मोलिना, तिर्सो दे : (१५८४ ?–१६४८). स्पॅनिश नाटककार. गॅब्रिएल टेलेझ हे याचे टोपणनाव. स्पेनच्या सुवर्णयुगातील एक मोठा नाटककार म्हणून प्रसिद्ध. माद्रिद (स्पेन) शहरी जन्माला. आल्काला विद्यापीठात शिकल्यानंतर १६०१ मध्ये त्याने ‘फ्रायर’ म्हणून शपथ घेतली. त्याने सु. ३०० ते ४०० नाटके लिहिली पण त्यांपैकी जवळजवळ ऐंशीच उपलब्ध आहेत. त्यांतीलही ३० नाटके नेमकी कोणी लिहिली याबद्दल शंका आहे. त्याच्या नाटकांचे पाच खंड १६२४ ते १६३३ या काळात प्रसिद्ध झाले. त्याच्या नाट्यकृतींत तलवारबाजी व प्रेमप्रकरणांनी आणि कटकारस्थानांनी भरलेल्या सुखात्मिकांपासून बायबलवर आधारित अशा भव्य धार्मिक नाटकांचा, तसेच एतिहासिक नाटकांचा देखील समावेश आहे. लोपे दे व्हेगा या समकालीन श्रेष्ठ स्पॅनिश नाटककाराचा आदर्श त्याच्या समोर असला, तरी आपल्या नाटकांतील पात्रांच्या, विशेषतः स्त्री पात्रांच्या सखोल मानसचित्रणाकडे व तत्कालीन सामाजिक प्रश्नाकडे तिर्सोने लोपे दे व्हेगापेक्षा जास्त लक्ष दिले असे दिसून येते. याखेरीज गतीमान कथानक आणि वास्तववादी संवाद भाषा व प्रसंग चर्चच्या अधिकाऱ्यांना अशोभनीय वाटल्यामुळे, १६२५ साली त्याला त्याबद्दल ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नाट्यलेखन थांबलेच. ला प्रुदेन्शिआ एन ला मुखेर (इं. शी. फेमिनिन श्रूड्‌नेस) हे त्याचे स्पॅनिशमधील उत्तम ऐतिहासिक नाटक समजले जाते. एल्‌ कॉन्देनादो पॉर देस्कानफियादो हे त्याच्या नावावर मोडणारे एक प्रसिद्ध धार्मिक नाटक. डॉन वॉन ही अनेक स्त्रियांना सहज मोहवून फसविणाऱ्या प्रेमिकाची व्यक्तीरेखा प्रथम तिर्सोनेच नाटकातून सादर केली. त्याच्या एल्‌ बर्लदॉर दे सेव्हिल्य या प्रसिद्ध नाटकात डॉन वॉनचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. विख्यात इटालीयन साहित्यिक बोकाचीओ ह्याचा प्रभाव दर्शविणाऱ्या गद्यकथाही त्याने लिहिल्या आहेत. आल्माझान (स्पेन) येथे तो निधन पावला.

 संदर्भ :McClelland, Ivy L. Tirso De Molina: Studies in Dramatic Realism, Liverpool, 1948.

कळमकर, य. शं.