मोहरम (मुहर्रम) : इस्लामी कालगणनेचा पहिला मास. ‘मुहर्रम’चा शब्दशः अर्थ ‘पवित्र’ असा आहे. ‘पवित्र कुराणा’त (९·३६–३७) संकेतित केल्याप्रमाणे चार पवित्र मासांपैकी (मुहर्रम, शव्वाल, जिल्काद व जिल्हज्ज) मुहर्रम हा एक पवित्र मास होय. मुहर्रम पहिल्या तारखेपासून सुरू होऊन दहा दिवसापर्यंत चालतो. मुहर्रमच्या दहाव्या दिवसाला आशूरा म्हणतात. शिया लोक सुतकाचे दिवस म्हणून हे दिवस पाळतात. कारण मुहंमद पैगंबराचे नातू हजरत इमाम हुसैन हे आशूरेच्या दिवशी यजीद मुवावियाकडून हुतात्मे झाले. त्याची दुःखद स्मृती म्हणून पहिले नऊ दिवस ताजिये वा ⇨ ताबूत बसवून ते या दहाव्या दिवशी विसर्जित करतात. हजरत अली, हजरत हसन व हजरत हुसैन या हुतात्मात्रयीच्या हौतात्म्यास इस्लामी इतिहासात असाधारण महत्त्व आहे. आशूरा मुहर्रमचा पवित्र दहावा दिवस म्हणून आणि मुहर्रम हा सृष्टी उत्पत्तीचा महिना म्हणून सुन्नी मुसलमानांना पवित्र वाटतो. मुहंमद पैगंबरांनी आपल्या अनुयायांना आशूरा या दिवशी उपवास करण्यास व प्रार्थना करण्यासंबंधी आदेश दिला. तसेच या दिवशी स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे, डोळ्यात सुर्मा लावणे, अत्तर-सुगंध लावणे हे श्रेयस्कर असल्याचे सांगितेले आहे. शत्रूंशी शांततेचा तह करणे, सत्संग राखणे, अनाथांना आश्रय देणे व दानधर्म करणे यासंबंधीही त्यांनी आज्ञा केली. प्रेषितांनी आशूरेच्या उपवासाची विशेषेकरून महती सांगितलेली आहे.
आजम, मुहंमद
“