करण्यात आला आणि १८७० मध्ये नौकावर चक्री मनोऱ्याच्या तोफा बसविणे सुरू झाले. (६) १८५५ मध्ये रशियात तरत्या पाणसुरुंगाचा शोध लागला. १८६३ साली पाणबुडी व ⇨पाणतीर यांचा शोध लागला. १८७५ मध्ये ब्रिटनमध्ये ३५ टनी चक्री मनोऱ्याच्या चार तोफा व १५ नॉट वेगाची ९,३३० टनी युद्धनौका बांधण्यात आली. १८७० सालानंतर पोलादी चिलखती पत्रे उपलब्ध होऊ लागले. नौकांच्या चिलखताची जाडी ६० सेंमी. पर्यंत वाढली. एकोणिसाव्या शतकाअखेर १५,००० टनी, ३२५ मिमी. कॅलिबर तोफा आणि १८ नॉट वेगाच्या युद्धनौका प्रचारात आल्या. यात ब्रिटन आघाडीवर होते. ब्रिटिश नौसेनेच्या दहा ३०० मिमी. तोफायुक्त ड्रेड-नॉट युद्धनौका जागतिक आदर्श ठरल्या. पाणबुड्यांतही नेत्रदीपक प्रगती झाली.
दुसऱ्या महायुद्धात जपानने यामाटो वर्गाच्या ७०,००० टनी ४७० मिमी. कॅलिबर तोफा असलेल्या रणनौका वापरल्या. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन, अमेरिका, जपान व जर्मनी यांच्याकडे विविध प्रकारच्या भारी व हलक्या युद्धनौका होत्या. याच महायुद्धात विमानवाहक युद्धनौकांनी बहुमोल कार्य केले. १९४५ नंतर आण्विक शक्तीचा वापर नौकांच्या चालनाकरिता होऊ लागला आहे. यात अमेरिका व रशिया अग्रेसर आहेत.
पहा : नौसेना युद्ध व युद्धप्रक्रिया लढाऊ विमाने वायुसेना शस्त्रसंभार क्षेपणास्त्रे.
संदर्भ : 1. Apte, B. K. A History of the Maratha Navy and Merchantships, Bombay, 1973.
2. Blackman, R. V. B. Jane’s Fighting Ships.
3. Hough, Richard, Fighting Ships, London, 1969.
4. Howard, Michel, War in European History, London, 1976.
5. Montgomery, Robert, A History of Warfare, London, 1968.
दीक्षित, हे. वि.
“