युग : काळानुसार बदलणाऱ्या मानवादींच्या अवस्था, विशिष्ट कालखंड, कालपरिमाण इ. दर्शविण्यासाठी जगातील विविध संस्कृतींमध्ये वापरली जाणारी कालगणनेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. भारतात युग ही संज्ञा घटनांच्या काळाचा बोध करून देण्यासाठी वापरली जात असली, तरी या बाबतीत ती फारशी उपयुक्त ठरत नाही. कारण, पुराणकथात्मक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही प्रकारच्या घटनांचे वर्णन करताना युग ही एकच संज्ञा वापरण्यात आली आहे युग या संज्ञेने नेमका किती वर्षांचा कालावधी सूचित होतो, याविषयी अनिश्चितता आहे काळाच्या ओघात या संज्ञेचा अर्थ बदलत गेला आहे तसेच, पुराणांच्या अतिशयोक्ती करण्याच्या प्रवृत्तीमुळेही अर्थबोधात अडचण निर्माण झाली आहे. तथापि, के. ल. दप्तरींसारख्या संशोधकांनी आपल्या संशोधनाद्वारे वरील अडचणींवर मात करून या क्षेत्रात बरीच सुसंगती आणली आहे.

हिंदू पुराणकथांनी [⟶ पुराणकथा] कालक्रम दर्शविण्यासाठी कृत, त्रेता, द्वापर व कली अशी चार युगे मानली आहेत. कलियुगातनंतर पुन्हा नव्याने कृतादी युगांचा क्रम सुरू होतो. ही चक्राकार कालगती अनादिकाळापासून चालत आली असून अनंतकाळपर्यंत चालणार आहे. दिवस-रात्र, चंद्राचा क्षय व वृद्धी, ऋतुचक्र, वर्तमानाविषयीचे वैफल्य व भविष्याविषयीचा आशावाद इत्यादींच्या प्रभावातून चक्राकार कालगतीची संकल्पना निर्माण झाली असे दिसते. सरळरेषेतील कालगती न स्वीकारता चक्राकार कालगतीची संकल्पना स्वीकारणे, हे कालविषयक भारतीय (व ग्रीक) पुराणाकथांचे एक खास वैशिष्ट्य होय.

प्रत्येक युगाच्या मुख्य कालखंडापूर्वी संध्या आणि नंतर संध्येइतकाच संध्यांश असे कालखंड असतात. संध्येचा कालखंड मुख्य कालखंडाच्या एकदशांश इतका असतो. कलियुगाचा मुख्य कालखंड १,००० दिव्य वर्षांचा म्हणजेच एकूण कालखंड १,२०० दिव्य वर्षांचा असतो. द्वापर, त्रेता व कृत यांचा कालखंड कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट व चौपट असतो. त्या तीन शब्दांचे अर्थ अनुक्रमे दोन, तीन व चार (कृत = चार) या संख्येशी निगडित आहेत, यावरूनही हे स्पष्ट होते. युगांच्या नावांचा द्यूतातील फाशांशी असलेला संबंधही हेच दर्शवितो. या फाशाच्या चार बाजूंपैकी एकीवर एक, दुसरीवर दोन, तिसरीवर तीन व चौथीवर चार ठिपके असतात आणि त्यांना अनुक्रमे कली, द्वापर, त्रेता व कृत अशी नावे असतात. कृतादी चार युगांचे मिळून एक महायुग बनते. त्याचा कालावधी १२ हजार दिव्य वर्षे होतो. एक दिव्य वर्ष म्हणजे मानवाची ३६० वर्षे असल्यामुळे तो कालावधी ४३ लक्ष २० हजार मानवी वर्ष इतका होतो. चार युगांचा कालावधी समान नसतो परंतु सर्व महायुगांचा कालावधी मात्र समान असतो. त्यामुळे युग हा मुख्यत्वे विशिष्ट कालखंड दर्शविणारा, तर महायुग हा कालपरिमाण दर्शविणारा शब्द ठरतो. आर्यभट्टाने मात्र सर्व युगांचा कालावधी समान मानला आहे. एक हजार महायुगांनी बनणाऱ्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसास ⇨कल्प असे म्हणतात. या कल्पाची विभागणी १४ मन्वंतरांमध्ये करण्यात आली आहे. सध्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा द्वितीय परार्ध (बहुधा एक्कावनावे वर्ष) त्या वर्षाच्या कोणत्या तरी महिन्यातील श्वेतवाराह नावाचा बहुधा सव्वीसावा कल्प, वैवस्वत नावाचे सातवे मन्वंतर आणि त्यातील अठ्ठाविसावे कलियुग चालू आहे. या कलियुगाचा प्रारंभ महाभारताचे युद्ध, कृष्णाचे निजधामास जाणे, परीक्षिताचा जन्म वा राज्यारोहण इ. प्रसंगांशी जोडला जातो. हे युग इ. स. पू. ३१०२ मध्ये १७ व १८ फेब्रुवारी या दिवसांना जोडणाऱ्या मध्यरात्री सुरू झाले, असे मानले जाते. विष्णूचा ⇨कल्की अवतार संपेल, तेव्हा हे युग संपून नवे कृतयुग सुरू होईल.

युगाच्या कालावधीप्रमाणे मानवाचे आयुर्मान, धर्म, तेज, सामर्थ्य, सद्‌गुण इ. विविध बाबतीत आधी − आधीच्या युगांपेक्षा नंतर−नंतरच्या युगांमध्ये क्रमशः ऱ्हास झाल्याचे आढळते. उदा., मानवाचे आयुर्मान १ लाख, १० हजार, १ हजार व शंभर वर्षे अथवा ४००, ३००, २०० व १०० वर्षे, असे कमी होत जाते. सत्य वा ब्रह्म या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कृतयुगात पूर्ण वा चतुष्पाद धर्म व शून्य अधर्म, अशी स्थिती असते. पुढील युगांतून धर्म क्रमशः /, // असा उरतो आणि अधर्म वाढत जातो.

पुराणांनी युगांच्या विविध वैशिष्ट्यांची भरपूर वर्णने केली आहेत. उदा., कलियुगाच्या अंती लोप पावलेल्या वेदांचा उद्धार करण्यासाठी कृतयुगाच्या प्रारंभी सप्तर्षी स्वर्गातून पृथ्वीवर येतात तसेच, स्मृतिकार मनूही जन्मतो. कृतयुगात हंस नावाची माणसांची एकच जात असते. त्रेतायुगात चातुर्वर्ण्याला प्रारंभ होतो. कलियुग हे अनेक दोषांनी युक्त असले तरी नामजप हे मोक्षाचे सोपे साधन या युगात उपलब्ध असते. समुद्रपर्यटन, नरमेध, नियोग इ. गोष्टी काही स्मृतिकारांनी कलिवर्ज्य मानल्या आहेत. वायुपुराणाच्या मते चार युगे ही कालाची चार मुखे होत. कृतादियुगांच्या प्रारंभतिथी अनुक्रमे वैशाख शु. तृतीया, कार्तिक शु. नवमी, भाद्र. व. त्रयोदशी आणि माघी पौर्णिमा वा अमावस्या या होत. या युगांचा अंत सूर्य अनुक्रमे सिंह, वृश्चिक, वृषभ व कुंभ राशीत असताना झाला. या तिथींना व वेळांना श्राद्ध केले तर ते अक्षय ठरते.

ऋग्वेदापासूनच (१०·७२·२ ५·५२·४) दैवयुग व मानुषयुग अशा दोन पद्धती रूढ होत्या परंतु पुढे त्यांच्या भिन्नतेची जाणीव राहिली नाही आणि मानुष पद्धतीने सांगितलेल्या इतिहासास दैवी पद्धत लावल्यामुळे घोटाळा झाला ज्योतिषात ग्रहगती सांगताना आणि तत्त्वज्ञानात जगदुत्पत्तिलय सांगताना दैवयुगांचा आणि इतिहासात मानुषयुगाचा उपयोग केला जात होता पुराणांना मानुष पद्धती लावली असता भारतीयांचा फार सुसंगत इतिहास पुराणातून मिळतो १, ४, ५, १०० वा १,००० अशा वर्षांची अनेक प्रकारची युगे पूर्वी माहीत असावीत पूर्वी चार वर्षांचेच युग चालू होते परंतु चंद्रसूर्य गतींचा मेळ घालण्यासाठी वेदांगज्योतिषाने (इ. स. पू. सु. १४००) पाच वर्षांचे युग योजिले इ. मते दप्तरींनी मांडली आहेत.

बौद्ध धर्मानुसार युगांचा क्रम कलियुग ते कृतयुग व पुन्हा कृतयुग ते कलियुग असा असल्यामुळे महायुगात आठ युगे असतात. जैन धर्मानुसार काल हे बारा आऱ्याचे म्हणजे युगांचे एक चक्र असून त्या चक्राच्या उतरत्या भागाला अवसर्पिणी व चढत्या भागाला उत्सर्पिणी म्हणतात. अवसर्पिणीत येणारी सहा युगेच उलट्या क्रमाने उत्सर्पिणीत येतात.

अमरत्व वा दीर्घायुष्य, ईश्वरसान्निध्य, सुखातिशय, अधर्माचा व दुर्गुणांचा अभाव इत्यादींनी युक्त असलेले पूर्वीचे सुवर्णयुग आता उरले नाही, अशा अर्थाच्या पुराणकथा जगातील इतर अनेक समाजांमध्येही आढळतात. ग्रहगोलांच्या गतींवर आधारलेली युगकल्पना बॅबिलनमध्ये होती. वर्तमानयुमापूर्वी चार युगे होऊन गेली आहेत, असे मेक्सिकोमध्ये मानले जाते. ग्रीकांच्या व त्यांना अनुसरून रोमनांच्या मते सुवर्ण, रौप्य, ब्राँझ (वा पितळ) आणि लोह असा युगांचा क्रम असून लोहयुगानंतर पुन्हा सुवर्णयुग असे कालचक्र असते. पारशी धर्मामध्ये युगांच्या चक्राकार गतीची कल्पना नाही. ⇨अहुर मज्दाने जरथुश्त्राला चार युगांचे प्रतीक असलेल्या सुवर्ण, रौप्य, पोलाद व लोह यांच्या चार फांद्या असलेला वृक्ष दाखविला होता. ख्रिस्ती धर्मातील सेंट ऑगस्टीन वगैरेंनी सात युगे मानली आहेत.

संदर्भ : डोळके, ग. म. दप्तरी, या. के. संपा. विद्वद्रत्न डॉ. दप्तरी लेखसंग्रहखंड तिसरा, नागपूर, १९७३.

साळुंखे, आ. ह.