कीर्तन-२ : नवविधा भक्तीतील दुसरा प्रकार. भगवंताच्या गुणांचे व लीलांचे कथन करणे, भगवंताच्या नामाचे संकीर्तन करणे, हे त्याचे मुख्य स्वरूप. कीर्तनाने धर्मप्रसाराचे कार्य होते म्हणून कीर्तन ही सामाजिक संस्था बनली आहे. कीर्तनकारास मराठीत ‘हरिदास’ वा ‘कथेकरीबुवा’ म्हणतात. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. श्रोत्यांच्या चित्तांत इतर रसांच्या सहकार्याने भक्तिरसाचा परिपोष करणे, हे कीर्तनाचे प्रयोजन असल्यामुळे नीटनेटका पोषाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद इ. सर्व रससाधने कीर्तनाची अंगे होतात. निरनिराळ्या देवतांचे उत्सव, जयंत्या इ. प्रसंगी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतात. कीर्तन मुख्यतः देवळात, तीर्थयात्रेत, तीर्थक्षेत्रात किंवा देवतोत्सवात करतात. कीर्तन वैयक्तिक तसे सामुदायिकही असते. सामुदायिक कीर्तनात नृत्यही अंतर्भूत होते. कीर्तनात मधूनमधून भजन, ईश्वराचा व संतांचा जयजयकार करावयाचा असतो.

परंपरेनुसार कीर्तनसंस्थेचे आद्य प्रवर्तक नारदमुनी मानले जातात. स्त्रीमद्‍भागवतादी ग्रंथांतून कीर्तनाचा महिमा मोठ्या विस्ताराने वर्णिलेला आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास इ. संतांनी व त्यांच्या शिष्यपरंपरांनी कीर्तनसंस्थेचा विशेष प्रचार केला. महाराष्ट्रातील कीर्तनसंस्था विशिष्ट प्रकारची आहे. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्यकीर्तनकार मानतात.

नारदीय संप्रदायाच्या कीर्तनात ‘पूर्वरंग’ व ‘उत्तररंग’ असे दोन भाग असतात. नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे याला उत्तररंग म्हणतात. पूर्वरंगात निळोबाचा अपवाद करता तुकारामपर्यंतच्याच संतांचा अंभग लावण्याचा संकेत असून तो कीर्तनकार पाळतात. या दोन रंगांच्या मध्ये कीर्तनकाराला हार घालतात व सर्वांना बुक्का लावतात. शेवटी आख्यानाचे पर्यवसान आरंभीच्या निरूपणाच्या अभंगात करून, तो अभंग आणि ‘हेचि दान दे गा देवा’ हा तुकारामाचा अभंग म्हणून आरती करतात.

वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात आख्यान दुय्यम असते, मुख्य तत्त्व निरूपण व भजन असते. भारताच्या सर्व प्रांतांत कीर्तन व भजन यांच्या विविध प्रथा प्रचलित आहेत.

कीर्तनसंस्था हे लोकशिक्षणाचे, धर्मशिक्षणाचे प्रभावी साधन आहे, ती जीवनव्यवसायही बनला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कीर्तनाचे आधुनिकीकरण होऊन त्याद्वारे स्वातंत्र्याचा प्रचार केला गेला.  

जोशी, रंगनाथशास्त्री