आर्थिप्रेस्टे डे इटा: (सु. १२८०–सु. १३५१).  स्पॅनिश धर्मोपदेशक आणि कवी.  त्याचा जन्म बहुधा माद्रिदजवळील आल्काला दे एनारेस येथे झाला असावा. ग्वादालाहारा  प्रांतातील इटा या लहानशा शहराचा  तो डीन (एक धर्माधिकारी) होता.  त्याचे खरे नाव व्हान रूईथ असे होते परंतु या अधिकारपदामुळेच त्याला ‘आर्थिप्रेस्टे डे इटा’ असे नाव प्राप्त झाले.  त्याच्या बिशपने त्यास काही अज्ञात कारणांसाठी तेरा वर्षे तुरुंगात ठेवले होते.  लिब्रो डे कांटारेस ओ डे बुएन आमोर  (इं.शी. बुक ऑफ ट्रू लव्ह) या त्याच्या काव्यसंग्रहातील काही उताऱ्‍यांवरून त्यास हा तुरुंगवास घडला असावा, असे अनुमान काढता येते.  या काव्याचे स्वरूप संकीर्ण आहे.  मूळ काव्यविषयाशी कसलाही संबंध नसलेली अनेक उपाख्याने या काव्यात आहेत.  भावकवितेबरोबरच त्यात गद्यप्राय उतारेही आहेत.  त्याने आपल्या काळाचे चित्र त्यात स्पष्टपणे पण व्यक्तिगत दृष्टिकोनातून मांडलेले आढळते.  अभिजात साहित्य, चर्चविषयक साहित्य, अरबी, फ्रेंच आणि प्रॉव्हन्साल या भाषांतील साहित्य यांचा फार मोठा परिणाम त्याच्या या काव्यावर दिसून येतो.  या काव्यातील उपरोधामुळे तसेच आत्मपरतेमुळे त्याची अभिव्यक्ती अधिकच संपन्न व प्रभावी वाटते.

हंबर्ट, जॉ. (इं) पेठे, मो. व्यं. (म.)