मोह : (माहवा हि. माहुआ, मोहवा, मौवा गु. महुडा क. हिप्पे सं. मधूक इं. साउथ इंडियन महुआ मोवा बटर ट्री, इंडियन बटर ट्री, मोवा ट्री लॅ मधुका लँगिफोलिया, बॅसिया लाँगिफोलिया कुल-सॅपोटेसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तीबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दले-दलिका-असलेल्या वनस्पतींच्या) वर्गातील एका मोठ्या वृक्षाचे नाव. म. इंडीका, म. लॅटिफोलिया अथवा बॅ. लॅटिफोलिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका वृक्षाला काही देशी नावे वर दिलेल्या नावांपैकीच असून दोन्हीवृक्ष एकाच प्रजातीतील दोन जाती आहेत कित्येक शारीरिक लक्षणे व गुणधर्म दोन्हींत समान आहेत त्यामुळे व्हान रोएक या शास्त्रज्ञांच्या मते हे दोन्ही वृक्ष भिन्न जाती नसून म. लाँगिफोलिया या एकाच जातीतील दोन प्रकार आहेत, असे समजणे योग्य ठरते लाँगिफोलिया हा एक प्रकार व लॅटिफोलिया हा दुसरा प्रकार समजावा. पुढे दिलेल्या वर्णनात म. इंडिका व म. लाँगिफोलिया अशा दोन जाती मानून स्वतंत्र वर्णने दिली आहेत.
(१) म. लाँगिफोलीया : हा मोठा भव्य, सु. २०–२५ मी. उंच, पसरट माथ्याच्या सदावर्णी चिकाळ वृक्ष दक्षिण भारतातील असून त्याच्या खोडावरती साल करडी अथवा गर्द तपकिरी व खवलेदार असते. पाने चिवट, सोपपर्ण, साधी, काहीशी लांबट व भाल्यासारखी ७·५–१२.५ सेंमी. X २·५–४·५ सेंमी. तळाकडे निमुळती व विशेषतः फांद्यांच्या टोकांकडे त्यांचे झुबके दिसतात. फुलेही फांद्याच्या टोकांस तशीच वाढलेली आढळतात ती अनेक, लहान व फिकट पिवळी सु.१·५. लांब व सुगंधी असतात संवर्त (पाकळ्यांच्या खालच्या भाग) तांबूस, लवदार व ४ संदलांचा असून पुष्पमुकुट घंटाकृती-नलिकाकार, मांसल व लवकर पडून जाणारा असतो. पाकळ्या ६–१२ केसरदले १६–२० [→ फूल]. मृदुफळ सु. ५ सेंमी. लांब, लंबगोल, पिवळे व कोवळेपणी लवदार असते. बिया पिवळ्या, चकचकीत, एक ते दोन, काहीशा चपट्या आणि अपुष्प (गर्भाभोवती अन्नांश नसलेल्या) असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सॅपोटेसी अथवा मधूक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. हा वृक्ष सह्याद्रीवरील मोसमी जंगलात, नद्या व ओढे यांच्या काठांनी सामान्यपणे आढळतो शिवाय दख्खन आणि द. भारतात अनेक ठिकाणीही त्याचा प्रसार झाला आहे. त्याची वाढ सर्व प्रकारच्या जमिनीत होते व तो काहीशा रुक्ष हवेतही वाढतो. अधिक पाऊस व ओली जमीनही त्याला चालते मात्र भरपूर प्रकाश आवश्यक असतो. हरिणे, गुरे व बांडगुळे यांचा त्याला उपद्रव होतो. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात त्याची छाटणी करTन ठेवलेल्या खुंटावर पुढे नवीन वाढ चांगली होते. मोहाच्या बियांचे तेल व्यापारात महुआ बटर, मोव्रा फॅट, इल्लिपे बटर, बॅसिया फॅट इ. नावांनी प्रसिद्ध आहे. भारताच्या अनेक भागांत मोहाची खाद्य फुले लोकप्रिय आहेत त्यांपासून मद्यही काढतात. मोहाचे लाकूड बांधकामात वापरतात. पुढे वर्णन केलेल्या मोहाच्या दुसऱ्या जातीच्या बिया, फुले व लाकूड आणि वर वर्णन केलेल्या जातीच्या त्याच वस्तू यांमध्ये उपयुक्ततेच्या दृष्टीने फारसा फरक नसतो.
(२) म. इंडिका : (मोहवा म. लॅटिफोलिया इं.बटर ट्री मराठी व इतर भाषांतील नावे वर दिल्याप्रमाणे). हा पानझडी वृक्ष सु. १२–१५ मी. उंच असून भारतात. बहुतेक सर्वत्र, सु. १, २०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात आढळतो. बहुधा तो शुष्क प्रदेशात खडकाळ किंवा काहीशा रेताड जमिनीत वाढतो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशातील ⇨ साल-वने इ. ठिकाणी तो सामान्यपणे आढळतो. उत्तर भारत व द. द्विपकल्प येथील सपाट भागी तो लावलेला दिसतो. जंगल तोडून लागवडीकरिता मोकळ्या केलेल्या वनात तो राखलेला असतो. खोडाची साल गर्द रंगाची व चिरा पडलेली असून पाने साधारणपणे म. लाँगिफोलियाप्रमाणे (७·५–२३ सेंमी. X ३·८–११·५ सेंमी.). चिवट, कोवळेपणी लवदार असतात. फुले अनेक, लहान व पाने दाट झुबक्यांनी फांद्यांच्या शेवटी येतात फुलांचा रंग व आकार वर वर्णन केल्याप्रमाणे असतो. संदले ४, क्वचित ५ पाकळ्या ७–१४ आणि त्यामध्ये २०–३० केसरदलांची तीन मंडले असतात. मृदुफळ सु. ५ सेंमी. लांब, लंबगोल, प्रथम हिरवट नंतर पिवळट लाल किंवा नारिंगी बनते. बिया १–४, पिंगट, लंबगोल, अपुष्प, चकचकीत, २·५–३·७५ सेंमी लांब असतात. इतर सर्व सामान्य लक्षणे ⇨ सॅपोटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आणि इतर गुणधर्म व उपयोग वर वर्णन केलेल्या जातीतल्याप्रमाणे असतात.
संदर्भ : 1. Cowon, D. V. Flowering Trees and Shrubs in India, Bombay, 1965.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.
3. Kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medical Plants, Vol. II New Delhi, 1975.
4. Santapu, H. Common Trees, New Delhi, 1966.
५. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.
पाटिल. शा. दा. परांडेकर, शं. आ.
“