ब्रूटस, मार्कस जूनिअस : (इ.स.पू.सु. ८५-४२). रोमन मुत्सद्दी आणिसीझरच्या खून-कटातील एक प्रमुख सूत्रधार. त्याचा जन्म सधन व सरदार घराण्यात झाला. त्याचे वडील जूनिअस ब्रूटस तार्क्किनांचा उच्छेद केल्याबद्दल प्रसिद्ध होते. आई सर्व्हिला ही सुप्रसिद्ध सेनापती व तत्त्वज्ञ मार्कस पोर्शिअस केटो याची सावत्र बहीण होती. त्याच्या जन्माविषयी अनेक प्रवाद प्रसृत असून सर्व्हिला व सीझर यांच्या प्रेमाचेच ते अपत्य होते, असे म्हटले जाते कारण सीझर त्यास आपला मुलगा मानीत असे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यास त्याच्या चुलत्याने दत्तक घेतले. त्याचे शिक्षण रोममधील पारंपरिक पद्धतीनुसार झाले. विद्यार्थिदशेत त्याच्यावर केटोचा प्रभाव होता. त्यामुळे त्याने तत्त्वज्ञान विषयाचे विशेष अध्ययन अथेन्समध्ये केले. त्यानंतर तो राजकारणाकडे आकृष्ट झाला. पॉम्पीला मारण्यासाठी रचण्यात आलेल्या कटातही त्याचे नाव गोवण्यात आले (इ.स.पू. ५९) पण सिनेटने त्याची फारशी दखल घेतली नाही. पुढे तो केटोबरोबर टॉलेमीविरुद्ध लढण्यासाठी  सायप्रसला गेला (इ. स. पू. ५८). पॉम्पी व सीझरमध्ये मतभेद झाले तेव्हा त्याने पॉम्पीची बाजू घेतली आणि मदतीसाठी तो सिलिशियाला गेला तथापि पॉम्पी व सीझर यांचे संबंध पूर्ववत झाल्यावर त्याची अर्थ सचिव म्हणून निवड झाली (इ. स. पू. ५३). त्याने गॉलमध्ये सीझरच्या हाताखाली काम करण्यास नकार दिला आणि तो सिलिशियाला गेला. इ. स. पू. ५२ च्या रोममधील पॉम्पीवरील हल्ल्यात तो सहभागी झाला पण यादवी युद्धाचा धोका लक्षात येताच तो सिनेट पक्षाकडे वळला आणि सिलिशियातील प्रतिनिधीची (वकीलाची) नियुक्ती त्याने स्वीकारली (इ. स. पू. ४९). पॉम्पीच्या मृत्यूनंतर तो सीझरच्या बाजूला आला (इ. स. पू. ४८). सीझरने त्याची नियुक्ती प्रथम सिसॅल्पाइन गॉलचा गव्हर्नर म्हणून केली (इ. स. पू. ४६) आणि पुढे त्याला रोम शहराचा विशेष अधिकारी (प्रेटर) नेमले (इ. स. पू. ४४). तो स्टोइक तत्त्वज्ञानाचा कट्टर अनुयायी होता, म्हणून त्याला सीझरच्या हुकूमशाही वृत्तीचा तिटकारा आणि प्रजासत्ताकाबद्दल प्रेम होते रोममध्ये पुन्हा प्रजासत्ताकाची स्थापना व्हावी असे त्यास वाटे. तसेच झोटिंगशाहीला चिरडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ही स्टोइक तत्त्वज्ञानाची शिकवण त्यास मान्य होती. म्हणून तो गेयस कॅसिअस लाँगिनसच्या सीझर खून-कटात ब्रूटस-ॲल्बायनसबरोबर स्वेच्छेने सहभागी झाला. पुढे त्याला आणखी काही अनुयायी मिळाले आणि सिनेटमध्ये सीझरचा अमानुषपणे खून करण्यात आला (मार्च इ. स. पू. ४४). त्यानंतर अँटोनीने सर्व सत्ता हाती घेतली पण खून-कटातील कोणालाही शिक्षा केली नाही.

सीझरच्या खूनानंतर सु. पाच महिन्यांनंतर कॅसिअस व ब्रूटस यांनी मॅसिडोनियात जाऊन अँटोनीविरुद्ध सैन्याची जमवाजमव केली. त्यांनी काही विजय मिळविले. सिनेटने त्यांच्याकडे पूर्व भागातील नेतृत्वाची जबाबदारी सुपूर्त केली (इ. स. पू. ४३) पण पुढे ऑक्टेव्हियन (ऑगस्टस) कौंसल झाला आणि त्याच्या नेतृत्वाखालील सीझरच्या पक्षाच्या सैन्याचा पराभव ब्रूटसने सुरुवातीस केला परंतु कॅसिअसचा पराभव झाला आणि अँटोनी व ऑक्टोव्हियन यांच्या संयुक्त फौजांनी त्यांच्या सैन्याचा संपूर्ण पराभव फिलिपाई येथे केला (२३ ऑक्टोबर ४२ इ. स. पू.). तेव्हा प्रतिकार अशक्य आहे, हे लक्षात येताच ब्रूटसने मित्राच्या तलवारीवर मान टाकून आत्महत्या केली.

ब्रूटसच्या व्यक्तिमत्वाबद्दल प्राचीन व अर्वाचीन लेखकांमध्ये मतभिन्नता आढळते. तत्कालीन रोमन परंपरेत त्याची गणना प्लेटॉनिस्ट व स्टोइक तत्त्ववेत्त्यांत करण्यात येते. प्रजासत्ताकासाठी झगडणारा शेवटचा जेता, म्हणूनही त्याचा गौरव केला जातो. त्याने तत्त्वज्ञानविषयक सद्‌गुण, कर्तव्य आणि संयम या विषयांवर लेख लिहिले पण त्यांपैकी एकही अवशिष्ट नाही. तो चांगला वक्ता होता अशी वदंता आहे. सिसेरोबरोबरच्या पत्रव्यवहारातील नऊ खंडांपैकी (ग्रंथांपैकी) दोन उपलब्ध असून त्यांतून त्याची शैली, विद्वत्ता आणि स्वभावदर्शन होते. त्यामुळे पुढे इंग्रजी ललित साहित्यात ब्रूटस हा चर्चेचा विषय झाला परंतु सिसेरोला तो हट्टी, एकलकोंडा व दुराग्रही वाटत असे. विल्यम शेक्सपिअरने ज्यूलिअस सीझर या नाटकात ब्रूटसची व्यक्तिरेखा एक थोर रोमन सरदार अशी रेखाटली आहे तर माक्स रॅडिनने मार्कस ब्यूटस या नावाचेच स्वतंत्र नाटक लिहिले आहे (१९३९).

संदर्भ :  1. Hutchins, R. M. Ed. Great Books of the Western World: Plutarch, Toronto, 1952.

            2. Johes, E. Trans. Cicero’s Brutus or History of Famous Orators, New York, 1976.

           3. Syme Sir Ronald, The Roman Revolution, Oxford, 1939.

शेख, रुक्साना