म्हैसूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील कर्नाटकातील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ ७५,४५६ चौ. किमी. लोकसंख्या ७३,२८,८९६ (१९४१) वार्षिक उत्पन्न सु. ४८ कोटी रुपये. वायव्येस मुंबई इलाख्याचे धारवाड-उत्तर कानडा (कारवार) जिल्हे, नैर्ऋत्येस कोडगू (कूर्ग) आणि बाकी सर्व बाजूंनी मद्रास इलाख्याने वेष्टित अशा या संस्थानाची स्थापना चौदाव्या शतकाच्या अखेरीस उत्तरेतून आलेल्या यदुराय व कृष्णराय या दोन यादवकुलातील बंधूंनी आपल्या कर्तृत्वाने नंजनगूडजवळील हदिनाडु-कारुगहळ्ळी भागात जम बसवून केली. त्यांच्या वंशातील बेट्टद चामराजाने आपला रहिवास विद्यमान म्हैसूरजवळ हलवला (१५१३). सुरुवातीला विजयानगरचे मांडलिक असलेले संस्थान राक्षस-तागडीच्या लढाईनंतर (१५६५) जवळजवळ स्वतंत्रपणे वागू लागले व संस्थानिक स्वतःला ओडेयर (मालक) म्हणवून घेऊ लागले. राज ओडेयरने (कार. १५७६–१६१७) श्रीरंगपटण जिंकून तेथे आपली राजधानी नेली. (१६१०). चामराज ओडेयरने (कार. १६१७–३७) विजयानगरचा मांडलिक जगदेवरायाची चेन्नपटनची मोठी जहागीर राज्याला जोडली (१६३०). कन्नड रामायण लिहिले व श्रवणबेळगोळच्या मठाला देणग्या दिल्या. कण्ठीरव नरसराजाने (कार. १६३८–५७) आदिलशाही आक्रमणापासून श्रीरंगपटणचा बचाव केला. (१६३८) पण पुढे रणदुल्लाखान व शहाजी भोसले यांनी त्यास आदिलशाहीचे मांडलिक बनविले. त्याने मदुरेच्या नायकांबरोबर युध्दे करून दक्षिणेकडे राज्यविस्तार केला. नंतर त्याने स्वतःची टाकसाळ सुरू केली. व विजयानगरच्या तिसऱ्या श्रीरंगाला आश्रय दिला. पुढे तिसऱ्या श्रीरंगातर्फे श्रीरंगपटणावर हल्ला करणाऱ्या बिदनूरच्या शिवप्पा नायकाला त्याचा वारस दोड्डदेवराय (कार. १६५९–७२) याने परतवून लावले. व नंतर विजयानगरच्या सम्राटाची बिरुदे धारण केली. मदुरा आणि बिदनूरबरोबर युध्दे करून त्याने सक्करेपटणपासून सेलमपर्यंत व चिकनायकनहळ्ळीपासून कोईमतूरपर्यंत राज्यविस्तार केला. चिक्कदेवरायाने (कार. १६७२–१७०४) हेच धोरण पुढे चालवून दक्षिणेस पळणी-अन्नमलईपासून उत्तरेस मिदगेसी आणि पूर्वेस बारमहालपासून पश्चिमेस कोडगुबलमपर्यंत राज्य वाढविले. त्याने मराठ्यांविरुद्ध मोगलांची मैत्री संपादली आणि मोगल सुभेदार कासिमखानाकडून तीन लाख रुपयांना बंगलोर विकत घेतले. (१७८७). मंत्री तिरुमलरायाच्या साह्याने राज्याचे १८ शासकीय विभाग पाडले व नियमित डाक पद्धती चालू केली. विरोधकांना न जुमानता महसूल वाढवून तो नवकोट नारायण बनला. धर्म आणि विद्या यांचा तो आश्रयदाता असून स्वतःही ग्रंथरचना करी त्यानेच श्रीरंगपटणचे सौंदर्य वाढवले.

त्याच्यानंतर गादीवर आलेले राजे दुर्बळ निघाल्यामुळे अठराव्या शतकाच्या पूर्वाधात सत्ता देवराज, नंजराय इ. मंत्र्यांच्या हाती गेली. मंत्र्यांना दळवई म्हणत. कुर्नूल, कडप्पा, सावनूर, सीरा येथील नबाबांनी आणि मराठ्यांच्या वाढत्या सत्तेने म्हैसूरकडून अनेकदा खंडण्या घेतल्या. बाळाजी विश्वनाथ सोडून पुढल्या पेशव्यांनी मराठी राज्याच्या विस्तारासाठी दक्षिणेत वारंवार स्वाऱ्या करून १७७२ च्या आरंभी बंगलोर व श्रीरंगपटण गाठले पण मराठी फौजांना चौथाई कबूल करून चातुर्याने परतविणाऱ्या ⇨ हैदर अली या म्हैसूरच्या फौजेतील नायकाला याच काळात (१७५० पासून) महत्त्व आले. दळवई नंजरायास बाजूला सारून आणि राजवंशाला नजरकैदेत ठेवून हैदरने सर्व सत्ता बळकावली बिदनूर आणि मलबार जिंकले प्रसंगी फ्रेंचांची मदत घेऊन त्याने दक्षिणेस मदुरा, उत्तरेस तुंगभद्रा नदीपर्यंत राज्य वाढवले त्यासाठी त्यासाठी त्याला मद्रासचे इंग्रज, हैदराबादचे निजाम आणि पुण्याच्या पेशव्यांबरोबर युध्दे करावी लागली. इंग्रजांशी युद्ध चालू असतानाच तो वारला (१७८२). त्याने आरामाराचाही पाया घातला. त्याचा मुलगा ⇨ टिपू सुलतान याने राज्यव्यवस्था बदलली, व्यापारवृद्धीचे प्रयत्न केले. इंग्रजांच्या वाढत्या सत्तेविरुद्ध परराष्ट्राचे साह्य मिळवण्याचा प्रयत्न केला तथापि इंग्रज-मराठे-निजाम युतीविरुद्ध त्याचा पराभव झाला (१७८९–९२) आणि राज्य निम्म्यावर आले. फ्रेंचांनी इंग्लंडविरुद्धच्या युद्धात मदत करतो, या सबबीवर गव्हर्नर-जनरल वेलस्लीने हॅरिसला पाठवले. हॅरिसने श्रीरंगपटण जिंकले व टिपू त्या युद्धात मरण पावला (१७९९).

टिपूच्या पाडावानंतर इंग्रजांनी म्हैसूरचा बराच प्रदेश निजामाबरोबर वाटून घेतला व अविशिष्ट शिमोगा, म्हैसूर, कोलार, बंगलोर, चितळदुर्ग, हसन, कडूर व तुमकूर या जिल्ह्यांच्या प्रदेशांसाठी २४·५ लाख रुपये खंडणी ठरवून राजवंशातील कृष्णराज ओडेयर या अल्पवयी मुलाला गादीवर बसवले व पूर्णय्याला दिवाण नेमले. पूर्णय्याने त्याच्या मृत्यूपर्यत (१८१२) महसूल वाढविला पण १८११ मध्ये पूर्णाधिकार मिळालेल्या राजाने भरमसाट खर्च सुरू केला. त्याच्या गैरकारभारामुळे राज्यात वरचेवर होणाऱ्या भरमसाट बंडाळ्या इंग्रज तैनाती फौजेने मोडून काढल्या. परिणामतः १८३१ मध्ये त्याला पदच्युत करण्यात आले व कारभारासाठी ब्रिटिश आयुक्त नेमले गेले. त्याचा प्रमुख मार्क कब्बनने (१८३६–६१) शासन सुधारून म्हैसूरच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला. पदच्युत राजाने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या चामराजेंद्र ओडेयरला १८६७ मध्ये मान्यता मिळाली आणि तो वयात आल्यावर पूर्णधिकार मिळाले (१८८१). त्यावेळी केलेल्या तहानुसार इंग्रजांचे सार्वभौमत्त्व मान्य होऊन राजाचे अधिकार मर्यादित करण्यात आले. कब्वनच्या काळी शासनकेंद्र असलेले बंगलोर इंग्रजांकडे राहिले. शासनासाठी त्याने एक प्रातिनिधिक विधिमंडळासारखी संख्या स्थापून सी. रंगाचार्लू यास दिवाण नेमले. त्यांच्या मृत्यूनंतर के. शेषाद्रि अय्यर (कार. १८९३–१९०१) या दिवाणाच्या काळात रेल्वे, पक्क्या सडका, पाटबंधारे इ. सुधारणा झाल्या, महसूल वाढला व संस्थानाच्या भरभराटीला प्रारंभ झाला.

चामराजेंद्रानंतर (१८८१–९३) गादीवर आलेल्या कृष्णराज ओडेयरांच्या (कार. १८९३–१९४०) प्रदीर्घ कारकीर्दीत संस्थानची सर्वांगीण प्रगती झाली. व्ही. पी. माधवराव, मिर्झा इस्माईल विशेषतः सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इ. कर्तृत्ववान दिवाणांनी कारभार तर उत्तम केलाच, पण औद्योगिकीकरणात संस्थानला आघाडीवर नेले. विद्युत्‌ योजनांचा (शिवसमुद्रम्, शिंशा, गिरसप्पा, कृष्णराजसागर) उपक्रम प्रथम याच संस्थानात झाला. भद्रावतीला लोखंड-पोलादाचा कारखाना, कोलारच्या सोन्याच्या खाणी, रेशीम, चंदन, साबण, तेले, साखर, विजेची उपकरणे, चिनी मातीची भांडी, लोणारी कोळसा अशा अनेक उद्योगधंद्यांमुळे संस्थान संपन्न झाले. शेतीलाही सर्व प्रकारचे उत्तेजन मिळाले. कॉफीचे मळे वाढले. कृष्णराजसागराच्या धरणांमुळे चाळीस हजार हेक्टर जमिनीला पाणीपुरवठा होऊ लागला. शिवाय शेकडो तलाव बांधण्यात आले. संस्थानच्या मालकीचे स्वतंत्र लष्कर होते व त्यांचा एक व्यापारी प्रतिनिधी लंडन येथे ठेवला होता. याशिवाय संस्थानच्या मालकीची आगगाडी व वाहतूक सेवा होती. संस्थानात रेल्वेचा विस्तार झाला (सु. १,२२० किमी.). शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार झाला. संस्थानात ४६ मुलांची व १४ मुलींची दुय्यम विद्यालये, ३६१ मुलांच्या व ५५ मुलींच्या माध्यमिक शाळा व अनेक प्राथमिक विद्यालये होती. उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी संस्थानात वैद्यक, अभियांत्रिकी व स्थापत्य विषयांची महाविद्यालये स्थापण्यात आली व म्हैसूरला विद्यापीठ स्थापन झाले (१९१६). याशिवाय आरोग्याची चांगली व्यवस्था संस्थानात केलेली होती.

विधिमंडळाखेरीज १९०७ मध्ये संस्थानात विधानपरिषदेचीही स्थापना झाली. या द्विदल कायदेमंडळाचे १९२३ मध्ये काही अधिकार वाढले तथापि ब्रिटिश मुलखातील काँग्रेसच्या चळवळीमध्ये संस्थानी प्रजाही मोठ्या प्रमाणात भाग घेऊ लागली. संस्थानातील प्रजेने १९३७ मध्ये आंदोलन करून स्टेट काँग्रेसने पुढल्या वर्षी राजकीय पक्ष म्हणून सरकारी मान्यता मिळवली. १९४० मध्ये गादीवर आलेल्या जयचामराजेंद्र ओडेयरांच्या काळात संपूर्णतया जबाबदार शासनाच्या मागणीला आणखी जोर चढला. त्यामुळे लोकनियुक्त मंत्रिमंडळ स्थापन झाले (मुख्यमंत्री के. सी. रेड्डी–२४ ऑक्टोबर १९४७) तत्पूर्वीच संस्थाने भारतात विलीन व्हायला संमती दर्शविली होती. १९५० च्या राज्यघटनेनुसार म्हैसूर राज्याला ब दर्जा देण्यात आला, महाराज राजप्रमुख झाले. १ नोव्हेंबर १९५६ पासून सर्व कन्नडभाषिक प्रदेश एकत्र होऊन म्हैसूर (विद्यमान कर्नाटक) राज्य अस्तित्वात आले.

संदर्भ : 1. Forrest, Denys, Tiger of Mysore : The Life and Death of Tipu Sultan, Banglore, 1970.

            2. Josyer, G. R. History of Mysore and the Yadava Dynasty, Mysore, 1950.

            3. Wilks, Mark, History of Mysore, 2 vols., Mysore, 1932.

कुलकर्णी, ना. ह.