मोर्ले, सर जॉन: (२४ डिसेंबर १८३८–२३ सप्टेंबर १९२३). इंग्लंडचा एक उदारमतवादी मुत्सद्दी आणि ग्रंथकार. त्याचा जन्म लँकाशर परगण्यातील ब्लॅकबर्न या ठिकाणी झाला. प्रारंभीचे शिक्षण चेल्टनहॅम येथे घेऊन, लिंकन महाविद्यालयातून (ऑक्सफर्ड) त्याने पदवी घेतली. पुढे कायद्याचा अभ्यास करून त्याने वकिली व्यवसायास सुरुवात केली (१८७३) आणि पत्रकार म्हणूनही तो लंडनमध्ये काम करू लागला. सॅटरडे रिव्ह्यूच्या संपादकमंडळात त्याला घेण्यात आले. लवकरच तो फोर्टनाइटली रिव्ह्यू या नियतकालिकाचा संपादक झाला (१८६७–८३). याशिवाय त्याने पॉल मॉल गॅझेटचे संपादन केले (१८८०–८३). पुढे दोन वर्षे मॅकमिलन्स मॅगेझीन या मासिकाचे त्याने संपादन केले. काही वर्षे त्याने इंग्लिश मेन ऑफ लेटर्स सीअरिझ् या मालिकेचे संपादन केले. याशिवाय क्रिटिकल मिसलिनीज, एडमंड बर्क, वॉलपोल, लाइफ ऑफ ग्लॅडस्टन आणि दोन खंडातील आत्मचरित्र रेकलेक्शन् ही त्याची मौलिक ग्रंथसंपदा.

मोर्लेने राजकारणातही भाग घेतला. १८८३ ते १९०८ या दरम्यान लिबरल पक्षातर्फे तो दोनदा ब्रिटिश संसदेवर निवडून आला. संसदीय कारकीर्दीत तो आयर्लंडचा सेक्रेटरीही होता (१८९२–९६). आयरिश होमरूलचा तो पुरस्कर्ता होता. भारतमंत्री म्हणून १९०५ ते १९१० या काळात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने ब्रिटिश मंत्रिमंडळामध्येही काम केले. पहिल्या महायुद्धात इंग्लंडने भाग घेतला, याच्या निषेधार्थ त्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भारतमंत्री असतानाच त्याला व्हायकाउंट किताब मिळाला होता (१९०८). उर्वरित जीवन त्याने आपले समग्र लेखन प्रसिद्ध करण्यात व्यतीत केले. ते कलेक्टेड वर्क्स या नावाने पंधरा खंडांत प्रकाशित झाले (१९२०). लंडनमध्ये तो मरण पावला.

भारतमंत्री म्हणून त्याने एकूण अपेक्षाभंग करणारे साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. त्याच्या कारकीर्दीतील मोर्ले-मिंटो सुधारणा ही महत्त्वची राजकीय घटना होय (१९०९). काँग्रेसमधील ना. गो. कृ. गोखले प्रभृती नेमस्त गटाला आपल्या बाजूस खेचणे, हाच १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणांचा प्रमुख हेतू होता. या सुधारणांमुळे राजकिय चळवळीत फूट पाडणारे, मुसलमानांसाठी वेगळे मतदारसंघ सुरू करण्यात आले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रस्तुत सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर पुढच्याच वर्षी जॉन मोर्लेची भारतमंत्रिपदाची कारकीर्द संपुष्टात आली. मोर्लेच्या मते भारतातील चळवळी या परंपरावादी आणि सुधारणाविरोधी उच्च ब्रिटिश अधिकाऱ्यांमुळे झाल्या. आत्मचरित्रात त्याने या अधिकाऱ्यांची तुलना रशियातील झारशाहीच्या कुविख्यात अधिकाऱ्यांशी केली आहे. राष्ट्रवादी चळवळींना दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने विविध प्रतिबंधात्मक जाचक कायदे केले आणि नेत्यांना कठोर शिक्षा दिल्या. आश्चर्य म्हणजे या शिक्षा अन्याय्य आणि सैतानी असल्याची टीका खुद्द मोर्लेने केली.

संदर्भ : Morley, John, Recollections, Vols. I &amp II, London, 1917.

 

कदम, व. शं.