याकोबी, फ्रीड्रिख हाइन्रिख : (२५ जानेवारी १७४३–१० मार्च १८१९). जर्मन तत्त्ववेत्ते. जन्म ड्युसेलडॉर्फ येथे. वडील साखर कारखान्याचे प्रमुख होते. त्यासाठी आवश्यक ते वाणिज्यविषयक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनीही ह्या कारखान्याचे प्रमुख म्हणून (१७६४–७२) काम पाहिले परंतु नंतर ते सोडून देऊन ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. १८०४ मध्ये त्यांची म्यूनिकच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
भावना आणि श्रद्धा यांच्या अधिष्ठानावरच मानवी अनुभवाचा योग्य अर्थ लावता येतो आणि मानवी ज्ञानाचा उलगडा करता येतो, ह्या मताचे प्रभावी पुरस्कर्ते म्हणून याकोबी जर्मन तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहेत. स्पिनोझा आणि कांट यांच्या तत्त्वज्ञानाचे चिकित्सक परीक्षण करून, त्यांच्या मतांच्या विरोधात याकोबी ह्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ⇨ बारूक स्पिनोझाच्या दर्शनावर त्यांनी प्रखर टीका केली असली, तरी एक प्रतिभावंत तत्त्ववेत्ता म्हणून स्पिनोझाची दखल घेण्याला याकोबी (आणि लेसिंग) यांनी प्रारंभ केला हे श्रेय त्यांच्याकडेच जाते. मेंडेल्सझोन, राइनहोल्ट, फ्रीझ, गटे इ. समकालीन विचारवंतांशी याकोबी यांचे जवळचे संबंध होते. म्यूनिक येथे त्यांचे निधन झाले.
आपल्याला प्राप्त होणाऱ्या अनुभवांच्या विश्लेषणापासून प्रारंभ करून अंतिम तत्त्वांचा शोध घेण्याच्या तत्त्वज्ञानात रूढ असलेल्या पद्धतीचा स्पिनोझा अव्हेर करतात आणि स्वतः सिद्ध असलेले द्रव्य–सब्स्टन्स–हे सर्व अस्तित्वाचे अधिष्ठान आहे असे मानून त्यापासून आपल्या तत्त्वज्ञानाला प्रारंभ करतात, ही स्पिनोझांची विचारपद्धती योग्य आहे असे याकोबींचे म्हणणे आहे. पण द्रव्यापासून इतर सर्व वस्तू आणि घटना अनिवार्यपणे निष्पन्न होतात असे स्पिनोझा मानतात व त्यामुळे द्रव्य हे मूल, अंतिम, स्वतंत्र आणि अतीत असे अस्तित्व आहे हे द्रव्याचे स्वरूप नष्ट होते आणि ज्याच्यातील घडामोडी अनिवार्य अशा कार्यकारणनियमांना अनुसरून घडत असतात असे विश्व म्हणजे द्रव्य हा सिद्धांत स्वीकारावा लागतो, अशी त्यांनी स्पिनोझांवर टीका केली आहे. याकोबीं च्या म्हणण्याप्रमाणे स्पिनोझांच्या तत्त्वज्ञानाची तार्किक परिणती अतीत तत्त्व नाकारण्यात, ‘नास्तिकते’त होते आणि म्हणून हे तत्त्वज्ञान ते अमान्य करतात.
त्यांनी ⇨ इमॅन्युएल कांटवर केलेल्या टीकेचा सारांश असा : आपल्या अनुभवाला प्राप्त होणाऱ्या वस्तूंचे स्वरूप आपली संवेदन शक्ती (सेन्सिबिलिटी) आणि आपली धारणाशक्ती (अंडरस्टँडिंग) यांनी घडलेले असते आणि म्हणून वस्तूचे स्वतःचे जे स्वरूप असते ते आपल्या अनुभवाला प्रतीत होऊ शकत नाही असा कांट यांचा सिद्धांत आहे. पण ह्याबरोबरच आपल्या अनुभवापलीकडे असलेल्या स्वरूपवस्तू (थिंग्ज-इन-देमसेल्व्हज) असतात असेही कांट मानतात पण यात विसंगती आहे. अनुभवापलीकडे असलेल्या वस्तूंना अस्तित्व आहे हे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल?
ह्या प्रश्नाला याकोबी यांनी दिलेले उत्तर असे, की ही गोष्ट आपण श्रद्धेने स्वीकारतो. आपल्या संवेदनांद्वारा त्यांच्यातून भिन्न असलेल्या ‘बाह्य’ वस्तूंचे ज्ञान आपल्याला होते असे आपण स्वाभाविक श्रद्धेने स्वीकारतो. अशाच स्वाभाविक श्रद्धेने अतीत अशा ईश्वराचे अस्तित्वही आपण स्वीकारतो. इंद्रियसंवेदनांनी त्यांच्या पलीकडे असलेल्या वस्तूंचे साक्षात् ज्ञान आपल्याला होते. तसेच आपल्या अंतर्यामात प्रकट होणाऱ्या प्रकाशात अतीत अशा ईश्वराचे साक्षात् ज्ञान आपल्याला होते. कर्ते म्हणून आपण स्वतंत्र असतो, आपल्याला निर्णयस्वातंत्र्य असते, कित्येक प्रकारची कृत्ये नैतिक व म्हणून बंधनकारक असतात हे ज्ञानही आपल्याला श्रद्धेने होते. श्रद्धेने आपल्याला वस्तू प्रतीत होतात आणि ह्या ज्ञानाचे विश्लेषण करून त्याची सुसंगत व्यवस्था लावणे एवढेच कार्य तार्किक बुद्धी करते. अखेरीस ज्ञान श्रद्धेवर आधारलेले असते अशी याकोबी यांची भूमिका आहे. त्यांचे सर्व लेखन जर्मनमध्ये असून ते एफ्. रॉथ यांनी संपादून सहा खंडात याकोबीज वेर्के (१८१२–२५) या शीर्षकाने लाइपसिक येथून प्रसिद्ध केले आहे.
आधुनिक तत्त्वज्ञानात ⇨ रने देकार्तपासून जो बुद्धिवाद वा ⇨ विवेकवाद प्रस्थापित झाला होता त्याच्या विरोधी विचारांची मांडणी करणारे तत्त्ववेत्ते म्हणून याकोबी यांना महत्त्व आहे.
संदर्भ : 1. Copleston, F. J. Ed. A History of Philosophy. Vol. 6. London, 1964.
2. Crawford, A. W. The Philosophy of F. H. Jacobi, 1905
रेगें, मे. पुं