मुद्रण : मुद्रण ही क्रिया रूढ अर्थाने कागदावर किंवा तत्सम पृष्ठावर ठसा उमटविणे ही होय. त्यावरून एकाच मजकुराचे किंवा चित्राचे अनेक ठसे उमटवून त्याच्या प्रती काढणे म्हणजे मुद्रण करणे असा अर्थ त्याला प्राप्त झाला. या तंत्राप्रमाणे त्याची व्याख्या म्हणजे योग्य अशा पृष्ठावर दाब देऊन रंगद्रव्याच्या साह्याने अक्षरे किंवा चित्र उमटविणे.
अलीकडील काळात अक्षरसमूह किंवा चित्रे मुद्रित करण्यासाठी पुष्कळ प्रकारची तंत्रे अस्तित्वात आली आहेत पण त्या तंत्रांमध्ये यांत्रिक पद्धतीने दाब देऊन ठसा उमटविणे किंवा त्या मुद्रणासाठी रंगद्रव्याचे साहाय्य घेणे या गोष्टींचा समावेश होत नाही. या नवीन तंत्राच्या विकासामुळे जुन्या व रूढ तंत्रांचा वापर पुढे कदाचित पूर्णपणे थांबेल. त्यामुळे मुद्रणाची नवीन व्याख्या म्हणजे अलीकडील नवीन तंत्राचा वापर करून काळ्या किंवा रंगीत शाईचा उपयोग करून कोणत्याही टिकाऊ पृष्ठावर अक्षरे किंवा चित्रे मुद्रित करून अनेक प्रती काढणे अशी करता येईल. मुद्रणामध्ये प्रथम शिसे, शाई, कागद, यंत्रे इ. गोष्टी वापरल्या गेल्या. त्यामुळे मुद्रणाशी या सर्वच गोष्टीची सांगड आपोआप घातली गेली पण नंतर या तंत्राचा जो विकास होत गेला त्यामुळे या तंत्रात पुष्कळच बदल झाला.
मुद्रण तंत्राची सुरुवात झाल्यानंतर गेल्या पाच शतकांहून जास्त काळ या तंत्राने सुसंस्कृत समाजावर एक प्रकारे प्रभुत्व ठेवले आहे व ज्ञानाचा ठेवा जतन करून ज्ञानप्रसाराचे काम कौशल्याने केले आहे. मुद्रणाच्या या उपयुक्ततेला अलीकडच्या बिनतारी संदेशवहन, दूरचित्रवाणी, सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म), फीत ध्वनिमुद्रण इ. प्रगत तंत्रांनी फार मोठे आव्हान दिले आहे व या आव्हानाला मुद्रण तंत्रच पुष्कळसे कारणीभूत झाले आहे तरीही मुद्रण तंत्राला स्वतंत्रपणे फार मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. पुस्तके किंवा वर्तमानपत्रांसाठीच फक्त या तंत्राचा वापर मर्यादित राहिलेला नाही. कापडावर, पत्र्यावर, भिंतीच्या कागदांवर, आवेष्टनांवर किंवा मोठ्या जाहिरातींवर मुद्रणाच्या अनेक तंत्रापैकी एकाचा वापर करून मुद्रण केले जाते. अतिसुक्ष्म अशा इलेक्ट्रॉनीय मंडलाच्या उत्पादनासाठीसुद्धा मुद्रण तंत्राचा उपयोग केला जातो [→ मुद्रित मंडले सूक्ष्मीकरण, इलेक्ट्रॉनीय मंडलाचे].
साधारणपणे ज्या काळात मोठे वैज्ञानिक शोध जगात लागत होते. त्याच काळात मुद्रण तंत्राचाही शोध लागल्याने ज्ञानाच्या प्रसाराला त्याची फार मोठी मदत झाली. शिवाय सामाजिक, आर्थिक किंवा सैद्धांतिक दृष्टया संस्कृतिसंगमाला चालना मिळून जगातील ज्ञान पसरण्याला मुद्रणाच्या प्रसालामुळे फार मोठी चालना मिळली. यामुळे मुद्रणाच्या शोधाला ज्ञान प्रसाराच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मुद्रित पुस्तकाचा मोठा फायदा प्रथम साक्षरता प्रसारासाठी झाला. व अजूनही विकसनशील देशांमध्ये होत आहे. त्यातूनच पुढे सामान्य ज्ञानाच्या प्रसारालाही त्याची फार मोठी मदत झाली. विशेषतः आर्थिक दृष्ट्या प्रगत अशा वर्गाला या ज्ञानप्रसाराची फार मदत झाली. सुरुवातीला या ज्ञानप्रसराला राजघराण्यांनी तुच्छ लेखले. प्रारंभीच्या पुस्तकांमध्ये वैज्ञानिक मजकूर व वाङमयीन गोष्टी यांचा प्रभाव जास्त असे व त्या खालोखाल धार्मिक मजकुराला महत्त्व असे. प्रथम कॅथलिक व नंतर प्रोस्टेस्टंट या पंथाच्या धर्मप्रचाराला मुद्रण तंत्राच फार फायदा झाला. पंधराव्य शतकामध्ये त्याचा प्रसार प्रथम झाला नाही, या गोष्टीला एक विशिष्ट अर्थ आहे. मुद्रण तंत्राची प्राथमिक माहिती चीनसारख्या देशामध्ये बाराव्या शतकाच्या आधीपासून होती, तरीही यूरोपमध्ये या तंत्राचा प्रसार आधी झाला, या गोष्टीला महत्त्व आहे. यूरोपमध्ये प्रथम लिहिण्याचे तंत्र प्रगत झाले ते अमूर्त वर्णमालेतील अक्षरांच्या साह्याने व त्या अक्षरांची संख्या फार मर्यादित होती. शिवाय या अक्षरांना प्रथम नुसत्या खणांचे स्वरूप होते. त्यामुळे हलत्या अक्षरांसाठी आणि खुणांसाठी प्रथम खिळे तयार करण्याचे तंत्र बरेच सुलभ झाले. चिनी वर्णमालेच्या साधारणपणे ८०,००० खुणांचा (अक्षरचिन्हांचा) उपयोग करावा लागत असल्याने मुद्रण योजनेच्या दृष्टीने या लिपीचा उपयोग फारच कमी होता. या कारणामुळे यूरोपातील संस्कृतीपेक्षा पौर्वात्य संस्कृती निश्चितपणे जास्त प्रगत असूनही तिचा विकास गेल्या ४–५ शतकांमध्ये फार सावकाश झाला व तुलनेने यूरोपीय संस्कृती फार झपाट्याने प्रगत झाली.
मुद्रणामुळे ज्ञानाचा साठा होण्याला व त्याची अविरत वाढ होण्यला मदत झाली. प्रत्येक पुढील युगाला मागच्या ज्ञानाच्या साठ्याचा ठेवा मिळाला व त्या त्या काळातील माणसांनी पूर्वीच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यात नवीन ज्ञानाची भर घातली. फ्रेंच साहित्यिक दनी दीद्रो यांनी अठराव्या शतकाच्या मध्याला त्या भाषेतील विश्वकोशाची सुरुवात करून तो प्रसिद्ध केला तेव्हापासून सध्याच्या काळापर्यंत ज्ञानसाधनांमध्ये इतकी प्रचंड भर पडली आहे की, तिचे मोजमाप करणे अशक्य आहे. या ज्ञानसाधनांमुळे जगाच्या सर्वसाधारण दृष्टिकोनामध्ये फार मोठा फरक पडला व त्यात जो बदल घडत गेला त्याचा वेगही सारखा वाढत गेला आणि तीच क्रिया आजतागायत चालू आहे. या बदल होण्याच्या क्रियेमध्ये एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीची आणि विसाव्या शतकातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीची फार मोठी भर पडली. औद्योगिक क्रांतीमुळे आणि सुधारणेमुळे समाजाचे जे आर्थिक संक्रमण झाले त्याला मुद्रणामुळे मदत झाली व सामाजिक बदल त्यामुळे शक्य झाले. मानवी हक्कसंहिता, अमेरिकेची राष्ट्रघटना, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झालेला वैचारिक बदल आणि एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाचे सामाजिक परिवर्तन या सर्व गोष्टी मुद्रणाच्या प्रगतीमुळे शक्य झाल्या व त्यांचे पुढील पिढ्यांसाठी जतन झाले. पुस्तके, मासिके आणि इतर मद्रित गोष्टी यांच्या साह्याने ज्ञानाच्या सर्वसामान्य गोष्टी समाजाच्या पुष्कळ कनिष्ठ थरापर्यंत सहज पोहोचल्या. जेथे साक्षर समाज मोठा आहे, त्या देशांमध्ये तर ज्ञानप्रसार होण्यासाठी मुद्रणाची फार मदत होते.
अलीकडील काळातील चढाओढीच्या, स्पर्धेच्या वातावरणामुळे मुद्रणावर अनिष्ट परिणाम अनिष्ट परिणाम होऊन ते हळूहळू नाहीसे होणार असा एक समज बळावत आहे. त्या उलट वरील समज चुकीचा आहे असा विचार व्यक्त होतो कारण मुद्रित विचार किंवा ज्ञान यांचा फायदा रेडिओ किंवा दूरचित्रवाणी या इतर माध्यमांपेक्षा वेगळा आणि जास्त मौल्यवान आहे. रेडिओवरील शब्द व दूरचित्रवाणीवरील चित्रे यांचा परिणाम मनावर तत्काळ पण वरवर होतो व तो टिकाऊ नसतो. मुद्रित शब्द किंवा चित्रे यांची निर्मिती जरी जास्त वेळ घेणारी असली, तरी त्यांचा टिकाऊपणा हा जास्त मौल्यवान आहे, कारण मुद्रित पुस्तक हवे तेव्हा उपलब्ध होऊ शकते आणि वाचल्यावर त्याबद्दल विचार करणे हे जास्त सोईचे असते. जरी फीत ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, सूक्ष्म छायाचित्रण किंवा इतर साधने यांच्या साहाय्याने ज्ञानाचा फार मोठा मोठा करता आला, तरी त्याच्या उपयोगासाठी ध्वनिक्षेपक किंवा चित्रवर्धक वगैरे गोष्टींच्या साहाय्याशिवाय सामान्य माणसाला या ज्ञानाच्या साठ्याचा उपयोग करणे अशक्य आहे. म्हणून मुद्रित ज्ञान हे सामान्य माणसाला चटकन उपलब्ध होण्याची शक्यता जास्त आहे व साक्षर व्यक्तीला हे ज्ञानसाधन सर्वांत आहे. त्यामुळे मुद्रित अक्षरे नाहीशी होण्याऐवजी त्यांचे महत्त्व जास्त वाढत आहे व इतर यांत्रिक माध्यमांच्या बरोबरीने मुद्रण या माध्यमाचे महत्त्व लक्षात येत आहे.
प्रस्तुत नोंदीत प्रथम मुद्रणाचा प्रारंभीचा इतिहास, यूरोपमधील मुद्रणाचा इतिहास व नंतर आधुनिक मुद्रणाचा इतिहास व नंतर आधुनिक मुद्रण तंत्राचा विकास व विविध पद्धती व त्यांकरिता वापरण्यात येणारी यंत्रे यांचे विवेचन केलेले आहे.
इतिहास व विकास : इ. स. नंतरच्या दुसऱ्या शतकाच्या शेवटी चिनी लोकांनी स्वानुभवाने अक्षरे किंवा मजकूर मुद्रित करण्याची पद्धती शोधून काढली होती. त्या काळी मुद्रणासाठी ज्या तीन प्राथमिक वस्तूंची गरज होती त्या गोष्टी त्यांना उपलब्ध होत्या उदा., कागद, शाई व मुद्रणप्रतिमा. कागद तयार करण्याचे शास्त्र त्यांना त्याआधी काही दशक वर्षे माहीत होते. शाई तयार करण्याची माहिती त्याआधी जवळजवळ अडीच हजार वर्षे चिनी लोकांना माहित होती. मुद्रण प्रतिमा हा कोरून तयार केलेल्या पृष्ठाची असे व तिचे स्वरूप वेगवेगळे असे. मुद्रणप्रतिमा ही उठावाच्या स्वरुपात व इतर भाग कोरून खोल गेलेल्या अशा स्वरूपात असे. त्या वेळी काही मजकूर (बौद्ध धर्मातील काही विचार) संगमरवरी (दगडी) खांबावर कोरून ठेवलेले असत. यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत. काही मजकूर धार्मिक स्वरूपाचा असे व त्याचे रूप मुद्रेसारखे (सीलसारखे) असे आणि त्यावर शाई लावून तो मजकूर कागदावर उठवण्याचीच त्या मुद्रेचा उपयोग केला जात असे. या मुद्रांमुळे त्याला लावण्याच्या शाईत सुधारणा होऊन ती मुद्रणाला योग्य केली गेली. हा काळ इ. स. चौथे किंवा पाचवे शकत होता.
नंतर सहाव्या शतकामध्ये संगमरवरी दगड किंवा मुद्रा या मुद्रण माध्यमांची जागा जास्त सोईस्कर अशा लाकडी ठशांनी घेतली कारण लाकडावर कोरणे हे तुलनात्मकपणे जास्त सोईचे होते. मुद्रणप्रतिमा कोरण्यासाठी लाकडी फळीचा आकारही जास्त सोईस्कर ठरला. प्रथम एका पातळ कागदावर मजकूर शाईने लिहिला जास असे व हा कागद शाईंची बाजू खाली करून लाकडी पृष्ठावर दाबला जात असे. त्याआधी लाकडी पृष्ठावर तांदळाच्या पिठाची खळ लावली जात असे, त्यामुळे कागदावरील शाई या खळीवर सहज चिकटून बसे. त्यानंतर कोरीवकाम करणारा कारागीर लाकडी पृष्ठावर जेथे शाई लागलेली नसे तो भाग हत्यारांनी कोरून काढून टाकीत असे. मुद्रणप्रतिमेचा भाग त्यामुळे उठावदार असा तयार होत असे व मुद्रणाला योग्य अशी उलट प्रतिमा मिळत असे. प्रत्यक्ष मुद्रण करताना कोरलेल्या लाकडी पृष्ठावर प्रथम शाई लावून त्यावर कागद पसरून नंतर एका कुंचल्याने कागदाची मागची बाजू दाबली जाई. मात्र यात कागदाची एकच बाजू मुद्रणासाठी वापरता येते. या पद्घतीने (तंत्राने) मुद्रित केलेला सर्वांत जुना मजकूर प्रथम जपानमध्ये इ.स. ७६४–७० च्या दरम्यानचा आहे व तो बौद्धांचा धार्मिक मजकूर आहे. चीनमध्येही इ. स. ८६८ च्या सुमाराला हीरक सूत्र या नावाचे पुस्तक प्रथम मुद्रित झाले. नंतर ९३२ च्या सुमाराला फाँग ताओ नावाच्या एका मंत्र्यांच्या प्रेरणेने १३० खंडांमध्ये चिनी अभिजात वाङमय मुद्रित करण्याला सुरुवात झाली.
चल खिळ्यांचा शोध : इ. स. १०४१–४८ या कालखंडात बी शंग नावाच्या चिनी किमयागारांनी मुद्रणासाठी चल (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणाऱ्या) खिळ्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न केले. त्यांनी चिकण माती व डिंक यांचे मिश्रण करून त्याचा अक्षराचा खिळा तयार करून तो भाजून पक्का केला. अशा प्रकारचे खिळे जुळवून त्यांच्या ओळी तयार करून एका लोखंडी पत्र्यावर राळ, मेण व कागदाची राख यांचा थर पसरून ही अक्षरे त्यावर ठेवून तो पत्रा गरम केला व तसाच थंड होऊ दिल्यामुळे सर्व अक्षरे सरळ ओळीत एकत्र राहिली. या ओळीवर शाई लावून त्यांचे मुद्रण त्यावर कागद दाबून केले व नंतर पुन्हा पत्रा गरम करून सर्व अक्षरे सोडवून घेतली. त्या अक्षरांचा पुन्हा उपयोग करता येत असल्याने या खिळ्यांना चल अक्षरांचे स्वरूप आले. अशा तऱ्हेने अक्षरे तयार करून ती जुळविणे, त्यांचे मुद्रण करणे आणि पुन्हा उपयोग करण्यासाठी ती सोडविणे अशा सर्व गोष्टी बी शंग यांनी साध्य केल्या व त्यांतील अडचणींवर मात केली.
इ. स. १३१३ च्या सुमारास वांग जन नावाच्या दंडाधिकाऱ्यांनी एका कारागीराकडून ६०,००० हून अधिक अक्षरे लाकडी पृष्ठावर कोरून तयार करून घेतली. त्यांच्या साह्याने तंत्रविद्येच्या इतिहासावरील एक विवेचन ग्रंथ मुद्रित करून तो प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस होता. वांग जन यांनी ही अक्षरे ठेवण्यासाठी एक पुष्कळ आडव्या कप्प्यांची पेटी तयार करून ती एका उभ्या अक्षाभोवती फिरविता येईल अशी योजना करून घेतली. जरूर असलेल्या अक्षराचा कप्पा पेटी फिरवून समोर आणून ते अक्षर उचलने सोपे जावे अशी ही योजना होती. या कल्पनेचा फायदा मात्र चीनमध्ये पुढे कोणी फारसा घेतल्याची माहिती नाही. कोरियामध्ये तेरीव्या शतकीमध्ये मात्र अक्षरे तयार करण्याचे तंत्र पुष्कळ प्रगत झाले होते. कोरियाच्या राजाने १४०३ मध्ये ओतीव काशापासून एक लक्ष अक्षरे तयार करण्याची आज्ञा दिली होती. नंतर १५१६ पर्यंत आणखी नऊ अक्षरसंच (फाँटस) तयार झाले अशी नोंद आहे. त्यांतील १४२० व १४३४ मध्ये तयार झाले होते. त्यानंतर यूरोपमध्ये चल खिळे तयार करण्याचे तंत्र वेगळ्या स्वरूपात अवगत झाले.
निरनिराळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या पद्धतींनी लेखनासाठी अक्षरचिन्हे निर्माण झाली. चीनमध्ये चित्रलिपीचे प्राथमिक स्वरूप आजही बरेचसे तसेच राहिले असल्याचे दिसून येते. मुद्रणाचे फार प्राचीन अवशेष चीनमध्ये सापडले. त्यावरून तेथे मुद्रणाची पद्धत फार पूर्वीपासून रूढ होती, हे उघड आहे. चित्रलिपीच्या कल्पनेतूनच पुढे अक्षरे व चिन्हे विकसित झाली व त्यातूनच पुढे लेखनपद्धती तयार झाली. प्रथम हे लेखन दगडावर किंवा विटेवर कठीण हत्याराने कोरून केले जात असे. पुढे भूर्जपत्रे किंवा ताडपत्रे यांचा लेखनासाठी उपयोग करण्यात येऊ लागला. त्यामुळे त्या त्या पानांवरील रेषांना अनुसरून लेखनपद्धतीला वळण मिळत गेले. नंतर जेव्हा कागद तयार झाला तेव्हा त्याच्यावर लिहिण्यासाठी बोरूचा किंवा फाट्याचा उपयोग केला जाऊ लागला. त्या वेळी लेखनपद्धतीमध्येही फरक पडला. उभ्या, आडव्या आणि तिरक्या रेषांच्या सांध्यांवर गोलावा आला. लेखणीच्या कोनाप्रमाणे त्या रेषांना जाड-बारीकपणा व रेखीवपणा प्राप्त झाला.
यूरोपमध्ये कागदाचे आगमन : कागद तयार करण्याचे तंत्र बाराव्या शतकाच्या आधी फक्त चिनी लोकांना अवगत होते. नंतर मध्य आशियातील खुष्कीच्या मार्गाने व्यापारी लोकांनी समरकंदच्या आंतरराष्ट्रीय बाजारात कागद नेला व एक वस्तू म्हणून अरब देशांमध्ये त्याचा प्रसार झाला. त्यानंतर कागद तयार करण्याचे तंत्रही त्याच मार्गाने मध्यपूर्व, पश्चिम आशिया व यूरोप या देशांमध्ये प्रसारित झाले. समरकंदच्या जवळ तलास येथे झालेल्या एका लढाईमध्ये काही चिनी युद्धकैदी म्हणून पकडले गेले. त्या चिनी लोकांनी अरबांना कागद तयार करण्याचे तंत्र शिकविले. आठव्या शतकाच्या शेवचटच्या काळापासून तेराव्या शतकापर्यंत बगदादपासून स्पेनपर्यंत पुष्कळ ठिकाणी कागद तयार करणारे सुरू झाले. यूरोपमध्ये कागदाचे आगमन बाराव्या शतकापासून पुढे सुरू झाले व ते इटलीमधील बंदरामधून सुरू झाले. इटलीमधील व्यापाऱ्यांचे अरब जगताशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे कागद ही एक व्यापारी वस्तू म्हणून स्पेन व फ्रान्स या देशांपर्यंत सहज पोहोचली. समुद्रमार्गाप्रमाणे खुष्कीच्या मार्गानेही कागद यूरोपमध्ये पोहोचला. कागद तयार करण्याचे तंत्रही यूरोपमध्ये नव्याने शोधले गेले. बाहेरून आलेला कागद तयार करण्यासाठी कोणत्या वस्तूंचा उपयोग केला जातो याचा शोध घेण्यात आला. तेराव्या शतकाच्या मध्याला पश्चिम आशियातून परत येणाऱ्या व्यापाऱ्यांनी व धर्मयोद्धयांनीही कागदनिर्मितीचे तंत्र पश्चिम आशियामधून आणले असण्याची शक्यता आहे. इटलीमध्ये १२७५ नंतर व फ्रान्स-जर्मनीमध्ये चौदाव्या शतकात कागदनिर्मीती सुरू झाली.
कागदनिर्मीतीप्रमाणे मुद्रणयोजन तंत्र चीनमधून येऊन इतक्या सहजपणे यूरोपमध्ये यशस्वी झाल्याची माहिती नाही. तुर्कस्तान व मंगोलिया या देशांच्या सरहद्दीजवळ रहाणाऱ्या विगुर जमातीच्या लोकांनी चिनी लोकांकडून मुद्रणयोजन तंत्राची माहिती आत्मसात करून घेतली असावी असे दिसते. कारण विगुर लोकांनी तयार केलेल्या अक्षरांच्या खिळ्यांचा एक संच नंतर सापडला. तो संच लाकडाच्या पृष्ठावर कोरून तयार केला होता व चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला तो तयार केला होता व चौदाव्या शतकाच्या सुरूवातीला तो तयार झाला होता. विगुर जमातीचे लोक हे भटके असले, तरी तुर्की व मंगोलियन लोकांना शिक्षण देण्याचे कार्य ते करीत असत आणि त्यांनी तुर्कस्तान व ईजिप्त या देशांतील लोकांना मुद्रणयोजन शिकविले असल्याची दाट शक्यता आहे. तेथून पुढे यूरोपमध्ये हे ज्ञान जाण्याला काही अडथळा आला असावा कारण इस्लामी संस्कृतीच्या लोकांनी कागदाचे अस्तित्व कुराण लिहिण्यासाठी मान्य केले होते पण कृत्रिमपणे (यंत्राच्या साह्याने) कुराणाचा प्रसार सगळीकडे व्हावा हे त्यांना मान्य नसावे म्हणून मुद्रणयोजनेचा प्रसार तेथून नंतर यूरोपमध्ये झाला नाही.
मुद्रणाचा शोध : मुद्रण करण्यासाठी जे प्राथमिक घटक आवश्यक होते त्यांची जुळणी पश्चिम यूरोपमध्ये हळूहळू होत गेली. त्याच्यासाठी जरूर असणारी आर्थिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी यूपोपमध्ये आधीच तयार झाली होती. काष्ठचित्रांकन (लाकडावर कोरीव काम करून त्यावरून मुद्रण करण्याची कला) ही कला चीनमध्ये अस्तित्वात असेल व ती तेथे महत्त्वाची मानली जात असेल अशी मार्को पोलो (१२५४-१३२४) या इटालियन प्रवाशांना अजिबात कल्पना नव्हती पण ही कला यूरोपात चौदाव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षांमध्ये माहीत झाली होती. कदाचित कागदाच्या उपयोगामुळे ही कला यूरोपमध्ये आपोआपच लवकर येऊन पोहोचली असावी. खरबरीत अशा चर्मपत्रापेक्षा त्याहून सपाट अशा कागदाच्या पृष्ठावर दाब देऊन अक्षरांचे मुद्रण करणे हे जास्त सोपे आहे असा अनुभव हस्तलिखितांच्या प्रती तयार करणाऱ्यांना आल्यामुळे काष्ठचित्रांकनाची कला प्रगत झाली. याच कलेचा उपयोग धार्मिक चित्रांचे मुद्रण करण्यासाठीही केला गेला. प्रथम फक्त अशा चित्रांचेच मुद्रण होत असे पण नंतर त्याच्याबरोबर काही मजकूरही मुद्रित होऊ लागला. जसजसे लाकडी चित्रे व अक्षरे (ठसे) कोरणाऱ्यांचे कौशल्य वाढले तसे मतकुराला जास्त प्राधान्य मिळत गेले. पंधराव्या शतकाच्या पहिल्या भागास बरीच पाने असलेली पुस्तके अस्तित्वात आली. त्यांत धार्मिक, लॅटिन व्याकरण व इतर संक्षिप्त स्वरूपाचा मजकुर यांचा समावेश होता. त्यांची निर्मिती चिनी मुद्रणयोजनेसारख्या पद्धतीनेच झाली होती. पाश्चात्त्य मुळाक्षरांची संख्या कमी असल्यामुळे लाकडी ठोकळ्यांवर नुसतीच अक्षरे प्रथम कोरून नंतर शब्दांच्या स्वरूपात त्यांची जुळणी करून मुद्रण करणे जास्त सोईचे ठरले. शिवाय ही लाकडी अक्षरे पुनःपुन्हा वापरता येत असत.
इ. स. १४२३–३७ या काळामध्ये लॉरेन्स यान्सन किंवा कॉस्टर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या डच गृहस्थांनी वर उल्लेखिलेल्या पद्धतीनेच प्रयोग केले असणयाची शक्यता आहे. मोठ्या आकारमानाची अक्षरे कोरून त्यांची जुळणी केल्यानंतर यशस्वी झालेल्या मुद्रणामुळे या कल्पनेची शक्यता प्रत्ययास आली व मुद्रणयोजनेचे महत्त्व सिद्ध झाले. मात्र एखाद्या नेहमीच्या आकारमानाच्या पुस्तकाच्या मजकुरासाठी अक्षराचे जे आकारमान आवश्यक असते त्या बाबतीत मात्र निराशाजनक अनुभव आला. रोमन मुळाक्षरांचे आकारमान चिनी कल्पनाचित्रांपेक्षा बरेच लहीन असल्याने लाकडातून लहान अक्षरे कोरून काढणे हे फार नाजूक व कष्टाचे काम आहे, हे कारागिरांच्या लक्षात आले. शिवाय या पद्धतीने तयार केलेली अक्षरे जास्त नाजूक असत व वापरून लवकर झिजत. मोठा लाकडी ठोकळा किंवा लहान लाकडी पट्टी यांपैकी कोणचेही लाकूड झिजण्यामध्ये सारखेच असते, असा अनुभव आहे. शिवाय सर्वच अक्षरे कोरून तयार केलेली असल्याने कोणचीही दोन अक्षरे दिसायला बऱ्याच वेळा सारखी नसत. (उदा., C या अक्षराचे दोन लाकडी ठोकळे). त्यामुळे तया सर्व गोष्टींमध्ये फारशी सुधारणा झाली नाही आणि उत्पादनामध्ये सुलभता, टिकाऊपणा व दर्जा यांचा अभावच जाणवू लागला.
धात्वालेखी मुद्रण : १४३० च्या सुमारास प्रचारात असलेले या प्रकारचे मुद्रण हे धातूच्या खिळ्यांवरून केलेल्या मुद्रणाच्या थोडेसे अगोदरचे असले पाहिजे पण त्यासंबंधी सबळ पुरावा मात्र उपलब्ध नाही. मध्ययुगीन काळात धातुकामात निष्णात असलेल्या लोकांना किंवा सोन्याचांदीचे नक्षीकाम करणाऱ्या लोकांने मुद्रांचा वापर करण्याची माहिती होती. यातील निष्णात कारागिरांना त्यांच्या तंत्राचा उपयोग करून एकाच मुद्रेच्या साह्याने एनेक अक्षरे तयार करून व त्यांची जुळणी करून मजकुराचे मुद्रण लवकर करणे शक्य आहे या गोष्टीची माहिती होती. या स्रव क्रियेचे पुढील तीन भाग पाडून मुद्रणयोजना करता येईल, हे या कारागिरांना माहीत होते : (१) लिपीतील सर्व मुळाक्षरांच्या मुद्रांचा एक संच पितळ किंवा कासे या मिश्रधातूमध्ये प्रथम कोरून तयार करणे (२) या मुद्रांचा उपयोग करून मजकुराला लागणारी सर्व अक्षरे एका चिकणमातीच्या किंवा शिशासारख्या मऊ धातूच्या पाचयावर जुळवून एक साचा तयार करणे (३) शिशाचा रस या सर्व साच्यावर ओतून तो लहान पट्टीच्या रूपात घट्ट होऊ देणे. अशा पट्टीचा उपयोग उठावाच्या अक्षरांसारखा मुद्रणासाठी करत येतो.
या एकंदर पद्धतीचा फायदा असा की, प्रत्येक अक्षर मोठ्या संख्येने तयार करण्यासाठी फक्त एकदाच कोरावे लागते. एकदा मुद्रा तयार केली की, प्रत्येक अक्षर जरूरीप्रमाणे मोठ्या संख्येने तयार करता येते आणि सर्व अक्षरे दिसायला सारखी दिसतात. मातृकांवरून शिशाची अक्षरे तयार करणे खूप वेगाने साध्य होते व शिशाची अक्षरे लाकडाच्या अक्षरांपेक्षा जास्त टिकतात. मातृकांच्या एका संचापासून पुष्कळ प्रती काढून त्यांचा एकाच वेळी उपयोग करून मुद्रणाच्या प्रतींची संख्या पुष्कळ वाढविता येते.
धात्वालेखी मुद्रण १४३० च्या सुमारास हॉलंड देशात उपयोगात आणले जात होते असे दिसते. त्यानंतरच्या काळात जर्मनीतील -हाईनलँडमध्येही ते वापरले जात असे. ⇨ योहान गूटेनबेर्क यांनी
स्ट्रँसबर्गला १४३४–३९ या काळात त्याचा उपयोग केला. यासंबंधीच्या प्रयोगाचा पुढे मात्र फारसा उपयोग झाला नाही कारण ओतीव धातूचा साचा हा त्रासदायक ठरला. प्रत्येक अक्षर तयार करताना मुद्रांचा उपयोग सारखा दाब देऊन करता येत नव्हता. त्यामुळे सर्व अक्षरांची उंची सारखी नसे. शिवाय एका अक्षरामुळे लगतचे दुसरे अक्षर वाकडेतिकडे होत असे. तरीही या प्रकारच्या तंत्रामुळे मुद्रा, मातृका व नंतरची ओतलेली अक्षरे यांच्या उपयोगाची माहिती झाली.
मुद्रणयोजनेचा शोध : मुद्रा, मातृका व शिशाचा संयुक्त उपयोग करून टिकाऊ अशी अक्षरे (सुटी) मोठ्या संख्येने तयार करणे व प्रत्येक अक्षर (एकाच अक्षराचे सर्व नमुने) दिसायला सारखे असणे ही यूरोपमध्ये पुस्तके मुद्रित करण्याच्या दृष्टीने एक मोठी गरज होती. दुसरी मोठी गरज म्हणजे मोठ्या प्रमाणावर मुद्रण करण्यासाठी एका विशिष्ट यंत्राची जरूरी होती. अशा यंत्राची कल्पना पूर्वेकडील कुठल्याही देशातील लोकांना प्रथम सुचली नव्हती.
योहान गूनटेबेर्क यांना वरील दोन्ही नवीन कल्पनांचे श्रेय दिले जाते पण त्यातही थोडी अनिश्चितता आहे आणि या कल्पना प्रत्यक्षात आल्यानंतर लवकरच त्यांच्या श्रेयाबद्दल मतभेद उत्पन्न होऊन त्याबद्दल वाद उत्पन्न झाला. गूटेनबेर्क यांनी मुद्रित केलेल्या कुठल्याही पुस्तकावर किंवा इतर कागदांवर त्यांच्या नावाचा उल्लेख नाही, ही वस्तुस्थिती आहे. ४२ ओळींच्या बायबलसारख्या उत्कृष्ट कृतीवर त्यांचे नाव नाही पण इतर काही ग्रंथांवर त्यांचे नाव असल्याने त्याचे श्रेय त्यांना मिळाले होते. काही ऐतिहासिक व तांत्रिक संशोधनानंतर बायबल मुद्रित करण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले. गुटेनबेर्क यांचा मूळ व्ययसाय चांदीच्या कारागिराचा होता. त्यांनी योहान फूस्ट यांच्याबरोबर जर्मनीमध्ये माइनत्स येथे जो मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला त्यामध्ये त्यांनी फक्त अभिकल्पक (आराखडा तयार करणारा) भागीदार म्हणून काम केले. त्यामुळे या पुस्तकावर त्यांचे नाव दिले गेले नाही. नंतर गूटेनबेर्क यांनी १४५५ मध्ये त्यांच्या सहकाऱ्यांविरूद्ध खटला भरला आणि त्यात ते हरले. या खटल्याच्या संदर्भातील काही कागपत्रांमधील उल्लेखांवरून त्यांनी बायबल छापण्याचे काम केले, असे अनुमान काढले गेले आहे.
गूटेनबेर्क यांच्या निधनानंतर बरीच कागदपत्रे प्रसिद्ध झाली व त्या सर्वावरून मुद्रणाच्या शोधाचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यांच्या विरूद्ध या शोधावर हक्क सांगणारे योहान शफर (योहान फूस्ट यांचे नातू) यांनीच अप्रत्यक्षपणे गूटेनबेर्क यांच्या बाजूने ही गोष्ट मान्य केली आहे. १५०९ नंतर योहान शफर यांनी चल अक्षरांचा व मुग्रणाचा शोध फक्त त्यांच्या वडिलांनी (पेटर शफर यांनी) व आजोबांनी लावला होता असा हक्क सांगायला सुरूवात केली पण त्याआधी १५०५ मध्ये एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये १४५० मध्ये माइनत्स येथे गुटेनबेर्क यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावला असे शफर यांनीच लिहिले होते. त्यांनी त्यांच्या आजोबांकडून याबाबत माहिती घेतली असली पाहिजे, असे अनुमान आहे. त्यांचे आजोबा १४६६ मध्ये निधन पावले व वडील १५०२ मध्ये निधन पावले. त्यानंतर १५०९ च्या सुमारास योहान शफर यांनी आपलेच शब्द फिरवून गूटेनबेर्क यांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचे कारण मात्र समजत नाही.
सुरुवातीला अक्षरांच्या खिळ्यांचे उत्पादन पुढे दिलेल्या पद्धतीने झाले असावे अशी समजूत आहे. अक्षराचा ठसा प्रथम पितळी किंवा काशाच्या पृष्ठावर कोरला जातो. नंतर त्यावर श्शाचा रस ओतून त्याची मातृका तयार करण्यात येते व त्याच्या साच्यात एक मिश्रधातू ओतून त्यातून अक्षरे तयार करण्यात येतात. या खिळ्यांचे ⇨ वर्णपटविज्ञानीय विश्र्लेषण केल्यानंतर असे आढळले की, या जुन्या खिळ्यांच्या मिश्रधातूमध्ये शिसे, कथिल व अँटिमनी यांचा उपयोग केला होता. सध्याही याच धातूंचा उपयोग केला जातो. शिशाचे ऑक्सिडीकरण (ऑक्सिजनाशी संयोग होण्याची क्रिया) लवकर होऊ नये म्हणून त्यात कथिल मिसळले जाते. खिळे तयार करताना शिशाच्या मातृकांवर हवेत परिणाम होवून त्या ठिसूळ होऊ नयेत म्हणूनही कथिलाचा त्यात उपयेग केला जातो. शिसे व कथिल या दोनच धातूंच्या मिश्रणात टिकाऊपणा व कडकपणा येऊ शकत नाही म्हणून अँटिमनी मिसळली जाते.
इ. स. १४७५ च्या सुमाराला अक्षरांच्या पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचली. त्याआधी नरम धातूच्या मुद्रा वापरल्या जात. पेटर शफर यांनी पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचविली. पोलादी मुद्रेवरुन तांब्याच्या मातृका तयार केल्यास त्यांच्या साह्याने तयार केलेले आक्षरांचे खिळे जास्त एकसमान मिळतील या कल्पनेतून पोलादी मुदेरा तयार करण्याची कल्पना सुचली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अक्षरांचे खिळे सर्वासाधारणपणे वर दिलेल्या पद्धतीने तयार केले जात.
मृद्रणयोजनाकाराचे काम साधारणपणे चार भागांत विभागलेले असते. (१) अक्षरांचे खिळे त्यांच्या कप्प्यांमधून एक एक काढून घेणे. (२) अक्षरजुळणीसाठी वापरली जाणारी पट्टी (स्टिक) हातात धरून तीत अक्षरांच्या ओळी तयार करणे. ही पट्टी प्रथमतः लाकडाची व नंतर धातूची वापरण्यात येऊ लागली. (३) शब्दांमधील अंतर व्यवस्थित करून ओळीची लांबी पूर्ण करणे. त्यासाठी दोन शब्दांमध्ये शिशाच्या कोऱ्या (अक्षरविरहित) पट्ट्या जरूरीप्रमाणे घालणे. (४) मजकुरांचे मुद्रण पुर्ण झाल्यानंतर अक्षरांचे खिळे सुटे करून अक्षरांच्या कप्प्यांत प्रत्येक अक्षर परत टाकणे(वितरण करणे).
गूटेनबेर्क मुद्रणयंत्र : गूटेनबेर्क यांच्या काळातील कागदपत्रे व १४३९ च्या सुमाराला झालेल्या एका खटल्यातील काही नोंदी यांच्यामुळे सुरुवातीच्या काळापासून मुद्रणयंत्र वापरले जात होते, अशी माहिती उपलब्ध आहे. कदाचित प्रथम पुस्तकबांधणीसाठी वापरले जाणारे दाबयंत्र थोडेसे सुधारून त्याचा अपयोग पुस्तकाच्या मुद्रणासाठी केला गेला असावा. अक्षरांच्या खिळ्यांवर शाई लावून त्यांवर कागद ठेवून मग त्यावर यांत्रिक पद्धतीने (लाकडी मळसूत्राच्या-स्क्रूच्या साहाय्याने) दाब देणे ही सर्व क्रिया या दाबयंत्रामार्फत होत असे. हे तंत्र पूर्वी लाकडी ठोकळ्यावरील अक्षरांवर दाब देऊन मुद्रण करण्याच्या तंत्रापेक्षा जास्त चांगले होते, कारण यामुळे अक्षरांच्या कडा जास्त चांगले होते, कारण यामुळे अक्षरांच्या कडा जास्त ठळक होत असे. तरीही या तंत्रात काही त्रुटी होत्या. खिळ्यांवर शाई लावून नंतर त्यावर कागद ठेवणे हे फार त्रासदायक होत असे. सर्व प्राथमिक गरजा भागवायला समर्थ झाले, अशी समजूत आहे. अक्षरांची जुळणी केलेली सर्व पाने (मजकूर) एका हलत्या पाट्यावर ठेवून तो पाटा पुढे-मागे करण्याची यांत्रिक सोय प्रथम अस्तित्वात आली. त्यामुळे मजकुरावर शाई रुळाच्या साह्याने लावून तो मजकूर मागे सरकवून त्यावर कागद ठेवणे व नंतर त्यावर दाबून मुद्रण करणे इतक्या क्रिया या यंत्रामध्ये होत असत. त्यानंतर काही यांत्रिक सुधारणा केल्यामुळे हेच यंत्र वापरणे जास्त सुलभ झाले. एका फर्म्याचे दोन भाग करून दोन यांत्रिक हालचालींनी तो फर्मा छापणे अशा पद्धतीने मुद्रणासाठी होत राहिला.
गूटेनबेर्कंनंतर यंत्रात झालेल्या सुधारण : पुढील ३५० वर्षामध्ये मळसूत्राच्या मुद्रणयंत्रामध्ये अनेकविध सुधारणा झाल्या व त्यांतील बहुतेक सर्व महत्त्वाच्या होत्या. १५५० च्या सुमाराला लाकडी मळसूत्राने घेतली. त्यानंतर वीस वर्षांनी संशोधकांनी दुहेरी बिजागरीच्या साह्याने लोखंडी चौकट हलविण्याची सोय, फत्त्क अक्षरांच्या खिळ्यांवर शाई लावून उरलेल्या भागावरील शाई कागदावर उतरु नये म्हणून एक कातडी आवरण, दाब समान देण्यासाठी एक कापडी जाड थराची गादी वगैरे सुधारण केल्या. साधारण १६२० च्या सुमाराला अँम्स्टरडॅम येथे यंत्राचा पाटा आपोआप वर उचलला जावा म्हणून पाट्यावर दाबा देण्यासाठी जी एक पट्टी वापरली जात असे त्या पट्टीला प्रतिभार लावण्याची(समतोल राखण्यासाठी दुसरे वजन लावण्याची) सोय करण्यात आली. या यंत्राला ‘डच मुदणयंत्र’ असे नाव मिळाले व हेच यंत्र १६३८ मध्ये उत्तर अमेरिकेमध्ये प्रचारात आणले गेले. या सुधारणेचे जनक व्हिलेम यान्सन ब्लाऊ हे समजले जातात. १७९० च्या सुमाराला विल्यम निकलसन या इंग्रज वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी खिळ्यांवर शाई लावण्यासाठी कातडी आवरणाचा एक रूळ तयार करून तो वापरायला सुरुवात केली. यामुळे अशा यंत्रावर प्रथम चक्रीय गतीचा उपयोग केला गेला. कातडी आवरणाच्या ऐवजी नंतर सरस आणि मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी तयार करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाचा उपयोग तयार करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाचा उपयोग रूळ करण्यासाठी करण्यात आला.
धातूचे मुद्रणयंत्र : इंग्लंडमध्ये १७९५ मध्ये प्रथमतः धातूचा उपयोग केलेले मुद्रणयंत्र तयार करण्यात आले. नंतर काही वर्षांनी अमेरिकेतील एका यंत्रज्ञाने एक धातूचे यंत्र तयार केले, त्यात मळसूत्राचा उपयोग करण्याऐवजी सलग अशा धातूच्या यांत्रिक सांध्यांचा उपयोग केला होता. या यंत्राचे नाव ‘कोलंबियन’ असे होते. त्याच्या नंतर सॅम्यूएल रस्ट यांनी ‘वॉशिंग्टन’ नावाचे यंत्र तयार केले. त्याचा ताशी वेग सु. २५० कागदांचा (प्रतींचा) होता.
स्टीरिओटाईपी व स्टीरिओग्राफी : मुद्रित मजकुराच्या वाढत्या मागणीमुळे मुद्रणाचा वेग वाढून वाचनीय साहित्य मोठ्या संख्येने निर्माण करण्याकडे कल वाढला. पॅरिसमध्ये १७९० च्या सुमाराला स्टीरिओटाइपीचा उपयोग यशस्वीरीत्या केला गेला. या तंत्रामध्ये चिकणमातीचा उपयोग जुळणी केलेल्या मजकुराच्या खिळ्यांवर दाबून त्याचा साचा करण्यासाठी केला जातो किंवा एखाद्या मऊ धातूचा उपयोगही याच पद्धतीने करून साचा केला जातो. या साच्यावरून शिशाचा साचा बनवला जातो. अशा स्टीरिओटाइपाचा उपयोग एकाच वेळी जास्त ठिकाणी साचे त्यांवरून मोठ्या प्रमाणावर मुद्रण करण्यासाठी केला गेला. स्टीरीओटाइपामुळे ज्या अक्षरांच्या खिळ्यांचा उपयोग प्रथम साचा करण्यासाठी केला गेला, ते खिळे पुन्हा नवीन अक्षर जुळणीसाठी वापरता येतात. अशा खिळ्यांचा उपयोग पुनः पुन्हा जितक्या वेळा केला जाईल तेवढी त्यांची उपयुक्तता वाढते.
स्टीरिओटाइपीचा एक निराळा प्रकार म्हणून १८४८ नंतर विद्युत् विलोपन करण्याच्या पद्धतीने हे तंत्र वेगळ्या स्वरूपात वापरले गेले. अक्षराच्या खिळ्यांच्या फर्म्यावर प्रथम मेणाचा थर देऊन त्याचा मऊ साचा करून नंतर त्यावरून तांब्याचा पातळ पत्र्याचा साचा तयार केला गेला व नंतर त्यावरून तांब्याचा पातळ पत्र्याचा साचा तयार केला गेला व नंतर त्या पोकळ आवरणाच्या आत शिसे भरून त्याला आधार देऊन त्याची मुद्रणप्रतिमा तयार केली गेली.
शिशाच्या खिळ्यांचा उपयोग तांब्याचा साचा तयार करण्यासाठी उपयोगात न आणण्यासाठी प्रथम मेणाचा उपयोग केला होता आणि स्टीरिओग्राफीचा मूळ हेतू तोच होता. चिकणमातीचा उपयोग करून साचा तयार करून मग त्याचा तांब्याचा पृष्ठभाग मुद्रणासाठी करण्याबद्दल जे प्रयोग केले होते, त्यांचा यशस्वी उपयोग करता आला नाही. १७९७ साली वरील प्रयोगाचा एक नवीन स्वरूप वापरून प्रयोग केला गेला. प्रत्येक अक्षराच्या तांब्याच्या अनेक मातृका करून त्या मातृकाच खिळ्यांऐवजी जुळवून त्यांचा मजकूर तयार केला गेला. त्या सर्व मातृका एकत्र बांधून एका मोठ्या साच्यात त्या ठेवून त्यांच्यावर शिशाची मिश्रधातू ओतून एका पानाच्या आकारमानाचा एक पूर्ण साचा तयार झाल्यानंतर त्याच मातृका सोडवून पुन्हा नवीन मजकूर तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग करता येत असे, हे या पद्धतीचे वैशिष्ट्य होते.
कनिख मुद्रणयंत्र: मुद्रणयंत्र चालवण्यासाठी वाफेच्या शक्तीचा उपयोग करण्याची कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी संशोधन करण्यास सुरुवात झाली. या दृष्टीने मुद्रणासाठी ज्या वेगवेगळ्या कृती वापराव्या लागतात त्या एका सलग यांत्रिक हालचालीत सूत्रबद्ध करण्यासाठी संशोधन करण्यास प्रारंभ झाला. १८०३ साली जर्मनी मध्ये फ्रीड्रिख कनिख यांनी मुद्रणाचा पाटा वर उचलून पुन्हा खाली नेण्यासाठी व गादीची पुढे-मागे हालचाल करण्यासाठी आणि शाई लावण्याकरिता रुळांची मालिका वापरण्यासाठी पुष्कळशा दंतचक्रांचा उपयोग करून एक यंत्र तयार केले होते. १८११ साली लंडनमध्ये या यंत्राची चाचणी घेतली तेव्हा ते यशस्वी ठरले नाही.
अमेरिकेत ‘लिबर्टी’ नावाच्या एका यंत्राची रचना १८५७ मध्ये केली गेली होती. या यंत्रात पाट्याची हालचाल यांत्रिकपणे होत असे व पायाने एक दांडी दाबून धरली की, गादीच्या पृष्ठावर पाटा दाबून धरला जात असे. विल्यम निकलसन यांनी प्रथम एका यंत्रावर दंडगोल बसवून त्यावर वर्तुळाकार आकारात अक्षरांचे खिळे बसवून त्याच्या साह्याने कागदावर मुद्रण करण्याचे एकस्व (पेटंट) मिळविले होते पण या शोधाचा उपयोग करून घेण्यासाठी जे तंत्रज्ञान आवश्यक होते ते विकसित न केल्याने त्या शोधाचा उपयोग त्यांना करून घेता आला नाही.
ज्या तंत्रामध्ये चक्रीय गतीला महत्त्व आहे अशा तंत्रामध्ये दंडगोलाचा उपयोग करणे अपरिहार्य असते व या तंत्रामुळे जास्तीत जास्त वेगाने मुद्रण शक्य झाले असते. जेव्हा सारखीच शक्ती वापरली जात असेल तेव्हा दंडगोलामुळे प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या मुद्रणाच्या पृष्ठाच्या एका लांब पट्टीवरच दाब दिला जातो व पाट्याच्या उपयोगात तो दाब सबंध पृष्ठावर विभागला जाऊन चौ. सेंमी. वरील दाबाच्या हिशेबात कमी लागतो. शिवाय दंडगोलाचे स्वतःचे वजन जास्त असल्याने कमी वेळात तेवढाच दाब देता येतो आणि मुद्रण चक्रीय गतीच्या पद्धतीने जास्त चांगले व वेगाने होते. १७८४ च्या सुमाराला एका फ्रेंच यंत्रावर चक्रीय गतीचे मर्यादित पण चांगले प्रात्यक्षिक दाखविले गेले होते आणि चक्रीय गतीचा उपयोग व कार्यक्षमता यांचा प्रत्यय लोकांना आला. १८११ मध्ये कनिख व त्यांचे सहकारी आंड्रेआस बौअर यांनी चक्रीय गतीच्या तत्त्वावर चालणारे यंत्र नव्याने तयार केले. त्यात दंडगोलाच्या साह्याने कागद अक्षरांच्या खिळ्यावर दाबून त्यावर मुद्रण करण्याची योजना होती. एक सपाट पाटा यंत्रात मागे-पुढे हलण्याची यांत्रिक व्यवस्था करून त्यावर शाई लावण्याचीही व्ययवस्था यात केलेली होती. पाटा पुढे जाताना दंडगोल फिरून त्यावर कागद दाबला जात असे पण पाटा मागे जाताना दंडगोल थोडासा वर होऊन तेथेच थांबत असे व त्याच्य वेळी अक्षराच्या खिळ्यांना शाई लागत असे. १८१४ मध्ये अशा पद्धतीचे पहिले यंत्र लंडनमध्ये टाइम्स या वर्तमानपत्रासाठी बसविले गेले. या यंत्रामध्ये दोन दंडगोल होते व पाटा पुढे-मागे होताना ठराविक दंडगोल फिरत असे आणि दरवेळी कागद छापला जात असे. दुप्पट कागद छापल्यामुळे तासात १,१०० कागद छापले जात. या यंत्राला ‘स्टॉप-सिलिंडर’ मुद्रणयंत्र (खंडित गती दंडगोल मुद्रणयंत्र) असे नाव मिळाले.
कनिख व बौअर यांनी १८१८ मध्ये एक वेगळे यंत्र तयार केले. त्यातही दोन दंडगोल होते व कागद यंत्रात सोडल्यावर एका दंडगोलामुळे कागदाची एक बाजू छापली जात असे व कागद पुढे जाऊन दुसऱ्या दंडगोलामुळे त्याची दुसरी बाजू छापण्यात येई. या यंत्राला ‘पर्फेक्टिंग’ यंत्र असे नाव मिळाले. १८२४ साली विल्यम चर्च यांनी दंडगोलाला कागद पकडण्यासाठी खास यांत्रिक व्यवस्थ केली. त्यामुळे कागद पकडणे, थोडा वेळ तसाच धरून पुढे नेणे व छापल्यानंतर तो आपोआप सोडून देणे या सर्व गोष्टी शक्य झाल्या.
दंडगोलाच्या मुद्रणयंत्रावर मधला पाटा मागे-पुढे हलण्यामुळे त्याची गती थांबणे व पुन्हा सुरू होणे ही नैसर्गिक हालचाल होत असे पण त्यामुळे गती खंडीत होत असे. पहिली काही वर्षे याच प्रकारची यंत्रे मोठ्या प्रमाणात वापरली गेली. दंडगोलाची ही गती खंडीत न होता अखंडपणे तो फिरण्यासाठी अक्षरांचा साचा व त्यावर दाब देणारा दंडगोल हे दोन्ही वर्तुळाकार असणे आवश्यक असते.१८४४ मध्ये रिचर्ड हो यांनी अमेरिकेत अक्षरांचा अर्ध किंवा पूर्ण वर्तूळाकार साचा बसवून अखंड गतीने यंत्र फिरते ठेवण्यात यश मिळवले व त्याबद्दलचे एकस्व त्यांना मिळले. या यंत्रात एका मोठ्या दंडगोलावर अक्षरांच्या ओळी पक्क्या बसवण्याची सोय केली होती व त्यावर कागद दाबण्यासाठी लहान व्यासाचे ६ ते १० दंडगोल बसवले होते. या प्रत्येक दंडगोलावर कागद आत सरकावला जात असे व तो छापला जाई. या तंत्रामुळे यंत्राला वेग येई व तासला ८,००० पेक्षा जास्त कागद छापले जात. या यंत्राचा मुख्य दोष म्हणजे त्याचा नाजूकपणा व अक्षरांचे खिळे सहज सैल होणे हा होता. खिळे सैल होऊन खाली पडण्यामुळे मुद्रित मजकुरात पुष्कळ चुका राहत असत.
हा दोष काढून टाकण्यासाठी यंत्रातील दंडगोलावर अर्धवर्तूळाकार किंवा पूर्ण वर्तूळाकार असे अक्षरांचे साचे करून ते त्यावर बसवणे जास्त योग्य होते व त्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. फ्रान्समध्ये १८४९ नंतर त्या दृष्टीने बरेच प्रयोग करण्यात आले. नंतर त्या दृष्टीने बरेच प्रयोग करण्यात आले. नंतर १८५६ पासून लंडनला टाइम्स या वर्तमानपत्राच्या छपाईसाठी या तंत्राचा उपयोग नियमितपणे करण्यास सुरुवात झाली व १८७८ नंतर इतर पुष्कळ ठिकाणी या तंत्राचा प्रसार झाला. या यंत्रावर कागद लावणे ही गोष्ट मात्र यंत्राच्या सलग व आपोआप घडणाऱ्या क्रियांमध्ये बसली नव्हती. प्रत्येक कागद वेगळा करून तो हाताने यंत्रामध्ये सोडावा लागत असे. या क्रियेचे यांत्रिकीकरण नंतर सुटे कागदाचे रीळ लावून यंत्रात ते आपोआप पुढे जाईल अशा पद्धतीने झाले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीलाच कागदाची रिळे तयार करण्याचे तंत्र माहीत झाले होते. १८६५ मध्ये अमेरिकामध्ये विल्यम बुलक यांनी प्रथम कागदाची रिळे यंत्रावर लावून छपाई करण्यासाठी अखंड चक्रीय गतीच्या पद्धतीचे यंत्र तयार केले. या यंत्रावर मुद्रणानंतर कागद कापण्याची योजना अंतर्भूत होती व तासाला पूर्ण वर्तमानपत्राच्या १२,००० प्रतींची छपाई करण्याची क्षमता या यंत्रात होती. १८७० सालानंतर या यंत्रामध्ये स्वयंचलित पद्धतीने कागदाच्या घडया घालण्यासाठी यांत्रिक योजना नव्याने करण्यात आली. ही सुधारणा बुलक व हो या दोघांनी मिळून केली. नंतरच्या काळात अनेक प्रकारच्या वक्राकार पद्धतीच्या पट्टया (स्टिरिओप्लेटस) यंत्रातील दंडगोलावर बसवण्याची सोय करण्यात आली. विद्युत विलेपनच्या पद्धतीने ज्या पट्टया तयार करण्यात येत असत त्यांना खालच्या बाजूला आधार दिला जात असे पण त्याआधी त्यांना जरूर तो वक्राकार दिला जात असे. शिवाय रबर किंवा प्लॅस्टिक यांच्यापासूनही पटटया तयार केल्या जात असत. धातूच्या पत्र्यांवर अम्लकोरण करून तो पत्र दंडगोलाकार बसवून त्यावरून छपाई करण्याची व्यवस्था या यंत्रावर करण्यात आली.
यांत्रिक अक्षरजुळणींचे प्रयत्न : यांत्रिक पद्धतीने अक्षरजुळणी साधण्याचे प्रयत्न एकोणिसाव्या शतकात चालू होते पण यांत्रिक पद्धतीने मुद्रण साधण्याकरिता कराव्या लागलेल्या प्रयत्नांपेक्षा ही अक्षरजुळणी जास्त अवघड ठरली. १८०६ मध्ये एका संपीडन साच्याचा (संकोचन क्रियेने आकार देणाऱ्या साच्याचा) शोध लागल आणि त्यामुळे यांत्रिक अक्षरजुळणीसाठी मार्ग मोकळा झाला व अक्षरे वेगाने जुळवणे दृष्टिपथात आले. १८२२ मध्ये बॉस्टनमध्ये विल्यम चर्च यांनी अक्षरजुळणीचे एक यंत्र तयार करून त्याचे एकस्व मिळविले. या यंत्रात अक्षरांच्या बटणांचा एक फलक असे व प्रत्येक अक्षराचे बटण दाबल्यावर एक अक्षराचा खिळा विशिष्ट कप्प्यातून बाहेर येऊन एका ठिकाणी जमा होत असे. या खिळ्यांची जुळणी करून त्यांची ओळ हाताने तयार केली जात असे व शब्दांमधील अंतर सारखे करून ओळ पूर्ण करावी लागे. छपाई झाल्यावर हे खिळे पुन्हा त्यांच्या विशिष्ट कप्प्यांमध्ये परत न करता त्यांच्याऐवजी नवीन खिळे तयार करून ते ठराविक कप्प्यांमध्ये पुन्हा साठवण्यासाची कल्पना पुढे आली. या तत्त्वांवर आधारित अशी बरीच यंत्रे पुढील ५० वर्षामध्ये तयार झाली व त्यांत काही सुधारणा झाल्या. असाच एका यंत्रावर एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या नवव्या आवृत्तीची १०,००० हून जास्त पाने जुळवली गेली होती. या यंत्रावर तासाला ५ ते १२ हजार अक्षरांची जुळळी करता येत असे. हाताने जी अक्षरजुळणी केली जात होती तीत तासाला १,५०० अक्षरे जुळवली जात. मात्र या नव्या यंत्रामध्ये अक्षरे एकामागून एक तयार होऊन बाहेर पडत आणि त्यांतून शब्द व ओळी हाताने तयार करावी लागत आणि ओळिंची लांबी सारखी करावी लागे. या प्रकारची यंत्रे अक्षरांचे परत योग्य कप्प्यांमध्ये वितरण करीत नसत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा अपुरेपणा राहिला होता. हा अपुरेपणा एक यांत्रिक वितरक त्या यंत्रावर बसवल्यामुळे दूर झाला. हा यांत्रिक वितरक म्हणजे अक्षरजुळणी करण्याच्या उलट क्रिया करीत असे. वापरलेल्या ओळींमधील अक्षरे यांत्रिक जुळाऱ्या समोरून सरकत असत आणि प्रत्येक अक्षरासाठी त्याचे बटण दाबले की, ते अक्षर त्याच्या विशिष्ट कप्प्यात परत जाऊन पडे. या यांत्रिक वितरणामुळे तासाला ५,००० अक्षरे पुन्हा त्यांच्या कप्प्यात परत पाठवता येत पण हा वेग हाताने वितरण करण्याच्या वेगापेक्षा जास्त नव्हता. पहिली अडचण म्हणजे ओळीची अचूक लांबी बरोबर पूर्ण करावी लागते. त्यासाठी दोन शब्दांमधील अंतर नक्की किती ठेवायला हवे त्याचा बरोबर अंदाज यावा लागे व दुसरी अडचण म्हणजे अक्षरांची ओळ वापरून झाल्यावर छापण्यामध्ये किती वेळ जाईल हे आधी सांगणे कठीण असे. त्यामुळे अक्षरजुळणी व परत अक्षर वितरण यांची अचूक सांगड यांत्रिक रीतीने घालून एका आवर्तनात समन्वय साधत नसे.
खिळे ओतून अक्षरजुळणी : १८८० नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाइप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले. प्रत्येक अक्षराची एक मातृका अक्षराचे बटण दाबल्यावर एका ओळीत जुळून तीमध्ये पातळ अशी मिश्रधातू जोरात दाबली जाई व अखंड ओळ (शब्दांची) तयार होई. दोन शब्दांची मधील अंतर वरखाली सरकणाऱ्या पट्टीमुळे आपोआप नियंत्रित होत असे व ते सर्व शब्दांमध्ये सारखे राहत असे. प्रत्येक अक्षराच्या मातृकेला वरच्या बाजूला वेगवेगळ्या खाचांचा संच असे. त्यामुळे प्रत्येक मातृकेचे फक्त तिच्याच कप्प्यात अचूक वितरण होत असे. या तंत्रात अक्षरांच्या खिळ्यांऐवजी प्रत्येक ओळीतील मातृकांचा एक संच अक्षर दाब मुद्रणाच्या चार मूलभूत कृतींमधून जातो आणि अक्षरांचे खिळे वेगळे न होता एक पूर्ण ओळ तयार होऊन ती मुद्रणासाठी वापरली जाते. अर्थात अशा ओळीचा उपयोग फक्त एकाच वेळच्या मुद्रणासाठी होत असे. सध्याच्या काळातही या यंत्रावर तासाला ५ ते ७ हजार अक्षरांची जुळणी होते.
अमेरिकेत १८८५ मध्ये टॉलबर्ट लॅन्स्टन यांनी ‘मोनोटाइप’ या अक्षरजुळणी यंत्राचा शोध लावला. हे यंत्र प्रत्येक अक्षर स्वतंत्रपणे पण शब्द व ओळी या क्रमाने निर्माण करते आणि दोन शब्दांमधील अंतर एका विशिष्ट मापन पद्धतीने मोजून ओळी तयार करते. यातील मातृका वेगळ्या आकारमानाच्या असतात व पुष्कळ वेळा वापरात येतात. अक्षरांचा व ओळींचा उपयोग छपाईनंतर संपल्यावर ही अक्षरे खिळ्यांच्या कप्प्यांत वितरित करता येतात किंवा वितळवून टाकली जातात. शुद्धलेकनाच्या चुका अक्षरे बदलून दुरूस्त करता येतात. लायनोटाइपावर मात्र चूक झाल्यास दुरुस्तीसाठी पूर्ण ओळ बदलून घ्यावी लागते. हल्ली अक्षरजुळणीसाठी प्रथम एका यंत्रावर कागदाची एक विशिष्ट रुंदीची फीत लावून तिच्यावर अक्षरफलकाच्या बटणांच्या साह्याने छिद्रे पाडली जातात व नंतर ही कागदाची फीत दुसऱ्या ओतकामाच्या यंत्रावर बसवून त्यातील मातृकांच्या साह्याने प्रत्येक अक्षर व त्यांचे शब्द यांची निर्मिती आपोआप (स्वयंचलितपणे) होते. या यंत्रावर तासाला १० ते १२ हजार अक्षरांची निर्मिती करता येते.
अमेरिकेत १९११ मध्ये वॉशिंग्टन लडलो यांनी मोठ्या आकारमानाच्या व प्रदर्शनात्मक स्वरूपाच्या (उदा., वर्तमानपत्रातील मोठ्या शीर्षकांच्या) अक्षरांच्या जुळणीसाठी मोठ्या आकारमानाच्या मातृका हाताने जुळवून एका वेगळ्या साच्यात घालून त्यावर मिश्रधातू जोराने दाबून तिची अखंड ओळ तयार करण्याचे तंत्र शोधून काढले. या तंत्राला त्यांचेच नाव (लडलो ओतकाम) दिले आहे. ओतीव ओळ तयार झाल्यानंतर अक्षरांच्या मातृका परत हाताने त्यांच्या पेटीत वितरित कराव्या लागतात. अक्षरांची ओळ वितळवून टाकली जाते.
एकोणीसाव्या शतकातील नव्या संकल्पना : एकोणीसाव्या शतकात बऱ्याच नवीन संकल्पनांचा उगम होऊन एकंदर मुद्रण तंत्रामध्ये बरीच मोठी भर पडली. या संकल्पनांचा संबंध गूटेनबेर्क यांनी जे तंत्र शोधून काढले त्या तंत्राशी प्रत्यक्षपणे नव्हता पण एकंदर मुद्रण तंत्र त्यामुळे समृद्ध झाले.
चित्रांचे निर्मितितंत्र : चित्रनिर्मितीचे अगदी पहिले तंत्र म्हणून पूर्वी काष्ठचित्रांकनाचा उपयोग केल्याचा उल्लेख केला आहे. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात धातूच्या पृष्ठावर कोरून त्यावरून मुद्रण करण्याच्या तंत्राची या तंत्राशई चढाओढ सुरू झाली. यासाठी तांबे, पितळ, जस्त आणि १८०६ नंतर पोलाद या सर्व धातूंच्या पत्र्यांचा उपयोग केला गेला. या पत्र्यांच्या पृष्ठभागावर कठीण हत्यारांनी कोरून किंवा अम्लाच्या साह्याने रासायनिक कोरण करून मुद्रणप्रतिमा खोलगट अशी तयार केली जात असे. त्या पृष्ठावर प्रथम पूर्णपणे शाई पसरून नंतर वरचा सपाट पृष्ठभाग काळजीपूर्वक पुसून काढला जात असे. खोलगट प्रतिमेमधील शाईवर एका दंडगोलाच्या साह्याने कागद दाबला जाऊन त्यावर मुद्रण होत असे. उत्कीर्ण (इंटॅग्लिओ) मद्रणाची ही पद्धत काष्ठचित्रांकनाच्या पद्धतीशी जुळत नसल्याने मजकुराचे मुद्रण व चित्रांचे मुद्रण निराळे करून नंतर नंतर पुस्तकबांधणीच्या वेळी दोन्ही एकत्र केले जाई.
वक्राकार पृष्ठावरून उत्कीर्ण मुद्रण करण्यासाठी एकोणीसाव्या शतकात यंत्रे तयार केली गेली. या यंत्रामध्ये शाई लावण्यासाठी गोल रूळ व पृष्ठावरील शाई पुसण्यासाठी सतत फिरणाऱ्या कापडी पट्ट्या यांची योजना असे. या यंत्राची मुद्रणाची क्षमता बरीच मर्यादित होती. अठराव्या शतकाच्या शेवटी उत्कीर्ण मुद्रणाच्या या पद्धतीमुळे कापडावर अखंड रंगीत छपाई करण्याची एक पद्धत विकसित झाली. या पद्धतीत एक तांब्याचा दंडगोल वापरला जाई व त्यावर हाताने कोरून मुद्रणप्रतिमा तयार केलेली असे व त्याच्या पृष्ठावरील शाई एका धातूच्या पट्टीने (तासणीने) काढून घेतली जाई आणि कोरलेल्या भागातील शाई तशीच राहिल्याने ती कागदावर उतरत असे. १८८० साली फ्रान्समध्ये हीच पद्धत शालेय पुस्तकांच्या वेष्टनासाठी वापरली गेली. एका तांब्याच्या दंडगोलाच्या पृष्ठावर मुद्रणप्रतिमा सूक्ष्म अशा कोरण्याने तयार करून त्यांवर शाई लावली जात असे. मुद्रणप्रतिमा रेषांच्या साह्याने तयार केलेली नव्हती पण खोलगट कोरणे फार सूक्ष्म असे. त्यामुळे त्या प्रतिमेतील शाई खोलगट भागात स्थिर राहत असे. ही शाई नंतर कागदावर उतरत असे. मात्र हे तंत्र साध्या चित्रांपुरतेच वापरण्यास योग्य होते.
शिलामुद्रण : (लिथोग्राफी). मुद्रण तंत्राचा तिसरा प्रकार म्हणजे शिलामुद्रण. या तंत्राचा विकास एकोणिसाव्या शतकात पुष्कळच झाला. शिलामुद्रणाचे तंत्र उठाव मुद्रण किंवा उत्कीर्ण मुद्रणापेक्षा वेगळे होते. पाणी व तेल (ग्रीज) एकमेकांत मिसळत नाही या तत्त्वावर आधारित असे हे समपृष्ठ मुद्रणाचे तंत्र त्यामध्ये विकसित झाले. १७९६ मध्ये प्राग येथील आलोयूस झेनेफेल्डर यांनी शिलामुद्रणाचा शोध लावला. त्यांनी सूक्ष्म एकजिनसी सच्छिद्रता असलेल्या सपाट पृष्ठभागाच्या चुनखडकाचा याकरिता उपयोग केला. या दगडाच्या पृष्ठभागावर प्रथम त्यांनी तेलकट शाईने रेखाचित्र काढले. नंतर पृष्ठभाग पाण्याने ओला केला व कुंचल्याने त्यावर मुद्रणाची शाई लावली. ही शाई फक्त रेखाचित्रावरच पकडली गेली. नंतर या दगडावर कागद दाबून काढल्यावर रेखाचित्र कागदावर मुद्रित झाले. झेनेफेल्डर यांनी प्रयोगाने असेही दाखवून दिले की, अशा दगडावर काढलेले व कागदावर छापलेले चित्र दुसऱ्या दगडावर स्थानांतरित करता येते आणि त्याच्या पाहिजे तितक्या एकसारख्या प्रती मोठ्या दगडावर शेजारी शेजारी काढता येतात. या दगडावरून एकाच मोठ्या कागदावर एकाच वेळी अनेक प्रती मिळविता येतात जस्ताच्या पत्र्याचे गुणधर्म साधारणपणे चुनखडकाशी मिळतेजुळते असतात, हेही झेनेफेल्डर यांनीच दाखवून दिले.
झेनेफेल्डर यांनी शिलामुद्रणाच्या तत्वाचा उपयोग करणाऱ्या एका यंत्राची कल्पना मांडली. या यंत्रावर वरील प्रकारचा दगड एका सपाट पाट्यावर पक्का बसवून त्याला शाई लावून त्यावरून दंडगोलाच्या साह्याने कागद त्यावर दाबून मुद्रण करण्याची योजना पुढे आली. १८५० पर्यंत असे यंत्र तयार झाले. त्यात कागद दाबण्यासाठी दंडगोल, पाणी व शाई लावण्यासाठी खास तयार केलेले रूळ यांची योजना केलेली होती नंतर दगडाची जागा जस्ताचा पत्रा घेऊ शकेल याची कल्पना प्रत्यक्षात आल्यामुळे अखंड गतीने दंडगोल फिरत असताना त्यावर कागद छापण्यासाठी यंत्र करण्याची कल्पना साकार झाली. १८६८ मध्ये एका दंडगोलावर मुद्रणप्रतिमेचा पत्रा व दुसऱ्या तशाच दंडगोलाने या पत्र्यावर कागद दाबणे या क्रिया अखंड गतीने चालू ठेवणे शक्य झाले.
ठसे तयार करणे : याच काळात रेखाचित्राचे किंवा छायाचित्राचे अम्लकोरण करून ठसा करून अक्षराच्या खिळ्यांबरोबर त्याची छपाई करण्याचे तंत्र विकसित झाले व हे तंत्र प्रत्यक्षात आणण्यामध्ये बऱ्याच संशोधकांचा हातभार लागला. छाया-मुद्रालेखन या क्रियेचे सामान्य स्वरूप म्हणजे जाड पत्र्यावर प्रथम मुद्रण प्रतिमा रासायनिक क्रियेने कोरून मुद्रणप्रतिमेला उठाव आणणे आणि उरलेली भाग कोरून खालच्या पातळीला घालविणे आणि अशा मुद्रणप्रतिमेवरून उठाव मुद्रणाच्या पद्धतीने मुद्रण करणे असे आहे.
या सर्व क्रियांमध्ये प्रकाशक्रिया महत्त्वाची असल्याने त्याला छायामुद्रालेखन किंवा ठसे करणे म्हणणे आवश्यक आहे. उठाव मुद्रणाशी संबंधित अशी ही क्रिया असल्याने ती उत्कीर्ण मुद्रणापेक्षा वेगळी आहे. हे लक्षात घेणए जरूर आहे. दोन्हीही तंत्रांमध्ये रसायनांच्या साह्याने अम्लकोरण होऊन पत्र्यावर प्रतिमा तयार होते. उठाव मुद्रणामध्ये पत्र्यावरील नको असलेले भाग अम्लकोरणाने काढून टाकले जातात आणि उत्कीर्ण मुद्रणांच्या तंत्रात मुद्रणप्रतिमेचे भाग अम्लकोरणाच्या साह्याने काढून टाकले जातात. उठाव मुद्रणासाठी जो पत्रा वापरला जातो तो एका लाकडी ठोकळ्यावर प्रथम ठोकून इतर अक्षरांबरोबरच अशा ठशाचे मुद्रण केले जाते.
अनेकरंगी मुद्रणही अशा ठशांच्या साह्याने करता येते. त्यासाठी मूळ रंगीत चित्रावरून प्रथम चार व्यस्त प्रती (ज्यात मूळ चित्रातील छायांकित भाग पारदर्शक आणि प्रकाशित भाग गर्द व अपारदर्शक असतो अशा प्रती) तयार कराव्या लागतात. या व्यस्त प्रतींचा उपयोग चार ठसे करण्यासाठी केला जातो. या ठशांच्या अचूकपणासाठी त्यांच्या रंगछटांमध्ये सुधारणा कराव्या लागतात व अशा सुधारित ठशांवरून चार रंगांमध्ये चित्र मुद्रित करावे लागते. ठसा पूर्ण होईपर्यंत त्याला तीन वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागते. प्रथम मूळ चित्रावरून कॅमेऱ्याच्या साह्याने रंग विलगीकरणाचा उपयोग करून चार व्यस्त प्रती तयार करणे. नंतर या चार रंगाच्या व्यस्त प्रतींवरून जस्त, तांबे वगैरेंच्या पत्र्यांच्या तुकड्यांवर मुद्रणप्रतिमा स्थानांतरित करणे. शेवटी या चारही रंगांच्या छायाछटांचे बिंदू सुधारून त्याच वेळी त्यांच् अम्लकोरण करणे. एकरंगी ठशामध्ये एकाच रंगाच्या छायाछटा सुधारून घ्यावा लागतात. मात्र अनेकरंगी मुद्रणामध्ये रंग मिसळून छटा बदलत असल्याने त्याबाबत जास्त जागरूक रहावे लागते. अम्लकोरणाबरोबर इतर अनेक रयायने वा तंत्रात वापरावी लागतात. यांत्रिक क्रियाही बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. या तंत्राच्या सुरुवातीला बहुतेक सर्व क्रिया हाताने कराव्या लागत. अलीकडील काळात स्वयंचलित क्रियांचा पुष्कळच उपयोग केला जात आहे.
प्रकाशसंवेदन : काही रासायनिक संयुगे प्रकाशाला संवेदनशील असतात असा शोध झोझेफ निसेफॉर न्येप्स या फ्रेंच संशोधकांना १८२० च्या नंतर लागला. प्रथम चुनखडकावर व नंतर कथिलाच्या पत्र्यावर सरळ मुद्रणप्रतिमा स्तानांतरित करता यावी व नंतर तिचे अम्लकोरण मुद्रणासाठी करता यावे म्हणून न्येप्स प्रयत्न करीत असताना त्यांना हा शोध लागला. त्यांना लागलेल्या शोधामुळे पुढे उत्कीर्ण मुद्रणाचा पाया घातला गेला व छायाचित्रणाची सुरुवातही १८२९–३८ च्या दरम्यान झाली [→ छायाचित्रण]. नंतर छायाचित्रण हे ब्रोमाइड कागदावर आणण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला गेला.
डब्ल्यू. एच्. फॉक्स टॉलबट या ब्रिटिश संशोधकांनी १८५२ मध्ये एका झाडाच्या पानाचे छायाचित्र घेण्यासाठी पोलादी पत्र्यावर प्रकाशसंवेदी रासायनिक थर पसरून त्याच्यापुढे एक काळे पातळ कापड उभे ठेवण्याची व्यवस्था केली. त्या पोलादी पत्र्यावर जी मुद्रणप्रतिमा तयार झाली तिच्यामध्ये जाळीचा भाग स्पष्ट दिसण्याएवढा आला होता. झाडाच्या पानाचे चित्र थोड्या मोठ्या आकारमानाच्या बिंदूंनी तयार झाले. ज्या प्रमाणात प्रकाशक्रिया झाली होती त्या प्रमाणात नंतर त्या बिंदूंचे आकारमान कमीजास्त झाले होते. टॉलबट यांनी एकाच वेळी छायाचित्राचा व उत्कीर्ण मुद्रणासाठी लागणाऱ्या जाळीच्या पटलाचा शोध लावला होता. यातूनच पुढे अखंड गतीच्या उत्कीर्ण मुद्रणाचा (रोटोग्रॅव्ह्युअर मुद्रणाचा) जन्म व विकास झाला.
इ. स. १८८० च्या नंतर छायाछटेची व्यस्त प्रत तयार करण्यासाठील कापडाऐवजी दोन काचांचा उपयोग केला गेला. प्रत्येक काचेवर सरळ रेषेत कोरून त्या काचा जुळवल्यावर त्यांवरील रेषा एकमेकींना काटकोनात छेदून त्यांची एक समान जाळी तयार झाली. या जाळीच्या पटलातून (जालक पटलातून) व्यस्त प्रत घेतल्यामुळे लहान मोठ्या बिंदूंची एक व्यस्त प्रतिमा काचेवर तयार झाली व तिच्या साह्याने अक्षरमुद्रणासाठी आणि शिलामुद्रणासाठी व्यस्त प्रत तयार करणे शक्य झाले. जालपटलातून प्रकाश दुसऱ्या बाजूला जाताना त्याचे विविर्तन [→ प्रकाशकी] होत असल्यामुळे मुद्रणाला योग्य अशा छायाछटा लहान मोठ्या बिंदूंच्या साह्याने तयार होतात. थोड्याशा वेगळ्या तंत्राने हीच पद्धत उत्कीर्ण मुद्रणासाठी लागणाऱ्या व्सस्त प्रतीसाठी व सम प्रतीसाठीही (मूळ मजकुराप्रमाणे वा चित्राप्रमाणे असलेल्या प्रतिसाठीही) वापरता येते. फक्त त्याला जालक पटलाची आवश्यकता लागत नाही. उत्कीर्ण मुद्रणासाठी लागमारे जालक पटलाची आवश्यकता लागत नाही. उत्कीर्ण मुद्रणासाठी लागणारे जालक पटल वेगळ्या पदधतीचे वेगळ्या पद्धतीचे असते आणि त्याची योजना वेगळ्या प्रकारे केली जाते.
उत्कीर्ण मुद्रण व अखंड गती उत्कीर्ण मुद्रण : याकरिता वापरण्यात येणाऱ्या यंत्राच्या चक्रीय गतीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या. यात दंडगोलाच्या पष्ठावर अत्यंत सूक्ष्म अशा पेशीसारख्या छिद्रांचे कोरण हाताने करणे जुरूर होते व दंडगोलावर कोरण्याची क्रिया सरळ करावी लागत होती, कारण मधे कुठलीही पायरी अजून सापडलेली नव्हती. दंडगोलावरील जादा शाई पूर्णपणे काढून टाकण्यासाठी रबरी पट्टी वापरता येत नव्हती कारण ती जोडावयाच्या ठिकाणी एकविध (एकसारखा) पृष्ठभाग मिळणे आवश्यक होते व त्यामुळे तांब्याचा वक्राकार पृष्ठभाग वापरणे शक्य होत नव्हते. शिवाय तांब्याच्या दंडगोल पृष्ठावर पक्का चिकटून राहील असा योग्य प्रकाशसंवेदी रसायनांचा थर त्या काळात सापडलेला नव्हता.
ब्रिटनमध्ये १८६२–६४ या काळात जे. डब्ल्यू. स्वान यांनी प्रकाशसंवेदी कार्बन कागदाचा शोध लावला. या कागदावर कार्बनसारखे रंगद्रव्य व प्रकाशसंवेदी केलेले जिलेटीन यांच्या मिश्रणाचा थर वापरलेला असे आणि त्यावर प्रथम प्रकाशक्रिया करून नंतर तो कागद धातूच्या वक्राकृती पृष्ठावर किंवा इतर अनियमित पृष्ठावर ठेऊन तो थर स्थानांतरित करता येत असे. साधारण १८९० मध्ये चेकोस्लोव्हाकियातील कार्ल क्किट्स (क्किक) यांनी कार्बन कागदावर सरळ रेषांचे जालक पटल तयार करण्याची कल्पना सुचवली. अशा सरळ रेषांच्या पटलामुळे त्या कागदावर एकदम मुद्रणप्रतिमा व ती प्रतिमा विभागणाऱ्या रेषा बरोबरच निर्माण करता येत असत व उत्कीर्ण मुद्रणासाठी त्यांचा उपयोग करता येत असे. १८९५ मध्ये कार्ल क्लिक यांनी काही इंग्रज सहकाऱ्यांबरोबर एक मुद्रणालय उत्कीर्ण मुद्रणासाठी सुरु केले. त्या मुद्रणालयामध्ये कागदावर अखंड गतीच्या उत्कीर्ण मुद्रणाच्या पद्धतीने चित्रांचे मुद्रण करण्यास सुरूवात केली मात्र मुद्रणाची पद्धत त्यांनी गुप्त राखली. याच धर्तीवर पण थोड्याशा वेगळ्या स्वरुपात उत्कीर्ण मुद्रण करण्यास जर्मनी व अमेरिका येथे सुरुवात झाली होती. या पद्धतीचे एकस्वही त्यांना मिळाले होते. या पद्धतीत ज्या चित्रांची छपाई करावयाची ती चित्रे सम प्रतीच्या स्वरूपात तयार करून नंतर कार्बन कागदावर स्थानांतरित करण्यात येतात तसेच जालक पटलामधून कार्बन कागदावरही रेषांचे स्थानांतर केले जाते. क्लिक यांनी त्यांच्या तंत्राबद्दल राखलेली गुप्तता मात्र फार वर्षे टिकली नाही व १९०३ नंतर तिचा अमेरिकेत सर्वत्र प्रसार झाला.
विसावे शतक : विसाव्या शतकाच्या सुरवातीला प्रतिरूप (ऑफसेट) मुद्रणाची सुरूवात होऊन इतर बरीच नवीन तंत्रे उद्यास आली आणि प्रचंड उत्पादन, मोठा वेग काटकसरीने उत्पादन केल्यामुळे कमी खर्च या सर्व गोष्टी साध्या झाल्या.
प्रतिरूप मुद्रण तंत्राचा शोध : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिलामुद्रणाचा विकास पद्धतशीरपणे होत होता. शिलामुद्रणाची यंत्रे पूर्णावस्थेला पोचल्यानंतर या तंत्राचा विकास दोन मुख्य दिशांनी चालू होता : (१) पातळ अशा पत्र्यांवर (उदा., खाद्यपदार्थाच्या हवाबंद डब्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या कथिलाच्छादित पत्र्यांवर) मुद्रण करणेः यासाठी मुद्रणप्रतिमेचे स्थानांतर करून ती पत्र्यांवर प्रथम तयार करून मुद्रण करण्यापूर्वी प्रतिमा एका मध्यवर्ती पृष्ठावर (मध्यवर्ती पृष्ठ म्हणजे एक रबराचा पृषठभाग दंडगोलावर ताणून बसवलेला असे) स्थानांतरीत करून नंतर पत्र्यावर ती छापली जात असे. (२) कागदावरील मुद्रण : हे मुद्रण प्रतिरूप पद्धतीनेफारसे होत नसे. जे थोडे होत असे ते एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अखंड गतीच्या किंवा साध्या यंत्रावर होत असे.
इ. स. १९०४ च्या सुमाराला अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील नटूली येथे आय्. डब्ल्यू. रूवेल या मुद्रकांनी चुकून दाब देणाऱ्या रबरी पृष्ठावर मुद्रण केले आणि नेहमीच्या मुद्रित प्रतिमेशी या नवीन मुद्रणाची तुलना केल्यावर रबरावरून केलेल्या मुद्रणाचा दर्जा त्यांना चांगला वाटला (म्हणजे पत्र्यावरून प्रथम रबरी पृष्ठावर मुद्रणप्रतिमा स्थानांनतरीत झाल्यावर तिसऱ्या सपाट पृष्ठाच्या साहाय्याने कागद रबरी पृष्ठावर दाबून मुद्रण करणे), नंतर रूबेल व त्यांचे सहकारी यांनी तीन दंडगोल बसवून एक यंत्र तयार केले आणि त्याला प्रतिरूप मुद्रण (ऑफसेट) यंत्र असे नाव दिले. त्यानंतर हे मुद्रण तंत्र पुष्कळच विकसित झाले व अजूनही त्यात काही प्रमाणात सुधारणा चालू आहेत.
शुल्क प्रतिरूप मुद्रण : आणखी काही वर्षांनी धनादेश (चेक) छापताना एक अडचण निर्माण झाली. धनादेशांवर बनावट सह्या करण्यास आळा घालण्यासाठी धनादेशाच्या कागदाच्या पृष्ठभागावर (पार्श्वभूमीवर) पाण्यात विरघळणारी शाई वापरून मुद्रण करण्याची जरूरी भासली. त्यासाठी प्रतिरूप मुद्रणाचा पत्रा काढून त्याच्या जागी अक्षरांचा एक वक्राकृती साचा किंवा नायलॉनाच्या पृष्ठावर रासायनिक कोरण करून तयार केलेली मुद्रणप्रतिमा बसवून मुद्रण करण्याची योजना मांण्यात आली. पत्रा समपृष्ठी नसून त्यावर उठावाची मुद्रणप्रतिमा असल्याने त्या प्रतिमेवर प्रथम पाणी लावण्याची जरूरी नाही. प्रतिमेवर फक्त शाई लावून ती स्थानांतराने रबराच्या पृष्ठावर स्थानांतरीत करणे व नंतर कागदावर छापणे इतकेच करावे लागते. या तंत्राला शुल्क प्रतिरूप मुद्रण किंवा अक्षर-साचा असे संबोधिले जाऊ लागले. हे तंत्र फक्त धनादेशाच्या मुद्रणापुरते मर्यादितपणे वापरले जात नसून इतर पुष्कळ प्रकारचे मुद्रण या तंत्राने केले जाते. अमेरिकेमध्ये १९५० पासून आणखी एका संयुक्त तंत्राचा उपयोग मुद्रणासाठी केला जात आहे. अखंड गती उत्कीर्ण मुद्रणाच्या यंत्रावर आणखी एक दंडगोल बसवून त्यावरील रबरी थरावर मुद्रणप्रतिमा स्थानंतरित करून नंतर कागदाच्या ताटल्या प्लॅस्टिकच्या फरश्या, भित्तिकागद इ. वस्तुंचे मुद्रण सुरू झाले.
रंगीत मुद्रण : इ. स. १४५७ च्या सुमाराचे पेटर शफर यांनी सही केलेले एक सॉल्टर म्हणजे गाणी, स्तोत्रे व प्रार्थना यांचा समावेश असलेले बायबलचे पुस्तक (नंतर याचे श्रेय काही संशोधकांनी गूटेनबेर्क यांना दिले) होते. या सॉल्टरमधील प्रत्येक परिछेदाच्या सुरवातीचे मोठ्या आकारमानातील एक अक्षर त्या काळच्या हस्तलिखितांतील प्रथेप्रमाणे नक्षीदार व शोभायमान पद्धतीचे होते आणि ते दोन रंगांत छापलेले होते. याकरिता अशा अक्षराचे एकमेकांत बेमालूम बसतील असे दोन लाकडी ठोकळे तयार करण्यात आले होते आणि या दोन ठोकळ्यांवर वेगवेगळ्या रंगाची शाई लावण्याची सोय करून दोन रंग एकमेकांत बरोबर मुद्रित केलेले होते. सोळाव्या शतकात जर्मनीमध्ये अनेक लाकडी ठोकळ्यावर चित्रे कोरून त्याच्यावर शाई लावून अनेकरंगी मुद्रण करण्याचा प्रयेग केला गेला होता. सतराव्या शतकात धातूच्या पत्र्यावर हाताने कोरून त्याच्या वेगवेगळ्या भागांवर निरनिराळ्या रंगांची शाई लावून हा ठसा कागदावर एकदाच दाबून मुद्रण करण्याचेही प्रयोग झाले होते. १७१९ साली झाक क्रिस्फोट लब्लां या फ्रेंच मुद्रकांनी प्रथम काळ्या रंगाच्या आकृतीमध्ये पिवळा, लाल व निळा या रंगांच्या सहाय्याने चित्र छापण्याचा उपक्रम सुरू केला व त्याचे एकस्व इंग्लंडमध्ये मिळवले. त्यांनी पत्र्याच्या चार पृष्ठावर हाताने चित्रे कोरून प्रत्येक रंगाच्या महत्त्वाप्रमाणे त्यांचे मिश्रण संयोजित केले आणि एकच कागद यंत्रातून क्रमाक्रमाने निरनिराळ्या रंगांत चार वेळ छापून त्याचा बहुरंगी परिणाम साधला. एकोण्साव्या शतकात तिरंगी विघटनाचे तत्त्व व त्यांचा पुन्हा संयोग, छायाचित्रणाचे याबाबतचे तंत्र [→ छायाचित्रण], जालक पटलाचा त्यात केलेला उपयोग, रासायनिक द्रव्यांचे थर व त्यांचे निरनिराळ्या रंगांना असलेले प्रकाशसंवेदन वगैरे तंत्रांचा विकास साध्य झाला. या सर्वांमुळे प्रथम आधुनिक तिरंगी मुद्रण तंत्र पुष्कळच यशस्वी झाले.
अक्षरजुळणीचे स्वयंचालन : अगदी सुरूवातीपासून अक्षरजुळणीच्या तंत्रामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता आणण्याचे प्रयत्न चालू होते. या तंत्रात यांत्रिकीकरण व स्वयंचालन हे सर्वात मोठे प्रश्न महत्तम कार्यक्षमतेशी निगडीत होते. मोनोटाइप जुळणी यंत्राने एक प्रश्न सुटला होता. कारण पुष्कळदा कागदी फितींद्वारे प्रथम अक्षरफलकांच्या साह्याने अक्षरजुळणी करणे शक्य होते व खिळे पाडण्याचे एकच यंत्र अनेक अक्षरफलकांसाठी पुरेसे होते. १९२९ मध्ये अमेरिकेत दूरस्थ नियंत्रणाने अक्षरनिर्मिती यंत्राच्या साह्याने जी अक्षरनिर्मिती सुरू झाली त्यामुळे मानवी श्रमाशिवाय किती काम होउ शकते त्याचा प्रत्यय आला व दूरस्थ नियंत्रणामुळे स्वयंचलित यंत्रही किती श्रम वाचवू शकतात त्याचा अनुभव आला. मोनोटाइप जुळणीच्या अक्षफलकाचा चालक कागदी फितींवर छिद्रे पाडून प्राथमिक काम करतो व नंतर या फितींवरून भाषांतर करणारे साधन (यंत्र) कागदी फीत वाचून जरूर त्या मातृका एकत्र जमवून एकत्र किंवा त्यांच्या साह्याने अक्षरजुळणी करते. लायनोटाइप यंत्रावर अक्षराची एक पूर्ण ओळ जुळवता येते व त्याची तासाला २०,००० अक्षरे जुळवण्याची क्षमता असते आणि वर्तमानपत्राची अक्षरजुळणी बहुधा याच तंत्राने केलेली असते.
कार्यक्रमित अक्षरजुळणी : कागदी फितीवर छिद्रे पाडून अक्षरजुळणी करण्याच्या तंत्राच्या उत्पादनाची गती इतर तंत्रांच्या मानाने जरा मंद होती कारण यंत्र चालविणाऱ्या चालकाला ओळीच्या शेवटी शब्द नेमका कुठे तोडायचा याचा निर्णय स्वतः घेण्यास जास्त वेळ लागत असे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र स्वयंचलित रीत्या हा निर्णय चटकन घेण्याकरिता इलेक्टॉनीय साधने उपलब्ध झालेली आहेत.
इ. स. १९५० नंतर बी. बी. आर्. पद्धतीने कार्यक्रमित अक्षर जुळणीचे तंत्र सुरू झाले. बी. बी. आर्. ही अक्षरे तंत्र शोधून काढणाऱ्या तीन फ्रेंच संशोधकांच्या नावांची आद्याक्षरे आहेत. प्रथम अक्षरफलकाचा चालक कागदी फितीद्वारे अखंडपणे अक्षरजुळणी करीत रहातो व नंतर संगणक (गणकयंत्र) तेथून पुढील काम चालू करतो. ओळींची लांबी किती असावी, शब्द तोडायचा असल्यास तो कुठे व कसा तोडावा, चुकांची दुरुस्ती स्वयंचलित करतो. या कामाचा वेग चालकाच्या कागदी फितींद्वारे अक्षरजुळणी करण्याच्या वेगावरच मुख्यतः अवलंबून असतो. काही वेळा चालकाने तासाला ३,००,००० अक्षरे जुळवल्याची उदाहरणे आहेत. हा वेग पूर्ण ओळ जुळविण्याच्या आधुनिक यंत्रापेक्षा दहापट आहे. १९६० च्या नंतर छिद्रे पाडण्याच्या कागदी फितीऐवजी उपयोग प्रचारात आला. त्यामुळे वर उल्लेख केल्यापेक्षाही जास्त म्हणजे सेकंदाला १,००० अक्षरे (म्हणजे ताशी ३६,००,०००) जुळवणे शक्य झाले आहे. चुंबकीय फितीचा उपयोग शिशाची अक्षरे वा ओळी ओतून यांत्रिक जुळणी करिता वापरणाऱ्या यंत्रांसाठी करता येत नाही. तथापि इतर ज्या यंत्रांमध्ये शिशाचा व त्या अनुषंगाने वापराव्या लागणाऱ्या यांत्रिक साधनांचा जडपणा नसतो, त्या यंत्रांच्या बाबतीत चुंबकीय फितीचा उपयोग करून हा अक्षरजुळणीचा वेग मिळविणे व्यवहारात शक्य झाले आहे.
छायाक्षरजुळणी : अखंड गती उत्कीर्ण मुद्रणाचे तांब्याचे दंडगोल तायर करण्यासाठी किंवा प्रतिरूप मुद्रणाचे पत्रे किंवा अक्षरमुद्रणासाठी नायलॉनाचे पत्रे तयार करण्यासाठी प्रथम अक्षरांचे खिळे जुळवून ते एकत्र बांधून त्याच्या मुद्रितावरून (कागदावरून) छायाचित्र काढून त्याचा उपयोग वरील कामासाठी करणे ही प्रक्रिया तर्कशुद्ध नाही असे वाटू लागले होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी या विशिष्ट कारणासाठी एक नवीन यंत्र तयार करण्याची कल्पना पुढे आली. लडलो तंत्राने ज्याप्रमाणे जाड मथळ्याच्या ओळी जुबळल्या जात असत त्याप्रमाणे अक्षरांच्या पारदर्शक मातृका पट्टीवर जुळवून प्रत्येक मथळ्याच्या ओळीचे छायाचित्रण करण्याचे ‘फोटोलाइन’ नावाचे तंत्र १९१५ मध्ये विकसित झाले.
त्यानंतर छायाक्षरजुळणीसाठी विविध नवीन यंत्रे तयार करण्यात आली. यंत्रात जसजशी सुधारणा होत गेली तसतसा त्यांच्या परिणामांमध्ये फरक पडत गेला व तंत्रही पुष्कळ सुधारले. १९४५–५० या कालखंडात जी यंत्रे तयार झाली त्यांना पहिल्या पिढीतील यंत्रे असे नाव मिळाले. सध्या या यंत्रांची चौथी पिढी चालू आहे व मधल्या काळात त्यांच्या आणखी दोन पिढ्या होऊन गेल्या. इतक्या पिढ्यांमध्ये या अक्षरजुळणीच्या तंत्रात इतकी प्रचंड प्रगती झाली आहे की, आता एका तासात छायाक्षरजुळणी पद्धतीने प्रगती झाली आहे की, आता एका तासात छायाक्षरजुळणी पद्धतीने ३० लक्ष अक्षरे जुळवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. चौथ्या पिढीतील यंत्रांत लेसर किरणांचा [→ लेसर] उपयोग करण्यात येत असल्यामुळे या यंत्रांची क्षमता वर उल्लेखिल्यापेक्षाही जास्त झाली आहे.
सरळ (यंत्राशिवाय) मुद्राणाच्या दिशेने प्रगती : या वेगाने जर अक्षरजुळणी केली, तर कागदावर मुद्रण करण्याइतकाच या अक्षरजुळीचा वेग होतो. जर हा वेग आणखी वाढला, तर आणखी एक शक्यता निर्माण होते. ती शक्यता म्हणजे मुद्रणयंत्राची जरूरच भासणारा नाही कारण मुद्रणयंत्रावरील छपाईचा जो वेग आहे त्याच्याहून जास्त वेगाने अक्षरजुळणी केल्यास यंत्रातून प्रत्येक कागद छापून बाहेर पडायला जेवढा वेळ लागेल त्याहून कमी वेळात त्याची अक्षरजुळणी केल्यास यंत्रातून प्रत्येक कागद छापून बाहेर पडायला जेवढा वेळ लागेल त्याहून कमी वेळात त्याची अक्षरजुळणी होईल व नवीन कागद छापण्यापेक्षा नवीन अक्षरे जुळवणे जास्त वेगाने होईल. हे साध्य करण्यासाठी छायाक्षरजुळणीकरिता वापरल्या जाणाऱ्या फिल्मच्या जागी एखादे स्वस्त असे संवाहक पृष्ठ तयार करून दाब न देता त्यावर अक्षरे उमटतील अशी योजना करावी लागेल.
कागदावर दाब न देता त्यावर मुद्रण करण्याची बरीच तंत्रे सध्या उपलब्ध झालेली असून वापरलीही जात आहेत. १९२३ साली दंडगोलाच्या आकाराच्या साच्यावरून शाई कागदावर विद्युत् भाराच्या द्वारे ओढली जाण्याचे तंत्र विकसित झाले. १९४८ साली दोन अमेरिकनांनी एक नवीन स्थिर विद्युत तंत्र शोधून काढले. या तंत्रात मुद्रणासाठी जे रंगद्रव्य वापरले जाते ते शाईच्या स्वरूपात नसून ते पूड किंवा विद्राव्य असून पत्र्यावरील विद्युत् भाराकडे आकृष्ट होणारे असते. अर्थात पत्रा प्रथम विद्युत् भारित करावा लागतो. याच तंत्राच्या साह्याने भित्तीपत्रके व नकाशे छापणेही शक्य झाले आहे.
दाब न देता मुद्रण करण्याचे तंत्र दुसऱ्याही एका दिशेने प्रगत झाले आहे. छायाक्षरजुळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राचा यासाठी उपयोग केला जातो. १९६४ साली प्रथमच जपानमध्ये मैनिशी शिंबून या वर्तमानपत्राने याबाबतीत प्रयोग करून पाहिला. ऋण किरण नलिकेच्या पडद्यावर वर्तमानपत्राच्या सबंध पानाची प्रतिमा प्रथम जुळवून दूरचित्रवाणीप्रमाणे रेडिओ तरंगांद्वारा त्याचे प्रेषण करण्यात आले. या कागदावर रासायनिक प्रक्रिया करावी लागत नाही व प्रतिमा मात्र वाचण्याजोगी मिळते [→ अमुचित्र-प्रेषण].
जाळीमुद्रण व कोलोटाइप : मुद्रणाचे जे तीन मुख्य प्रकार विकसित झाले आहेत त्याचप्रमाणे मुद्रणाचे इतरही काही प्रकार समांतरपणे विकसित होत आले आहेत. विसाव्या शतकामध्ये मुद्रणाचे हे इतर प्रकार यशस्वीपणे टिकून राहिले व त्यांचा योग्य तो विकासही झाला. अशा प्रकारांमध्ये जाळीमुद्रण व कोलोटाइप या या तंत्राचा विकास लक्षात घेण्याजोगा झाला.
चीन व जपानमध्ये अक्षरदाब मुद्रणाचा विकास होण्याआधी किती तरी वर्षे रेशमी कापडाच्या जाळीतून शाई जोराने दाबून मुद्रण करण्याचे तंत्र अवगत होते. या तंत्रात एकाद्या चित्राचे मुद्रण अशा कापडाच्या जाळीचा अनावश्यक भाग बंद करून उरलेल्या भागाच्या कापडातून शाई दाबून खालील पृष्ठावर उठवून केले जात असे. एकोणीसाव्या शतकात फ्रान्समध्ये या तंत्राचा वापर कापडावर छपाई करण्यासाठी केला जात असे. १९३० नंतर इंग्लंडमध्ये व अमेरिकेमध्ये काच, लाकूड, प्लॅस्टिक यांसारख्या विविध पदार्थांपासून बनविलेल्या व निरनिराळ्या आकारांच्या वस्तूंवर या जाळीमुद्रणाच्या पद्धतीने छपाई होऊ लागली. जाळीमुद्रणाचे स्वरूप प्रथम एक हस्तकला असे होते पण अलीकडे त्याची मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक तंत्रात गणना होऊ लागली आहे. या मुद्रणासाठी अलीकडे नायलॉनाच्या कापडाची जाळी वापरली जाते आणि तिच्यावर एक प्रकाशसंवेदी रासायनिक थर पसरून सम प्रतीच्या साह्याने तीवर प्रकाशक्रिया केली जाते व मुद्रणप्रतिमा तयार होते. मुद्रणही जास्त वेगाने व स्वयंचलित यंत्रांवर होऊ लागले आहे.
फ्रान्समध्ये १८५५ मध्ये फोटोकोलोग्राफी या नावाचा एक मुद्रणप्रकार अस्तित्वात होता व त्याचे एकस्व तेथे घेतलेले होते. पुढे १८६५ मध्ये त्यात सुधारणा होऊन त्याचे नाव फोटोटाइपी असे बदलले गेले व अजूनही त्याचा उपयोग लहान प्रमाणावर तेथे केला जातो. १८६८ मध्ये जर्मनीत हाच मुद्रणप्रकार आल्बरटाइपी या नावाने ओळखला जात असे. या मुद्रणप्रकारामध्ये प्रकाशसंवेदी पृष्ठाचा उपयोग मुद्रणप्रतिमा स्थानांतरित करण्यासाठी न करता सरळ मुद्रणासाठीच केलेला असतो. १८८० ते १९१४ या काळात या मुद्रण तंत्राचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जात होता पण नंतर या तंत्राकडे बरेच दुर्लक्ष झाले. या काळात हे तंत्र कोलोटाइप या नावाने ओळखले जात असे. अलीकडे या मुद्रण तंत्राचे पुनरुज्जीवन झाले आहे आणि एक किंवा बहुरंगी मुद्रणसुद्धा या तंत्राने केले जाते. हे तंत्र समपृष्ठ मुद्रण (प्रतिरूप मुद्रणासारखे) या प्रकारात समाविष्ट होते.
अक्षरदाब मुद्रणाच्या प्रकारात समाविष्ट होणारे आणखी एक तंत्र नम्य मुद्रण (फ्लेक्सोग्राफी) या नावाने ओळखले जाते. या तंत्रामध्ये रबराच्या पट्टीचा किंवा मोठ्या तक्त्याचा उपयोग करून एक मुद्रणप्रतिमा तयार केली जाते. त्या प्रतिमेवर अगदी पाकळ शाई रूळांच्या साह्याने लावली जाते व ही शाई खास करून या तंत्रामध्येच वापरली जाते. या तंत्रामध्ये फार उच्च दर्जाचे मुद्रण होत नाही पण भरड पृष्ठभागाकरिता ( उदा., कागदाच्या थरांनी बनविलेला जाड पुठ्ठा, आवेष्टन कागद, प्लॅस्टिकचे वा धातूचे पटल) हे तंत्र सहज वापरता येते. मुख्यतः कागदाच्या रिळांवर या तंत्राने छपाई हल्ली केली जाते व त्यासाठी एकरंगी किंवा बहुरंगी मुद्रण यंत्रे उपलब्ध आहेत. या तंत्राची शाई पातळ असल्याने ती वाळवण्यासाठी गरम हवेचा वापर करावा लागतो.
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील औद्योगिकरणाच्या वेगामुळे व त्यामुळे निर्माण झालेल्या व्यवस्थापकीय कामामुळे मुद्रणाची मागणी फार मोठ्या प्रमणात वाढली. मालाची विक्री वाढवायला आकर्षक मुद्रण हे एक मुख्य कारण ठरले. कचेऱ्यांमधील मुद्रित कागदांचा उपयोग खुपच वाढला. त्यामुळे त्यातील काही काम थोड्याश्या सोप्या यंत्राच्या साह्याने कचेरीतच करून घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि अलीकडे जी लहान आकारमानाची प्रतिरूप मुद्रणयंत्रे किंवा विजेवर चालणारे टंकलेखन यंत्र तयार झाले आहे त्याचा उपयोग अशा कामांसाठी फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. चक्रमुद्रण यंत्र (सायक्लोस्टाइल यंत्र) वापरून पत्रांच्या पुष्कळ प्रती कचेरीतच काढता येतात. नुसती पत्रेच नव्हे, तर रेखाचित्रेसुद्धा या पद्धतीने काढता येतात. १९०० सालच्या सुमाराला फ्रान्समध्ये छायाचित्राच्या पद्धतीने प्रती काढण्याची सोय झाल्यामुळे या पद्धतीच्या कामाला पुष्कळ वेग आला व चित्रांच्या बाबतीत अचूकपणा जास्त प्रमाणात मिळू लागला.
सर्व प्रकारच्या कागदपत्रांचे किंवा आकृत्यांचे किंवा रेखचित्रांचे द्विगुणन करण्याच्या (नकला काढण्याच्या) ज्या पद्धती सध्या उपलब्ध आहेत त्यांना ‘रिप्रोग्रामी’ या संज्ञेने ओळखले जाते. द्विगुणन व मुद्रण या दोन संज्ञांमधील सीमारेषा बरीच अंधुक झाली आहे, तरीही द्विगुणनाच्या ज्या सोयी आहेत, त्यांच्यामुळे जेव्हा आवश्यक असणाऱ्या प्रतींची संख्या मध्यम असते तेव्हा नेहमीच्या मुद्रणाशी ही पद्धत चढा-ओढ करू शकते. शिवाय सध्या सुरु झालेल्या छायाक्षरजुळणीच्या अत्यंत वेगवान पद्धतीमुळे द्विगुणन जास्तच सोपे झाले आहे. १९५० नंतर टंकलेखन यंत्रांत झालेल्या सुधारणांमुळे शब्दांच्या ओळी जास्त पद्धतशीरपणे टंकलिखित करता येतात व मुद्रित ओळीच्या बरोबर या ओळींचे साधर्म्य दिसते. या साधर्म्यामुळे चंकलिखित पद्धतीचे द्विगुणन कचेऱ्यांमध्ये जास्त लोकप्रिय झाले झाले आहे. छायाक्षरजुळणीमुळे त्याच्या वेगवान कार्यपद्धतीत भरच पडली आहे. [→ व्यावसायिक व कार्यालयीन उपकरणे].
मुद्रणाच्या उद्योगास जोडून इतरही अनेक अंगे त्याचाच एक भाग अशा स्वरूपात वाढली आहेत. ठसे बनविणे हा यातील महत्त्वाचा भाग आहे. मजकुराबरोबर चित्रे छापणे आता रूढ झालेले असून ठसे तयार करण्याचा संबंध प्रत्यक्ष मुद्रणाशी येतो. त्याचप्रमाणे मुद्राणाबरोबरच बांधणी करण्याचा उद्योग अनुषंगाने निर्माण झालेला आहे [→ पुस्तक.बांधणी]. पूर्वी ही कामे हाताने होत असत व अजूनही यांपैकी बरोच कामे हाताने पण त्याचबरोबर यासाठी आता यंत्रेही तयार करण्यात आलेली आहेत. घडी घालण्या, शिवण्याचे, कागद वा पुठ्ठा कापण्याचे, बांधणी करण्याचे, दाब देण्याचे, कागदाला भोके पाडण्याचे, क्रमांक घालण्याचे अशी मुद्राणाशी संबंधित असलेली अनेक प्रकारची यंत्रे निर्माण आहेत. औषधाच्या बाटल्या किंवा डव्या ठेवण्यासाठी पुठ्ठ्याची खोकी (कार्टन्स) छापून व योग्य ठिकाणी छापतानाच कापून त्यांची खोकी बनविणारीही यंत्रे आहेत. मुद्राणाची कला निर्माण झाल्यापासून चारशे वर्षात जेवढी प्रगती झाली, त्याच्या किती तरी पटींनी अधिक प्रगती विसाव्या शतकात झाली आहे व अजूनही ती होतच आहे.
भारतातील इतिहास आणि विकास : भारतामध्ये मुद्राण तंत्र प्रथम १५५६ मध्ये माहीत झाले. पोर्तुगीज लोकांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केले. ते सुरू करण्याचा मुख्य उद्देश येथील लोकांचे धर्मातर करून धर्मप्रसार करण्याचा होता. १५५७ मध्ये या मुद्राणाल्यामध्ये जो. बूस्तामांते यांनी सेंट झेव्हिअर यांचे Doutrina Christa हे पहिले पुस्तक छापले पण त्याची भाषा व लिपी मात्र परकी होती. मुद्रण तंत्राचा प्रसार मात्र तेथून भारताच्या इतर भागांमध्ये कोचीन, पुडीकाईल, अंबलक्कडू, त्रांकेबार वगैरे किनाऱ्यावरील गावी झाला. अंबलक्कडू येथे ‘मलबार टाइप’ या नावाने प्रथम जे. गॉनसॅलव्हिस यांनी १५५७ मध्ये खिळे तयार केले. त्यानंतर इग्नेशियस ऐशामोनी यांनी तमिळ लिपीतील खिळे प्रथम लाकडी साचे कोरून तयार केले. त्यांच्यापासून जे खिळे तयार केले त्यांचा उपयोग तमिळपोर्तुगीज भाषांचा शब्दकोश तयार करण्यासाठी केला गेला. सतराव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षाच्या काळापासून पुढे पोर्तुदीज लोकांनी मुद्रण तंत्राविषयी फारसे काही केले नाही आणि त्यात प्रगतीही केली नाही. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला डॅनिश धर्मप्रसारकांनी मुद्रणामध्ये पुन्हा काही नवीन गोष्टी करायला सुरुवात केली. वॉर्थामस झिगेनबाल्ग यांनी त्रांकेबार येथे Bibli Danulica हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले. हे पुस्तक म्हणजे बायबलच्या ‘नव्या करार’ चे तमिळ भाषेमध्ये केलेले भाषांतर होते. पूर्व जर्मनीमधील हाल येथे तयार केलेले तमिळ खिळे झिगेनबाल्ग यांनी मिळविले व त्या खिळ्यांनी वरील पुस्तक छापले. नंतर त्रांकेबार येथे मलवारी व तमिळ खिळे तयार करायला सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच काळापर्यत मुद्रणाचा व्यवसाय फारसा चालत नव्हता. अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात मात्र कलकत्ता, मद्रास व मुंबई या सर्व शहरात एकाच वेळी मुद्रणाचे तंत्र इंग्रज लोकांनी सुरु करून त्यात प्रगती करायला सुरुवात केली. १७७८ हे वर्ष भारतातील मुद्रण व्यवसायाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. या वर्षी ए ग्रामर ऑफ द बेंगॉली लँग्वेज हे पुस्तक कलकत्त्याजवळील हुगळी येथे अँडूज यांचेया छापखान्यात छपले गेले. त्याचे लेखक एन. बी. हॉलहेड हे होते. या पुस्तकांचे वैशिष्ट्य असे की, त्यासाठी लागणारे अक्षरांचे सर्व खिळे स्थानिकपणे सर चार्लस विल्किन्झ यांनी तयार केले होते. त्यातही दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे खिळे तयार करण्यासाठी एक भारतीय कारागीर शिक्षण देऊन तयार केला होता. त्यांचे नाव पंचानन कर्मकार असे होते. त्यांनी पुढे खिळे तयार करण्याची कला इतर भारतीय तंत्रज्ञांना शिकविली. नंतर चार्लस विल्किन्झ यांच्यावर कलकत्ता येथील नवीन सरकारी छापखाना सुरू करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्यांनीच नंतर देवनागरी व पर्शियन लिप्यांचे खिळे तयार केले.
मुंबई शहरातील मुद्रण प्रथम इंग्लंडमधून तयार करून आणलेल्या खिळ्यांच्या साह्याने केले जात होते. मद्रास प्रांतांमध्येही मुद्रण तंत्राने भक्कम पाया रोवला. तेथे तमिळ-इंग्रजी शब्दकोश १७७९ मध्ये व्हेपेरी येथे छापून प्रसिद्ध झाला. अठराव्या शतकाच्या शेवटी मुंबई, मद्रास व कलकत्ता या तिन्ही मोठ्या शहरांमध्ये आणखी बरीच मुद्रणालये निघाली व मुद्रण व्यवसायाचा पाया पक्का झाला. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुद्रणव्यवसायातील एक नवा टप्पा सुरू झाला.
इ. स. १८०० मध्ये कलकत्त्याजवळ सेरामपूर येथे विल्यम कॅरी यांनी स्वतःचा छापखाना चालू केला. त्यांनी पंचानन कर्मकार या प्रसिद्ध कारागिरांना बोलावून घेऊन नोकरी दिली व त्यांच्याकडून येथील विविध भाषांमधील अक्षारांचे साचे कोरून खिळे तयार करण्याचे काम सुरू केले. पंचानन कर्मकार व त्यांचे जावई मनोहर यांनी भारतातील बहुतेक सर्व लिप्यांमधील अक्षरे उत्तम प्रकारे तयार केली. शिवाय परदेशी भाषांच्या लिप्यांचे खिळेही त्यांनी तयार केले. चिनी लिपीसुद्धा त्यांनी हस्तगत केली. सेरामपूरची खिळे तयार करण्याची ओतशाळा ही भारतीय लिप्यांचे खिळे सहजपणे मिळण्याचे एकमेव ठिकाण होते व भारतातील छापखान्यांची गरज यशस्वीपणे भागवीत असे.
सेरामपूर येथील मिशनच्या छापखान्याने १८०१–३२ या काळात विविध भारतीय भाषा व परदेशी भाषा मिळून ४० भाषांमधील १२,००० ग्रंथ छापले. इंग्रज अधिकाऱ्यांनी फोर्ट विल्यम कॉलेज या शिक्षण संस्थेत भारतीय भाषांच्या शिक्षणासाठी मोठे उत्तेजन दिले व इंग्रज नागरिकांनी येथील भाषा शिकाव्यात म्हणून येथील भाषांमध्ये ग्रंथछपाईसाठी खूप खटपट केली. १८१८ मध्ये दिग्दर्शन व समाचार दर्पण नावांची नियतकालिके छापून प्रसिद्ध करण्याचे सर्व श्रेय विल्यम कॅरी व त्यांचा सेरामपूर मिशन छापखाना यांना द्यावे लागेल. मात्र त्याआधी १७८० मध्ये बेंगाल गॅझेट नावाचे दैनंदिन वृत्तपत्र जेम्स ऑगस्टस् हिकी यांनी सुरू केले. एकोणीसाव्या शतकात जसजसा साक्षरता व शिक्षण यांचा प्रसार वाढत गेला तसतसा मुद्रणव्यवसाय वाढत गेला व त्याला स्थैर्य येऊन एक भारदस्त परिणाम लाभले.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात व्यापार व आर्थिक देवाणघेवाण खूपच वाढल्यामुळे मुद्रणव्यवसायाला अतिशय जोरदार चालना मिळून जगभर हा व्यवसाय बराच फोफावला. मात्र भारतात परकीय सत्तेमुळे या व्यवसायाची वाढ फार सावकाश झाली. देशाची पुस्तकांची पुष्कळशी गरज परदेशांतून भागवली जात असे. ही परिस्थिती १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र एकदम बदलली. देशाचे शिक्षणविषयक कार्यक्रम व्यवस्थित ठरल्यामुळे व पंचवार्षिक योजनांना चांगली गती आल्यामुळे येथील मुद्रणव्यवसायाला जोराने चालना मिळून त्यात मोठी वाढ झाली.
महाराष्ट्रातील मुद्रणाचा इतिहास व विकास : छत्रपती शिवाजी महाराजांनी एक छापखाना उभारलेला होता परंतु त्यांना तो चालू करणे शक्य न झाल्याने त्यांनी १६७४ मध्ये तो गुजरातमधील भिमजी पारेख या व्यापाऱ्यास विकला, असे सागंण्यात येते. तथापि यासंबंधी विश्वसनीय असा तत्कालीन पुरावा उपलब्ध झालेला नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस मराठी राज्यकर्त्यांच्या लक्षात मुद्रणाचे महत्त्व आलेले होते. नाना फडणीसंच्या प्रयत्नाने तांब्याच्या पत्र्यावर गीतेतील श्लोक कोरून त्यांचे मुद्रण करण्याची योजना आखण्यात आलेली होती. तथापि १८०० साली नाना फडणीस वारले आणि नंतर मराठेशाहीच्या पडत्या काळामुळे या क्षेत्रात त्या वेळी पुढे प्रगती झाली नाही.
महाराष्ट्रातील मुद्रणाच्या इतिहासास १८१२ पासून खरा प्रारंभ झाला. त्या वर्षी अमेरिकन मिशनने मुंबई येथे मुद्रणालय सुरू केले. सेरामपूर येथून देवनागरी लिपीचे काही खिळेही त्यासाठी आणविले. त्यावर १८१७ साली छापलेले एक पुस्तक उपलब्ध आहे. या मुद्रणालयात नोकरीस असलेले टॉमस ग्रॅहम हे गोव्याकडील गृहस्थ मातृका तयार करण्यास शिकले. त्यांनी देवनागरी आणि गुजराती लिप्यांचे साचे बनवून त्यांच्या मातृका तयार केल्या व खिळेही पाडले. कॅरी यांनी अनेक जोडाक्षरे बनविली होती. ग्रॅहम यांनी मूळ अक्षरांचे काने काढून त्यांची अर्धी अक्षरे वापरून जोडाक्षरे बनविण्याची पद्धतनिर्माण केली. यामुळे लिपीतील जोडाक्षरांचीसंख्या बरीच कमी झाली. तथापि देवनागरी लिपीची जुळय़णी या काळात तिमजलीच होती. वरच्या मजल्यात वेलांट्या, मात्रा, अनुस्वार इ. मधल्य मजल्यात मुळाक्षरे व काने इ. आणि खालच्या मजल्यात उकार, ऋकारादी चिन्हे अशी असत आणि त्यांची एकत्रित तिमजली जुळणी करावी लागत असे. त्यासाठी देवनागरी लिपीचे खिळे दोन वेगवेगळ्या साच्यांवर पाडावे लागत. मुळाक्षरांसाठी जेवढी उंची लागे त्याच्या निम्म्या उंचीच्या मात्रा, वेलांट्या, उकार व ऋकार हे पाडले जात. जुळणी करताना वेलांट्या, मात्रा उकार इ. कान्याच्या टोकाशी जुळते असावे लागत. त्यासाठी जागोजाग कमी उंचीचे किळे (डग्री) वापरून मधली जागा भरून काढावी लागे. त्यासाठीही दोन प्रकारचे कमी उंचीचे साचे लागत. एक डिग्री खिळ्याकरिता व दुसरा दोन शब्दांमधील पट्टीकरिता. यांशिवाय आकडे. विरामचिन्हे यांच्यासाठी पूर्ण उंचीचा साचा लागे. अशा रीतीने निरनिराळ्या लांबी-रुंदीत पाडलेले हे खिळे एकत्र तिमजली पद्धतीने जुळविणे आणि मात्रा, वेलांट्या व उकार कान्याच्या टोकाशी बरोबर बसविणे हे काम जिकरीचे होई. तथापि अशाही पद्धतीने त्या काळात जुळणीचे काम केले जात असे आणि अद्यापही काही छापखान्यांत या पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
अमेरिकन मिशनच्या मुद्रणालयात मुद्रणाचे काम करणारे गणपत कृष्णाजी पाटील हे ग्रॅहॅम यांच्याकडून मातृका तयार करण्यास शिकले व १८२७ मध्ये त्यांनी स्वतःचे मुद्रणालय सुरू केले. तेथे चुनखडकावरून समपृष्ठ पद्धतीने छपाई करीत. अमेरिकन मिशन मुद्रणालयातील अशाच यंत्रावरून पाटील यांनी खिळ्यांचे अक्षर मुद्रणालयही सुरू केले. त्यासाठी त्यांनी देवनागरी व गुजराती अक्षरांचे खिळे पाडून घेतले. जावजी दादाजी चौधरी हेही ग्रॅहॅम यांच्याजवळ मातृका तयार करण्यास व त्यांपासून खिळे बनविण्यास शिकले. या वेळेपर्यंत खिळे पाडण्याची यंत्रे यूरोपात बनू लागली होती व त्यांचा वापर येथेही सुरू झालेला होता. पुढे जावजी दादाजी यांनी १८६४ मध्ये स्वतःची खिळे ओतण्याची ओतशाळा व १८६९ मध्ये निर्णयसागर मुद्रणालयही सुरू केले. राणोजी रावजी आरू हे त्यांना मातृका तयार करून देत त्यांच्या मातृकांचे वळण प्रमाणबद्ध, रेखीव व सुबक असल्याने जावजी दादाजींच्या खिळ्यांच्या ओतशाळेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.
या काळात खिळे पाडण्याच्या व जुळणीच्या पद्धतीत सुधारणा झाली. जुळणी सुकर होण्यासाठी उकार-ऋकाराचा मजला काढून टाकून कु-कू, खु-खू, कृ, गृ वगैरे अक्षरे बसविण्यात आली. यासाठी आणखी एका साच्याचा उपयोग करावा लागला. यामुळे पूर्वी पाच प्रकारचे साचे लागत त्या जागी सहा लागू लागले. उकार-ऋकारदिकांची स्वतंत्र ओळ बनविण्याची यामुळे जरूरी राहिली नाही पण मात्रा, वेलांट्या वगैरे बरोबर कान्यावर जोडण्याचे किचकट काम शिल्लकच राहिले. ते टाळण्यासाठी निर्णयसागर ओतशाळेने कि-की-के, खि-खी-खे अशी वेलांट्या-मात्रांसह अक्षरे बनविली. यामुळे जुळणी सोपी झाली पण देवनागरी लिपीतील खिळ्यांच्या संचातील संख्या वाढली. त्यामुळे खिळे ठेवण्याच्या कप्प्यांच्या पेटीच्या रचनेतही बदल करणे भाग पडले.
या काळात लायनोटाइप यंत्र तयार झाले होते व इंग्रजी वर्तमानपत्रांतून त्याचा वापर सुरू झाला होता. या यंत्राचा देवनागरी लिपी जुळविण्याच्या कामी उपयोग करण्याकडे अनेक संशोधकांचे लक्ष लागले होते. देवनागरी लिपी यांत्रिक पद्धतीने जुय़ळविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सु. पन्नासावर लोकांनी प्रयत्न केले व वेगवेगळ्या योजना सुचविल्या. भारतात यांत्रिक प्रगती फारशी झालेली नसल्यामुळे परदेशात तयार झालेल्या यंत्रावरच आपली लिपी कशी बसविता येईल या दृष्टीने विचार केला जात असे. देवनागरी लिपीची तिमजली जुळणी ही मुख्य अडचण होती. रोमन अक्षरांची जुळणी एकापुढे एक अक्षर टाकून करता येते व त्यांच्या डोक्यावर किंवा खाली अन्य चिन्हे येत नाहीत. लायनोटाइप यंत्रावर ९० प्रकारच्या मातृका बसविलेल्या होत्या, तर देवनागरी लिपीतील अक्षरांची संख्या पुष्कळच अधिक होती. लोकमान्य टिळकांनी यावर सुचविलेल्या योजनेत ११३ (म्हणजे २३ जास्त) मातृका लागत होत्या पण टिळकांना राजकीय कार्यामुळे या योजनेकडे लक्ष देणे पुढे शक्य झाले नाही. मध्यंतराच्या काळात मोनोटाइप यंत्रे तयार झालेली होती. या यंत्रावर २२५ अक्षरे बसू शकत होती म्हणून टिळकांनी या यंत्रावर देवनागरी लिपी बसविण्याच्या दृष्टीने नवीन योजना आखली व त्या दृष्टीने मातृका तयार करून खिळे पाडले. पण पुढे १९२० मध्ये टिळक दिवंगत झाल्याने ही योजना पूर्ण झाली नाही. तथापि त्यांचे हे काम कृ. के. गोखले यांनी पुढे चालविले. पण त्यांनी मोनोटाइप कंपनीशी पत्रव्यवहार करून सुचविलेल्या योजनेत काही दोष आढळल्याने ती व्यवहार्य ठरली नाही. यामुळे लिपीच्या वळणातच बदल करावा या दिशेने संशोधक नवनव्या योजना सुचवीत गेले. विनायक दामोदर सावरकर व गजानन भास्कर वैद्य यांनी मात्र आपआपल्या योजनांनुसार खिळेही बनविले होते परंतु लायनोटाइप व मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपी बसविण्याच्या दृष्टीने नंतर काही काळ प्रयत्न झाले नाहीत. या काळात देवनागरी लिपी यंत्रावर बसत नाही असे गृहीत धरून देशी भाषांकरिता रोमन लिपी वापरावी हा विचार सुरू झाला. सरकारने सैन्यातील लोकांसाठी हिंदी भाषेतील रोमन लिपीचा वापरही सुरू केला. तेव्हा पुन्हा देवनागरी लिपी यंत्रावर बसविण्याचे प्रयत्न सुरू झाले. शंकर रामचंद्र दाते यांनी टिळकांनी १९०४ मध्ये सुचविलेली व ज्याप्रमाणे खिळे तयार केलेली योजना अभ्यासली. या काळात जर्मनीत टायपोग्राफ नावाच्या यंत्रावर एका मातृकेवर दोन दोन अक्षरे बसविण्यात आली होती, त्यामुळे १८० अक्षरांत देवनागरी लिपीची जुळणी चांगल्या रीतीने करणे शक्य आहे असे दाते यांना वाटले व त्यांनी या दिशेने प्रयत्न केला. पण टायपोग्राफ कंपनीने हे काम करण्यास नकार दिला. पुढे दाते यांनी लंडनला जाऊन मोनोटाइप कंपनीच्या संचालकांना आपली योजना सांगितली. या कंपनीने पूर्वी केलेल्या प्रयत्नांतील दोषांच्या संबंधांतील चर्चेनंतर दाते यांनी कर्णाची सध्याची पद्धती सुचविली. त्यांच्या सूचनेप्रमाणे मोनोटाइप कंपनीने नमुन्याचे खिळे तयार केले. ही योजना यशस्वी ठरली व १९३१ च्या अखेरीस मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपीची जुळणी शक्य झाली. दाते यांच्या कर्ण पद्धतीचा अवलंब करून भारतातील मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ, कन्नड वगैरे अनेक भाषांच्या मातृका बनवून यांत्रिक जुळणी शक्य झाली आहे. विद्यमान लिपीच्या स्वरूपात बदल न करता देवनागरी व इतर भारतीय लिप्या आता यांत्रिक पद्धतीने जुळविल्या जात आहेत.
त्यानंतर १९३४ मध्ये हरगोविंद गोविल यांनी स्वतंत्रपणे प्रयत्न करून अमेरिकेत लायनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपी बसविली. तथापि त्यांच्या योजनेत मात्रा, उकार व वेलांट्या यांचा फार संकोच करावा लागत असल्याने त्यात लिपीच्या सौंदर्याची हानी झाली आहे, तथापि ती टाळून टिळकांच्या योजनेचा स्वीकार करून थोड्या फार फरकांसह देवनागरीच्य वळणात दोष निर्माण न होऊ देता ती लायनोटाइप बसविता येणे शक्य आहे. वर्तमानपत्रांना लायनोटाइप यंत्र अधिक उपयुक्त असल्याने त्या यंत्राचा व तत्सदृश इंटरटाइप यंत्राचा वापर देवनागरीसाठी सध्या केला जात आहे. लिपीच्या सौंदर्याची हानी पत्करूनही ते यंत्र वापरले जात आहे. यावरून त्याची आवश्यकता किती आहे, हे दिसून येते.
एका बाजूने यांत्रिक पद्धतीने जुळणी करणारी यंत्रे निर्माण झाली असता दुसऱ्या बाजूने हातांनी जुळणी करण्याच्या कामाची गती वाढविण्याच्या दृष्टीनेही दृष्टीनेही प्रयत्न सुरू होते. निर्णयसागर ओतशाळेने स्वरचिन्ह जोडून अनेक अक्षरे बनविली होती पण त्यामुळे खिळे ठेवण्याच्या कप्प्यांच्या पेट्या फार मोठ्या आकारमानाच्या कराव्या लागल्या. यामुळे पुस्तकाव्यतिरिक्त अन्य कामे करणाऱ्यांना एकाच प्रकारच्या खिळ्यात मोठी रक्कम गुंतवावी लागे. त्यावर गुजरात टाइप फौंड्रीने स्वरचिन्हे व्यंजनांना जोडून त्यांचे खिळे बनविण्याची आवश्यकता उरली नाही. तथापि या सर्वांच्या योजनांत अक्षरे निरनिराळ्या साच्यांवर पाडावी लागत असल्याने खिळ्यांच्या पेट्यांतील अक्षरांची संख्या पुष्कळच मोठी असे. अक्षरांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने सावरकरांनी अ आ ची बाराखडी प्रचारात आणली. रकारयुक्त जोडाक्षरे क्र, प्र, ग्र वगैरे अर्धा अक्षरांना जोडून बनविण्याची योजना प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. दाते यांनी मोनोटाइप यंत्रावर बसविलेल्या कर्ण पद्धतीने मात्र सर्व अक्षरे व स्वरचिन्हे एकाच साच्यावर पाडणे शक्य झाले असून अक्षरांची संख्याही काही प्रमाणात कमी करता आली आहे. मोनोटाइप पद्घतीत देवनागरी लिपीतील स्वरचिन्हांचे लोंबते भाग मोठे असल्याने काही प्रमाणात ते तुटत पण त्यातही दाते यांनी सुधारणा करून त्यास खालच्या बाजूने आधार दिलेला आहे. त्यामुळे हाताने जुळणीचे काम करणेही सोपे झाले आहे.
यापुढील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
“