यॉर्क−१ : ग्रेट ब्रिटनच्या नॉर्थ यॉर्कशर परगण्यातील नगरपालिकीय शहर, महत्त्वाचे लोहमार्ग प्रस्थानक व औद्योगिक केंद्र. ऊझ व फॉस नदीसंगमावर वसलेले हे शहर लंडनच्या वायव्येस २८१ किमी. आणि लीड्सच्या पूर्व-ईशान्येस ३२ किमी. असून त्याची लोकसंख्या १,०२,७०० आहे (१९८३ अंदाज). यॉर्कच्या आर्चबिशपचे कॅथीड्रल शहर म्हणून ते सुपरिचित आहे. यॉर्कचे सांप्रतचे नाव ‘यॉर्‌व्हिक’ या डॅनिश नावावरून पडले असावे.

रोमनांनी इ. स. ७१ मध्ये हा प्रदेश आपल्या अधिकाराखाली आणला आणि तेथे एक किल्ला व तटबंदी उभारली. रोमन काळात ‘आयबॉरकम’ या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या या गावात सुविख्यात ‘रोमन सिक्‌स्थ लीजन’चे मुख्यालय सु. ३०० वर्षे टिकून होते. आद्रियन सम्राटाने (कार. ११७–३८) इ. स. १२० मध्ये इंग्लंडला भेट दिली व यॉर्क ही आपली लष्करी राजधानी बनविली २११ मध्ये आयबॉरकम येथे सम्राट सिव्हीरस (कार. १९३–२२१) मृत्यू पावला व ३०६ मध्ये याच ठिकाणी ‘कॉन्स्टंटाइन द ग्रेट’ (कार. ३०६–३७) याला रोमन सम्राट म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर येथे अँग्लो-सॅक्सन अधिसत्ता सुरू झाली. सातव्या शतकात सेंट पॉलायनस (मृत्यू ६४४) हा यॉर्कचा पहिला आर्चबिशप बनला व नॉर्थंब्रियाचा राजा एडविन (५८५–६३३) याने येथे एक चर्च उभारले. यॉर्क हे नॉर्थंब्रियाच्या राजधानीचे शहर बनले. आठव्या शतकात ते सबंध यूरोपभर शैक्षणिक केंद्र म्हणून ख्यातनाम झाले. त्यानंतर यावर डेन लोकांनी आपला अंमल बसविला. इंग्लंडचा राजा पहिला विल्यम (विल्यम द काँकरर-कार. १०६६–८७) याच्या उत्तर इंग्लंडवरील स्वारीच्या वेळी यॉर्कचा मोठ्या प्रमाणात नाश झाला शहराचा बराच भाग उद्ध्वस्त करण्यात आला. पुरांमुळे बराच भूभाग पाण्याखाली गेला या सुमारास दोन संरक्षक किल्ले (सांप्रत क्लिफर्ड टॉवर व कॅसल म्यूझीयम या वास्तू असलेल्या जागा) शत्रूपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात आले. त्यानंतर थोड्याच अवधीत यॉर्कची पुनश्च भरभराट होऊन ते लोकर-व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. बाराव्या शतकात आकार व महत्त्व या दोन्ही दृष्टींनी लंडननंतरचे हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर गणले जात होते.याच शतकाच्या उत्तरार्धात यॉर्कला दुसऱ्या हेन्रीकडून सनद मिळाली. ११७५ मध्ये येथे इंग्लिश संसद भरविण्यात आली.

यॉर्क ही पशुधनाची मोठी बाजारपेठ तसेच अनेक उद्योगांचे केंद्र आहे. शहरात लोखंड व पोलाद, शास्त्रीय उपकरणे, काचसामान, फर्निचर, द्रवीय पंप, रेल्वेचे डबे, प्रकाशीय उपकरणे, छपाईसाहित्य, मद्ये, चॉकोलेट पदार्थ, साखर, चामड्याच्या वस्तू, रसायने इत्यादींचे निर्मितीउद्योग आहेत. यॉर्कमधील सेंट पीटर कॅथीड्रल हे इंग्लंडमधील सर्वांत मोठे गॉथिक चर्च समजण्यात येत असून त्याशिवाय ‘ऑल सेंट्स’, ‘सेंट मायकेल्स’, ‘सेंट मेरीज’, ‘होली ट्रिनिटी’ इ. चर्चवास्तू वास्तुकलादृष्ट्या अत्यंत प्रेक्षणीय ठरल्या आहेत. शहराच्या जुन्या भागाभोवतीची गोलाकार तटबंदी अद्यापिही दिसून येते चार प्रमुख द्वारे आजही उत्कृष्ट स्थितीत जतन करून ठेवण्यात आली आहेत. येथील ‘शँबल्स’सारख्या काही जुन्या रस्त्यांवरील इमारतींमधील वरचे मजले इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे झुकलेले आहेत की, त्यांमधील एका घरातून समोरच्या घरातील व्यक्तीशी हस्तांदोलन करणेही शक्य व्हावे. शहरात रोमनकालीन वस्तुसंग्रहालय, राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय (स्था. १९७५) −लंडनबाहेरील एकमेव राष्ट्रीय संग्रहालय – असून इतर मध्ययुगीन वास्तूंमध्ये दुसऱ्या महायुद्धातील बाँबवर्षावानंतर पुनरुज्जीवित केलेला−‘गिल्डहॉल’ (१४४६–४८), ‘द मर्चंट ॲडव्हेंचरर्स हॉल’ (१३५७), ख्रिस्ती धर्मगुरुंकरिता स्थापण्यात आलेले सेंट विल्यम्स महाविद्यालय (१४५३) इत्यादींचा समावेश होतो. ‘यॉर्क सायकल’ ह्यांसारख्या मध्ययुगीन व्यवसाय−संघांनी पूर्वी बसविलेली व करून दाखविलेली ४८ गूढ नाटकांची मालिका आजही आपले अस्तित्व राखून आहे. यॉर्कमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंमुळे पर्यटनउद्योगाला मोठे महत्त्व आले आहे.

गद्रे, वि. रा.