युखॅरिस्ट : एक ख्रिस्ती धार्मिक संस्कार. Eucharistia ह्या ग्रीक शब्दापासून त्याची व्युत्पत्ती असून त्याच अर्थ ‘उपकारस्तुती करून’ असा आहे (लुक २२ : १९). मृत्यूपूर्वी येशूने आपल्या शिष्यांसह शेवटचे भोजन केले. आपण स्वीकारलेल्या मृत्यूचा मार्ग व अर्थ समजावून सांगत असता त्याने भाकर घेतली. ‘उपकारस्तुती करून’ हे तुमच्यासाठी मोडले जाणारे माझे शरीर आहे असे उद्‌गार त्याने काढले तसेच द्राक्षरसाचा प्याला घेतला व ‘तुम्हामध्ये’ व माझ्यामध्ये ईश्वरकृपेचा ‘नवा करार’ असे हे माझे रक्त आहे. जितक्यांदा तुम्ही हे घ्याल तितक्यांदा ते माझ्या स्मरणार्थ करा असे सांगितले. हा प्रसंगच युखॅरिस्ट विधीचा पाया आहे. काही चर्चेसमध्ये हा विधी दररोज पाळण्यात येतो. तर काहींमध्ये दर रविवारी, काहींमध्ये वर्षातून ठराविक वेळीच हा विधी पाळण्यात येतो. विशेष प्रसंगी, ख्रिश्चनांच्या मेळाव्याच्या वेळी, मृत्युसमयी इ. वेळीही हा विधी पाळण्याची प्रथा आहे.

‘युखॅरिस्ट’ पवित्र प्रभुभोजनाद्वारे साजरा केला जातो. ज्यांनी बाप्तिस्मा स्वीकारलेला असतो व जे अंतःकरणाने तयारी दर्शवितात त्यांच्या बाबतीत जात, वय, स्त्री-पुरुष, सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीनुसार भेदभाव न करता त्यांना प्रभुभोजनात सहभागी केले जाते. योहानलिखित शुभवर्तमानातील अध्याय ६, ओवी ५५ मधील ‘माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे’ या शब्दांचा बहुतेक ख्रिस्ती लोक (रोमन कॅथलिक, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स आणि ल्यूथरनसुद्धा) असा अर्थ घेतात, की येशू ख्रिस्त या संस्कारात भाकर व द्राक्षारसाच्या रूपात खऱ्या अर्थाने हजर असतो. येशूच्या नावाने धर्मगुरू प्रभुभोजनाचे शब्द उच्चारतात तेव्हा ख्रिस्त संस्काराच्या रूपात हजर होतो. कॅथलिक चर्चमध्ये समर्पित भाकर ख्रिस्तप्रसाद म्हणून सुशोभित अशा कोषात ठेवतात. त्या कोषाची जागा साधरणतः प्रमुख वेदीजवळ असते.

या युखॅरिस्टला पुढीलप्रमाणे नावे आहेत : ‘प्रभुभोजन’, ‘पवित्र मिस्सा’ किंवा ‘मॅस’, ‘मित्तरे’, ‘पाठविणे’. युखॅरिस्ट–उपासनेच्या शेवटच्या वाक्याचा ‘Ite missaest’, म्हणजे ‘जा तुम्हास पाठविण्यात येत आहे’ हा भाग आहे. मंगल संस्कार, ख्रिस्तशरीरसंस्कार, पवित्र सहभागिता, सहभोजन, ख्रिस्तप्रसाद परमप्रसाद इ. अर्थांनीही तो वापरला जातो.

फक्त अधिकृत धर्मगुरूच पवित्र मिस्सा साजरा करू शकतात. भक्तगण या संस्कारात सहभागी होतात आणि ख्रिस्तप्रसाद स्वीकारतात. भाकर आणि द्राक्षारस हे एकत्रितपणे दिले जातात किंवा फक्त भाकर दिली जाते. मोठ्या संख्येने जमलेल्या प्रत्येकाला ख्रिस्तप्रसाद मिळणे शक्य व्हावे व आरोग्याच्याही दृष्टीने विचार करता ख्रिस्तप्रसाद फक्त भाकरीच्याच रूपात देण्याची प्रथा पडलेली आहे. श्रद्धावंतांत बंधुभाव वाढविणे हा या पवित्र संस्कारामागील एक हेतू आहे. कॅलव्हरीवरील येशूच्या आत्मसमर्पणाचे ते स्मरण आहे त्याच्या आत्मसमर्पणाच्या पलीकडे हे नवीन अर्पण किंवा यज्ञयाग नाही. धर्मगुरू कॅलव्हरीवर (कॅलव्हरी टेकडीवर ख्रिस्त मरण पावला) झालेला यज्ञ नव्याने करीत नाही येशू ख्रिस्त हा यज्ञ आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून देतो. परमेश्वराला स्वतःचे शरीर अर्पण करणाऱ्या येशूशी या संस्कारातील सहभागी लोक एकरूप होतात व त्याने देवाला केलेल्या निःस्वार्थीपणाचे अनुकरण करून अधिकाधिक ख्रिस्तासारखे होतात.

पहा : मॅस.

संदर्भ : 1. Delorme, Jean, Ed. Eucharist in the New Testament, Baltimore, 1965.

2. Liesting, G. T. H. Sacrament of the Eucharist, New York, 1968.

3. Rahner, K. and others, Ed. Sacramentym Mundi, An Encylopaedia of Theology, Vol. II, Bangalore, 1975.

लेदर्ले, मॅथ्यू-रायनर