मोहरी : मराठी भाषेत ‘मोहरी’ या सर्वसाधारण नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिकांच्या गटात पुढील निरनिराळी पिके भारतात लागवडीत आहेत : (१) मोहरी (राई), (२) सरसू (अथवा सरसव अथवा शिरस), (३) तोरिया (आथवा सरस) व (४) काळी मोहरी. सरसूमध्ये पिवळी व तपकिरी असे प्रमुख प्रकार लागवडीत आहेत. यांपैकी मोहरी, सरसू व तोरिया या पिकांची लागवड उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यांच्या बियांपासून खाण्यासाठी त्या भागात मोठ्या प्रमाणावर वापरात असलेले स्थिर तेल काढण्यात येते व ते बाजारात ‘सरसोंका तेल’ अथवा ‘कडुआ तेल’ या नावाने ओळखले जाते. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, प. बंगाल आणि आसाम या राज्यांतील जवळजवळ निम्म्या लोकांची तेलाची गरज वरील तीन पिके भागवितात. काळी मोहरी (हिं. बनारसी राई) उ. प्रदेश, पंजाब आणि द. भारतात मर्यादित प्रमाणावर लागवडीत आहे. तिचा खाद्य तेलाच्या उत्पादनासाठी उपयोग केला जात नाही. अन्नपदार्थांत मसाल्यासाठी व फोडणीसाठी बियांचा वापर केला जातो व त्यांपासून काढण्यात येणारे बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल औषधी उद्योगात महत्त्वाचे आहे. या सर्व वनस्पती क्रुसीफेरी (ब्रॅसिकेसी) कुलातील व ब्रॅसिका प्रजातीतील आहेत. प्रस्तुत नोंदीचे शीर्षक ‘मोहरी’ हे मोहरी व वर उल्लेख केलेल्या तत्सम पिकांसाठी आहे.
ब्रॅसिका प्रजातीतील तैलोत्पादक जाती मूळच्या समशीतोष्ण कटिबंधातील असून त्यांची उष्ण व उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांत हिवाळी हंगामात लागवड केली जाते. मोहरी व तत्सम पिकांच्या प्राचीनत्त्वाबद्दल दुमत नाही परंतु त्यांच्या उगमस्थानाविषयी मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांचा औषधासाठी उपयोग फार प्राचीन काळापासून माहीत असावा असे दिसते. ग्रीक व रोमन लोक मोहरीचा वापर औषधासाठी व स्वयंपाकात मसाला किंवा तोंडी लावण्यासाठी करीत. आयुर्वेदातील (चरक, सुश्रुत इ.) संहिता व निघंटूमध्ये सरसूचे वर्णन आहे.
भारत, चीन, पाकिस्तान, जपान, पोलंड, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स व स्वीडन हे ‘रेपसीड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोहरी आणि तत्सम पिकांच्या उत्पादनाचे प्रमुख देश आहेत. तेलाच्या उत्पादनाच्या बाबतीत चीनचा प्रथम क्रमांक असून जगातील रेपसीड तेलांपैकी सु. ३६% तेलाचे उत्पादन त्या देशात होते. भारतातील तैलोत्पादक पिकांमध्ये मोहरी गटातील पिकांचा दुसरा क्रमांक आहे. (पहिला भुईमुगाचा आहे). १९८०–८१ मध्ये या पिकाखाली भारतातील क्षेत्रे सु. ४० लक्ष हेक्टर व उत्पादन सु. २२·४७ लक्ष टन होते. देशातील तेलबियांखालील क्षेत्राच्या सु. २६% क्षेत्र या पिकाखाली होते. १९५०–५१ सालाशी तुलना करता १९८०–८१ सालात या पिकाखालील क्षेत्र दुपटीने वाढले. एकूण क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र उ. प्रदेशात होते. राज्यवार क्षेत्र (उतरत्या क्रमाने) पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष हेक्टरचे): उत्तर प्रदेश २२·८०, राजस्थान ३·६२, हरियाणा ३·०१, आसाम २·१३, मध्य प्रदेश २·१२, ओरिसा १·६२, प. बंगाल १·३२, पंजाब १·३२, गुजरात १·१९, बिहार ०·८१, जम्मू आणि काश्मीर ०·४० इतर राज्यांत फारच थोडे क्षेत्रे होते. महाराष्ट्रात ते फक्त ४,००० हेक्टर होते.
शास्त्रीय वर्णन व विशेष माहिती :(१) मोहरी : (हिं. गु. राई इं. इंडियन मस्टर्ड लॅ. ब्रॅ. जुंसिया कुल-क्रूसीफेरी, ब्रॅसिकेसी). या वर्षायू (एकाच हंगामात जीवनक्रम पूर्ण होणाऱ्या) ⇨ ओषधी वनस्पतीची उंची निरनिराळ्या प्रकारांत १ मी. पासून २ मी. पर्यंत असते. फांद्या पुष्कळ, पाने १५ ते ३० सेंमी. लांब, साधी, संवृत (देठ असलेली), केशहीन अथवा लवदार असतात खोडाच्या तळाकडील पाने वरच्या पानांपेक्षा मोठी व वीणाकृती (टोकास मोठे खंड व खाली लहान अपूर्ण खंड अशा आकाराची) असून टोकाकडील खंडगोलाकार असतो. वरच्या भागातील पाने आयात-कुंतसम (भाल्यासारखी) असून तळाकडे अरुंद शंकाकृती आणि शेंड्याकडे टोकदार असतात. फुलोरा [गुलुच्छ→ पुष्पबंध] पिवळट रंगाचा असतो. फळ [सार्षप → फळ] शुष्क, लांबट शेंगेसारखे, १–२५ ते ५ सेंमी. लांब, सरळ उभे असून त्याची चोच आखूड व मजबूत असते. फळात लहान गोल, तपकिरी अथवा गर्द तपकिरी व अश्लेष्मल (कोरड्या) बिया असतात. बियांवर जाळीदार सूक्ष्म रेषा असतात. फुले लहान असून फुलांची संरचना आणि इतर शारीरिक लक्षणे ⇨ कुसीफेरी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. ही स्वयंफलित जाती आहे.
बियांत ३०–३८% स्थिर तेल ०·४५% बाष्पनशील तेल असते. स्थिर तेल खाद्य असून ते फार तिखट असते, परंतु त्याला सरसूच्या अथवा तोरियाच्या तेलाप्रमाणे खवट वास नसतो. तेलाचे सर्वसाधारण उत्पन्न सरसूपेक्षा कमी असते.
हे पीक स्वतंत्र अथवा वाटाण्याबरोबर मिश्र पीक म्हणून घेतले जाते. मिश्र पिकात वाटाण्याच्या झाडांना मोहरीच्या झाडांचा आधारासाठी उपयोग होतो. मोहरीचे लागवडीतील अनेक प्रकार आहेत. ठेंगणे प्रकार उंच प्रकारांपेक्षा लवकर तयार होतात.
(२) सरसू : (अ) पिवळी सरसू : (लॅ. ब्रॅ. कँपेस्ट्रिस प्रकार यलो सरसू), (आ) तपकिरी सरसू (लॅ. ब्रॅ. कँपेस्ट्रिस प्रकार ब्राउन सरसू) आणि (३) तोरिया : (लॅ. ब्रॅ. कँपेस्ट्रिस प्रकार तोरिया). सरसू (पिवळी व तपकिरी) आणि तोरिया ही पिके ब्रॅ. कँपेस्ट्रिस या जातीचे निरनिराळे प्रकार असल्यामुळे त्यांत फार महत्त्वाचे असे आकृतिक भेद नाहीत. यासाठी त्यांचे शास्त्रीय वर्णन एकत्र दिले आहे. मुख्य भेद पेरणीपासून कापणीपर्यंतच्या काळाचा अथवा बियांच्या रंगाचा आहे. तोरिया लवकर म्हणजे ८५ ते १०० दिवसांत तयार होते. सरसूला ११० ते १५० दिवस लागतात. या पिकांत बियांच्या रंगावरून पिवळा, तपकिरी अथवा काळा असे प्रकार आहेत. वनस्पतींची उंची तोरियामध्ये ०·५ मी. पासून पिवळ्या सरसूमध्ये १·७५ मी. पर्यंत असते. खोडावर मेणासारख्या पदार्थांचा पातळ थर असतो. पाने साधी, एकाआड एक, सकर्णिक (कानाच्या खालच्या भागाप्रमाणे) आणि खोडाला वेढलेली असतात. त्यांचा सर्वसाधारण आकार वीणाकृती व अर्धपिच्छाकृती (अर्ध्यापर्यंत पिसासारखा विभागलेला) असतो. पानांच्या आकारात पुष्कळ विविधता आढळून येते रंग सर्वसाधारणपणे हिरवा परंतु पांढरट हिरव्यापासून गर्द हिरव्यापर्यंत निरनिराळ्या छटा आढळून येतात. फुलोरा गुलुच्छ वल्लरी [→ पुष्पबंध] प्रकारचा असून फुलांच्या आकारात विविधता आढळून येते. फळ (सार्षप) बहुधा सरळ असून त्याची चोच तुलनेने लांब असते. बियांचा रंग पिवळा (फिक्कट पिवळा, पिवळा वा गर्द पिवळा) किंवा तपकिरी (काळी छटायूक्त लालसर तपकिरी, लालसर तपकिरी, तपकिरी अथवा पिवळसर तपकिरी) असून त्या श्लेष्मल (बुळबुळीत) अथवा अश्लेष्मल (कोरड्या) असतात. त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत अथवा काहीसा खरबरीत असतो. बियांत स्थिर तेलाचे प्रमाण ३५–४८% असते.
सरसू हे भारतातील फार महत्त्वाचे तैलोत्पादक पीक असून त्याची लागवड विशेषकरून बंगाल, बिहार व उ. प्रदेशात करतात. तपकिरी सरसू हा प्रकार पंजाबमध्ये सर्वत्र लागवडीत आहे. इतरत्र हा प्रकार क्वचितच आढळून येतो. पिवळी सरसू उ. प्रदेश, प. बंगाल आणि बिहारमध्ये काही प्रमाणात लागवडीत आहे. त्याची लागवड सामान्यपणे गव्हाच्या अथवा सातूच्या पिकात मिश्र पीक म्हणून केली जाते.
३) काळी मोहरी : (हिं. बनारसी राई, काली सरसू इं. ब्लॅक मस्टर्ड ट्र मस्टर्ड लॅ ब्रॅ. नायग्रा) हा मोहरीचा प्रकार संपूर्णपणे स्वयंवंध्य (प्रजोत्पादनात अन्य व स्वजातीय व्यक्तीची आवश्यकता असणारा) आहे. वनस्पतीची उंची १·३ ते २·३ मी. असून फांद्या अनेक असतात. पाने साधी, १० ते २० सेंमी. लांब, एकाआड एक व लवदार असतात. तळाकडील पाने
मोठी, संवृत आणि विणाकृती असतात. शेंड्याकडील पाने लहान व अखंडित असतात. फुलोरा गुलुच्छ मंजरी [→पुष्पबंध] असून फुले लहान (०·८ ते १·२५ सेंमी. व्यासाची) व गर्द पिवळी असतात. फळ सार्षप, ०·६ ते १·२५ सेंमी लांब असून ते आराकृती (आरीसारखे अरुंद व लांब) आणि गाठाळ असून त्याची चोच लहान असते. पक्व फळे (शेंगा) फुलोऱ्याच्या अक्षाला खेटून असतात व त्यांत ३ ते १० फार लहान (१ ग्रॅम वजनात १,००० ते १,४००) गोल अथवा अंडाकृती, गर्द तपकिरी अथवा काळ्या श्लेष्मल बिया असतात. बाहेरच्या आवरणाखाली बियांचा रंग पिवळा असतो आणि त्यात ३३% स्थिर तेल व ०· ६८ ते १·२% बाष्पनशील तेल असते. मोहरी, सरसू व तोरिया यांच्या बियांच्या तुलनेने काळ्या मोहरीचे बी पुष्कळच लहान असते.
काळ्या मोहरीची लागवड मर्यादित प्रमाणात उ. प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत बागायती पीक म्हणून केली जाते. तिचा खाद्य तेलाच्या उत्पादनासाठी विशेष वापर केला जात नाही. लोणच्यासारख्या पदार्थांत व भाजी-आमटीमध्ये फोडणीसाठी वापर केला जातो आणि औषध उद्योगात वापरले जाणारे बाष्पनशील तेल ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून घटक अलग करण्याच्या प्रक्रियेने) काढण्यात येते. हे तेल अत्यंत दाहक असून त्वचेला त्याचा स्पर्श झाल्यास फोड येतात व फार आग होते. त्यात ५० पट अल्कोहॉल मिसळून मर्दन औषधाच्या रूपाने प्रतिक्षोभक आणि चर्मरक्तकर (कातडी लाल करणारे) म्हणून उपयोग करतात. फुफ्फुसांच्या विकारांवरही बाहेरून लावण्यासाठी या औषधाचा उपयोग करतात.
या वनस्पतीचा भारतात प्रवेश तुलनेने अलीकडील काळात झाला असे मानण्यात येते. यूरोपात ती तेराव्या शतकापासून लागवडीत आहे व तेथे ती तणासारखी वाढते. परदेशात या मोहरीची पूड पांढऱ्या मोहरीच्या (ब्रॅ. आल्बा) पुडीत मिसळून ‘टेबल मस्टर्ड’ या नावाने खाद्यपदार्थांना चव आणण्यासाठी वापरतात. ही पूड द्राक्षाच्या रसात (मस्ट) मिसळतात व यावरून मोहरीला मस्टर्ड हे इंग्रजी नाव प्राप्त झाले (ब्रॅ. आल्बाची लागवड भारतात होत नाही). याशिवाय मोहरीच्याच प्रजातीतील ब्रॅ. नेपस आणि ब्रॅ. कँपेस्ट्रिस या जातींच्या वनस्पतींना अनुक्रमे ‘रेप’ व ‘टर्निप रेप’ या नावांनी ओळखले जाते आणि त्यांची लागवड यूरोप व कॅनडात होते [रेप या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील रेपम = टर्निप (सलगम) या शब्दावरून झाली आहे]. त्यांच्या बियांना रेपसीड आणि तेलाला रेपसीड ऑइल या संज्ञा आहेत. व्यापक अर्थाने जगाच्या निरनिराळ्या भागांत पिकणाऱ्या ब्रॅसिका प्रजातीतील तैलोत्पादक पिकांना रेप व त्यांच्या बियांना रेपसीड या सर्वसामान्य नावाने ओळखले जाते. वनस्पतीविज्ञानदृष्ट्या जरी ही पिके ब्रॅसिका प्रजातीतील (निरनिराळ्या) सुस्पष्ट जाती अथवा प्रकारातील असली, तरी त्या सर्वांपासून निघणारे तेल जवळजवळ सारख्या स्थिरांकांचे (गुणधर्म दर्शक आकडे सारखे असलेले) व रासायनिक संघटनाचे असते आणि ते रेप ऑइल किंवा रेपसीड ऑइल या नावाने व्यापारात ओळखले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या जागतिक आकडेवारीत अशा सर्व पिकांच्या रेपसिड या नावाने निर्देश केला जातो. जगातील एकूण खाद्य तेलाच्या उत्पादनापैकी १०–१२% तेल रेपसीडपासून काढलेले असते.
भारतात व्यापारी भाषेत सरसू, तोरिया व तारामिरा या पिकांचा रेपसीड व राई (मोहरी) या पिकाचा मस्टर्ड या नावांनी उल्लेख केला जातो.
सुधारित प्रकार : मोहरी, सरसू व तोरिया या पिकांचे सुधारित प्रकार निरनिराळ्या राज्यांसाठी उपलब्ध आहेत व नवीन प्रकारांची त्यांत भर पडत आहे. मोहरीचे वरुणा, आर. एल. १८, प्रकाश, टी १६ व टी ५९ सरसूचे पुसा कल्याणी, व्ही. एच. एम. १, लाही टी ३६ व एम २७ हे काही सुधारित प्रकार उत्तर भारतात लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहेत.
हवामान व जमीन : मोहरी आणि तत्सम पिके उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांतील आहेत परंतु चांगल्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते. भारतात त्यांची लागवड सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत केली जाते. तोरियाला फार थंड हवामान मानवत नसल्यामुळे ते सप्टेंबरच्या मध्याला पेरून डिसेंबरमध्ये कापणीला येते.
ही पिके हरभरा, मसूर, जवस, गहू व सातू या रब्बी पिकांबरोबर मिश्र पीक म्हणून घेण्यात येतात किंवा भात, मका वा कडधान्यांच्या हळव्या प्रकारांच्या कापणीनंतर स्वतंत्र पीक म्हणन घेतात. दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटकात, काळी मोहरी नाचणीच्या पिकात मिश्र पीक म्हणून अथवा स्वतंत्र पीक म्हणून घेतात.
ही पिके हलक्या ते भारी गाळवट जमिनीत चांगली येतात.
मशागत : या पिकांची पूर्व मशागत सर्वसाधारणपणे गव्हाच्या पिकाप्रमाणे करण्यात येते. जमीन ४–६ वेळा नांगरुन भुसभुशीत करण्यात येते. मिश्र पिकासाठी दर हेक्टरी १·७ ते २·२५ किग्रॅ. व स्वतंत्र पिकासाठी ४·५ ते ६·७ किग्रॅ. बी लागते. मिश्र पीक घेण्यात येते त्या वेळी मोहरीची पिके एकाआड एक ओळींमध्ये १·३ ते २ मी. अंतरावर पेरतात अथवा संपूर्ण शेतात बी फोकून पेरतात. स्वतंत्र पीक म्हणून घ्यावयाचे झाल्यास मोहरी, तोरिया व तपकिरी सरसू ही पिके दोन ओळींत ४५ सेंमी. अंतरावर व पिवळी सरसू ३० सेंमी. अंतरावर पेरतात.
खते व आंतरमशागत : निरनिराळ्या पिकांना पुढीलप्रमाणे दर हेक्टरी नायट्रोजनाचे प्रमाण फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे : तोरिया ३४ किग्रॅ., सरसू ४५ ते ५७ किग्रॅ. व मोहरी ५७ ते ६८ किग्रॅ. तिन्ही पिकांना पाणी देणे फायदेशीर असते आणि विशेषतः मोहरीच्या पिकाला पाणी दिल्याने उत्पन्नात चांगली वाढ होते. पेरणीनंतर १५ दिवसांनी रोपांची विरळणी करतात. त्यानंतर जरूरीप्रमाणे खुरपणी व दोन वेळा कोळपणी करतात.
रोग व किडी : रोग : या पिकांवर करपा हा सर्वांत महत्त्वाचा रोग आहे. आल्टर्नेरिया ब्रॅसिकी कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) शेंगासह झाडाच्या सर्व हिरव्या भागांवर हा रोग आढळून येतो. सामान्य हवामानाच्या परिस्थितीत हा रोग शेंगावरचविशेष नुकसानकारक ठरतो. रोगाचे प्रमाण तीव्र असल्यास शेंगा धरण्यापूर्वीच संपूर्ण झाड वाळते. रोगाची तीव्रता फार असल्यास खोडाचा वरचा भाग आणि शेंगा वाळतात. रोगट शेंगांतील दाण्यांवरही रोगाचे ठिपके आढळून येतात. ४:४:५० कसाचे बोर्डो मिश्रण झाडावर फवारल्यामुळे रोगाची तीव्रता कमी होते. या रोगाशिवाय मोहरी पिकांवर पाच कवकजन्य, दोन व्हायरसजन्य व एक सूक्ष्मजंतुजन्य रोग आढळून येतात परंतु अपावादात्मक परिस्थिती वगळता सर्वसाधारणपणे या रोगांपासून विशेष नुकसान होत नाही.
कीड : काळी माशी : (मस्टर्ड सॉ फ्लाय लॅ. ॲथॅलिया प्रॉक्झिमा). ही कीड मोहरी व तत्सम पिके आणि क्रुसीफेरी कुलातील इतर वनस्पतींवर आढळून येते. काही वर्षी या किडीमुळे पिकाची पुन्हा पेरणी करणे आवश्यक होते. देशाच्या सर्व भागांत ही कीड आढळून येते. माशीची मादी पानांमध्ये अंडी घालते. त्यातून निघणारी सुरवंटासारखी अळी पाने खाते. किडीचे कोश जमिनीत असतात. क्षेत्र लहान असल्यास अळ्या हाताने वेचून मारणे हा खात्रीचा उपाय आहे. मोठ्या क्षेत्रात कोळपणी केल्याने माशीचे कोश उघडे पडल्याने ते पक्षी व अन्य प्राणी यांच्याकडून खाल्ले खातात. पिकावर ३% बीएचसी पिसकारल्याने चांगला परिणाम होतो.
(२) मावा : (लॅ. लिपॅफिस एरिसिमी). क्रुसीफेरी कुलातील सर्व पिकांवर ही कीड फार नुकसानकारक आहे परंतु मोहरी व तत्सम पिकांचे या किडीमुळे सर्वांत जास्त नुकसान होते. निकोटीन सल्फेट (४०%) १:८०० या प्रमाणात पाण्यात मिसळून अथवा ०·१% बीएचसी पायस अथवा ०·५% मॅलॅथिऑन फवाऱ्याने किडीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. यांशिवाय इतर ६–७ प्रकारच्या किडी मोहरी पिकांवर आढळून येतात परंतु त्यांपासून विशेष नुकसान एखाद्या वर्षीच होते
कापणी मळणी : निरनिराळी पिके वेगवेगळ्या वेळी कापणीसाठी तयार होतात. तोरिया ८५ ते १०० दिवसांत तयार होणारे पीक असल्यामुळे ते डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात अथवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तयार होते. मोहरी पेरणीपासून ११० ते १६० दिवसांत कापणीसाठी येते व त्याची कापणी फेब्रुवारीपासून मार्चपर्यंत चालू असते. पिवळी सरसू १२० पासून १६० दिवसांत व तपकिरी सरसू १०५ ते १४५ दिवसांत तयार होतात. झाडे पिवळी झाल्यावर विळ्याने कापणी करतात व उन्हात २ दिवस वाळू देतात. नंतर लाकडी दांड्याने शेंगा बडवून दाणे वेगळे करतात आणि वाऱ्यावर उफणणी करून स्वच्छ करतात.
उत्पन्न : सर्वसाधारणपणे हेक्टरी उत्पन्न ३९० किग्रॅ. मिळते. तोरियाचे सर्वांत कमी व राईचे सर्वात जास्त उत्पन्न मिळते. चांगल्या मशागतीखाली तोरियाचे हेक्टरी उत्पन्न ५०५ ते ७५० किग्रॅ. , सरसूचे ८९५ ते १,१२० किग्रॅ. आणि मोहरीचे १,१२० ते १,३४५ किग्रॅ. मिळते.
रासायनिक संघटन : मोहरीच्या बियांत जलांश ९%, प्रथिने ९%, वसा (स्निग्ध पदार्थ) ४०%, कार्बोहायड्रेटे २४%, तंतू २% आणि इतर घटक ४% असतात.
मोहरीचे तेल : मोहरी, सरसू व तोरिया यांच्या बियांपासून काढलेले तेल भारतात मोहरीचे तेल या नावाने व्यापारात ओळखले जाते. काळ्या मोहरीचा खाद्य तेलासाठी वापर करण्यात येत नसल्यामुळे मोहरीच्या तेलात त्याचा समावेश होत नाही. यूरोपात काळी मोहरी (ब्रॅ. नायग्रा) व पांढरी मोहरी (ब्रॅ. आल्बा) यांच्या बियापासून निष्कर्षणाने काढलेल्या तेलात मोहरीच्या बियांचे तेल (मस्टर्ड सीड ऑइल) व त्याच्याचपासून ऊर्ध्वपातनाने काढलेल्या तेलाला मोहरीचे तेल (मस्टर्ड ऑइल) अशा संज्ञा आहेत.
भारतात मोहरीचे तेल काढण्यासाठी घाणी (लाकडी व लोखंडी), संयंत्र (एक्स्पेलर), द्रवीय दाब यंत्र आणि विद्रावक निष्कर्षण [→ तेले व वसा] या पद्धतींचा अवलंब केला जोतो. घाणीतून तेल काढण्याची पद्धत भारतात फार पुरातन असून लाकडी घाणीतून ३०–३२% व लोखंडी घाणीतून ३३ ते ३५% तेल मिळते. संयंत्रातून ३४ ते ३८% तेलाचे उत्पादन मिळते परंतु तेलाला तिखट वास नसतो.
अशुद्ध तेल रंगाने फिकट पिवळे असते. खाद्य तेल म्हणून उपयोगाखेरीज मोहरीच्या तेलाचा वापर अंगाला चोळण्यासाठी व चोळण्याच्या (मालीश) औषधात केला जातो. हलक्या प्रतीचे तेल दिव्यासाठी वापरण्यात येते. मोहरीच्या बियांचा उपयोग मसाला म्हणून आणि विशेषतः लोणच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. पेंड जनावरांना खाऊ घालण्यात येते. हलक्या प्रतीच्या पेंडीचा उपयोग खतासाठी आणि जमिनीची संरचना सुधारण्यासाठी करण्यात येते.
मोहरीच्या पिकात बऱ्याच वेळा पिवळा धोतरा वाढलेला आढळून येतो. तो वेळीच काढला न गेल्यास त्याचे बी मोहरीच्या बियांत मिसळले जाते. काही वेळा हे मिश्रण २–५% पर्यंतसुद्धा आढळून येते व त्याच्या तेलाची मोहरीच्या तेलात भेसळ होते. धोतऱ्याचे तेल खाण्यात आल्यास त्यापासून प्रकृतीस अपाय होतो [→ धोतरा].
मोहरीचे तेल महाग असल्यामुळे भारतात त्याचा वापर उद्योगधंद्यात मर्यादित प्रमाणात होतो. परदेशात त्याचा मुख्य उपयोग वंगणासाठी, ग्रीज तयार करण्यासाठी व पोलाद धंद्यात पोलादाला पाणी देण्यासाठी करतात. रबर, नायलॉन व प्लॅस्टिक धंद्यात, तसेच मऊ साबणाच्या निर्मितीसाठीही या तेलाचा वापर करताता. वंगणासाठी वापरावयाच्या तेलात हवा मिसळून त्याची श्यानता (दाटपणा) वाढवितात.
मोहरी व तत्सम पिकांच्या कोवळ्या पानांच्या भाजीसाठी उपयोग केला जातो. सरसूच्या पानांची भाजी उत्तर भारतात फार आवडीने खातात. पाल्याचा उपयोग जनावरांना खाऊ घालण्यासाठी करतात. यासाठी तपकिरी सरसू सर्वात चांगली समजण्यात येते.
तारामिरा : (हिं. तारामिरा इं. रॉकेट लॅ. एरुका सटायव्हा). हे मोहरीसारखे पीक असून त्याची खाद्य तेलासाठी रुक्ष प्रदेशात, विशेषतः उत्तर प्रदेशाच्या मीरत, मथुरा व आग्रा या जिल्यांत आणि पंजाबात लागवड होते. त्याला खत देत नाहीत. ऑक्टोबरच्या अखेरपासून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पेरतात. यूरोपात या वनस्पतीचा सॅलडकरिता उपयोग करतात.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, Delhi, 1948.
2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.
3. Singh, Dharampal, Rape and Mustard, Hyderabad, 1958.
क्षीरसागर, ब. ग. परांडेकर, शं. आ. गोखले,वा. पु.
“