यर्कीस, रॉबर्ट मर्न्झ : (२६ मे १८७६– ३ फेब्रुवारी १९५६). अमेरिकेतील प्रायोगिक मानसशास्त्रीय परंपरेच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक. त्यांचा जन्म पेनसिल्व्हेनियातील बक्स परगण्यात (कौन्टी) झाला. प्राणिशास्त्र व मानसशास्त्र विषयांत १८९२ मध्ये बी.ए. झाल्यानंतर १९०२ मध्ये त्यांनी मानसशास्त्रात पीएच्‌.डी. संपादन केली आणि लगेच हार्व्हर्ड विद्यापीठामध्ये मानसशास्त्राच्या प्राध्यापकाचे काम स्वीकारले. १९१२ ते १९१७ पर्यंत त्यांनी बॉस्टन येथील मनोरुग्णालयामध्ये मानसोपचारज्ञ म्हणून काम पाहिले आणि १९१७ मध्ये ते मिनेसोटा विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी अमेरिकेने पहिल्या जागतिक युद्धात पदार्पण केल्यामुळे त्यांना राष्ट्रीय लष्करी सेवेसाठी बोलावणे आले व त्यांची सेनादलाच्या वैद्यकीय विभागात प्रमुख मानसशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. युद्ध संपल्यानंतर त्यांनी काही वर्षे वॉशिंग्टनच्या राष्ट्रीय संशोधन कौन्सिलमध्ये काम केले. १९२४ मध्ये येल विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे १९४१ पर्यंत अध्यापन, संशोधन व संशोधनाचे मार्गदर्शक म्हणून काम करून ते निवृत्त झाले. न्यू हेवन येथे ते निधन पावले.

मानसशास्त्राच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी जे लिहिले गेले ते दोन गोष्टीसांठी : पहिली गोष्ट म्हणजे लष्करी सेवेत असताना त्यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने ‘आर्मी अल्फा टेस्ट’ नावाने प्रसिद्ध असलेली कागद-पेन्सिलीचा वापर करून द्यावयाची सामूहिक बुद्धिकसोटी रचली. या कसोटीने मनोमापन क्षेत्रात क्रांतिकारक सोय उपलब्ध करून दिली. त्या वेळेपर्यंत उपलब्ध असलेल्या बुद्धिकसोट्या ह्या बीने-सायमनच्या धर्तीवर वैयक्तिक कसोट्या होत्या व त्या वयसारणीवर (एज-स्केल) आधारित होत्या आणि त्यांच्या दोन मर्यादाही होत्या. एक तर त्या कसोट्या एकाच वेळी एकाच व्यक्तीला देता येत असत व परीक्षकही विशेष प्रशिक्षित असावा लागे. शिवाय त्या कसोट्यांना एक तासाहून अधिक कालावधीही लागायचा. ‘आर्मी अल्फा टेस्ट’मुळे एकाच वेळी अनेक व्यक्तींना एका तासाच्या आत कसोटी देता येऊ लागली. त्याचप्रमाणे ही कसोटी देण्यासाठी व गुणांकनासाठी विशेष प्रशिक्षणाचीही जरूरी राहिली नाही. त्यामुळे अल्पखर्चात मोठ्या संख्येने बुद्धिकसोटी घेणे शक्य होऊन बुद्धिमापनाच्या चळवळीला वेग आला. दुसरी गोष्ट म्हणजे त्या वेळेपर्यंत मानसशास्त्रतील प्राण्यांवरचे संशोधन उंदीर, मांजर इ. लहान व सहज पाळता-वाढवता येण्यासारख्या प्राण्यांपुरतेच मर्यादित होते. यर्कीसने येल विद्यापीठात माकडे, चिंपँझी वगैरेंसारख्या खऱ्या अर्थाने वा-नर (प्रायमेट्स) वर्गीय प्राण्यांवर प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापली व संशोधन पद्धतींचा विकास केला. त्यामुळे प्राणि-मानसशास्त्राला एक नवे दालन खुले झाले. यर्कीस यांनी संशोधनामुळे प्राणिवर्तनाच्या शारीरक्रियात्मक, रचनात्मक व मज्जाकार्यात्मक आधाराचा अभ्यास करण्यावर भर दिला होता. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना तुलनात्मक जैव मानसशास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणून मानण्यात येते. याशिवाय लहान प्राण्यांवरही त्यांनी बरेच संशोधन केले. उंदराच्या संवेदनात्मक विभेदनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी बनविलेली ‘विभेदन पेटिका’ (डिस्क्रिमिनेशन बॉक्स) विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानसशास्त्राच्या प्रयोगशाळेत स्थान टिकवून होती. त्याचप्रमाणे मानव प्रयुक्ताचे मनोनिदान करण्यासाठी त्यांनी बनविलेले ‘मल्‌टिपल चॉईस’ उपकरण आजही मानसशास्त्राच्या कित्येक प्रयोगशाळांमध्ये आपले स्थान टिकवून आहे. [⟶ तुलनात्मक मानसशास्त्र].

यर्कीस यांनी १९०७ मध्ये डान्सिंग माऊस हा प्राणिवर्तनाच्या अभ्यासावर शोधनिबंध लिहिला. ‘उ–प्र’ सूत्रावर आधारलेले हे पहिले संशोधन होते. १९११ मध्ये त्यांनी वॉटसनबरोबर प्राण्यांच्या दृष्टिसंवेदनाच्या संशोधनपद्धतिसंबंधी लेखही लिहिला. १९११ मध्येच त्यांनी इंट्रोडक्शन टू सायकॉलॉजी हे पाठ्यपुस्तक लिहिले. १९२० मध्ये त्यांनी त्यांच्या लष्करी सेवेत केलेल्या संशोधनाच्या आधारावर सी. योआकुमच्या सहकार्याने सायकॉलॉजिकल एक्झामिनेशन इन युनायटेड स्टेट्स आर्मी हा ग्रंथ लिहिला. परंतु यर्कीसची विशेष कीर्ती त्यांनी वा-नर योनीतील प्राण्यांवर लिहिलेल्या ग्रंथ चतुष्ट्यामुळे झाली. १९२५ मध्ये त्यांनी त्यांची पत्नी ॲड. डब्ल्यू. यर्कीसबरोबर ग्रेट ‍ऄपस्‌ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्या वेळेपर्यंतचे गोरिला, चिंपँझी, गिबन व ओरँगउटान या चार जातींच्या पुच्छहीन वानरांसंबंधी सर्व ज्ञात माहितीचे वैज्ञानिक दृष्टीने परिशीलन होते त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः मिळविलेली माहितीही होती. त्याच वर्षी त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला तो चिंपँझी इंटेलिजन्स अँड इट्स व्होकल एक्स्‌प्रेशन हा होय. तो संपूर्ण येल विद्यपीठाच्या वानर प्रयोगशाळेत त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित होता. या ग्रंथासाठी त्यांना बी. लर्नेड यांचे सहकार्य मिळाले होते. तिसरा ग्रंथ १९२८ मध्ये माइन्ड ऑफ गोरिला व चौथा १९४३ मध्ये लिहिलेला चिंपँझी : लेबोरेटरी कॉलनी हा होय.

संदर्भ : 1. Boring, E. G. A History of Experimental Psychology, New York, 1950.

2. Murchison, Carl, Ed. History of Psychology in Autobiography, Vol. II. New York, 1961.

3. Murphy, G. Historical Introduction to Modern Psychology, New York, 1949.

भोपटकर, चिं. त्र्यं.