सीटो : ( साउथ-ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन ). आग्नेय आशियातील प्रादेशिक बचाव ( संरक्षण ) यांसाठी स्थापन झालेली संघटना. तिची स्थापना आग्नेय आशियाई संरक्षणविषयक तहाद्वारे मानिला (फिलिपीन्स ) येथे ८ सप्टेंबर १९५४ रोजी करण्यात आली. या तहावर ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपीन्स या देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या. प्रत्यक्षात या तहाची अंलबजावणी १९ फेबुवारी १९५५ रोजी झाली. ह्या कराराचा उद्देश दक्षिण-पूर्व ( आग्नेय ) आशियाचे साम्यवादाच्या प्रसारापासून – विशेषतः कोरिया आणि इंडोचायना यांवर झालेल्या लष्करी आक्रमणातून हे दिसून आल्यामुळे – रक्षण करणे आणि कोणत्याही सदस्य राष्ट्रावर आक्रमण झाल्यास, त्या आक्रमणास सर्व सभासदांनी एकत्रित प्रतिकार करणे असा होता. हा प्रतिकार करारातील अटीप्रमाणे करावयाचा होता आणि सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी परस्परांनी सहकार्य करावे, असे करारात नमूद केले होते. या सुमारास मलेशिया व फिलिपीन्स येथील सत्ता उलथून पाडण्याचा प्रयत्न संघटित लष्कराकडून झाला होता. आग्नेय आशियातील इंडोचायना प्रदेशातील लाओस, व्हिएटनाम व कंबोडिया यांना या संघटनेत समाविष्ट करुन घेतलेले नव्हते, त्यामुळे ह्या करारात आशियातील थायलंड, फिलिपीन्स व पाकिस्तान हे फक्त तीनच देश होते. उर्वरित पाश्चात्त्य देश होते. भौगोलिकदृष्ट्या ह्या करारातील देश एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर असल्यामुळे सदस्य राष्ट्रांमध्ये आशियातील राजकीय आणि लष्करी प्रश्नांवर क्वचितच एकमत होई. त्यामुळे ह्या कराराची संरक्षणक्षमता कुचकामी व निष्प्रभ झाली. राजकीय दृष्ट्याही ह्या करारामुळे पाश्चात्त्य सदस्यांना विशेष फायदा झाला नाही. तसेच दक्षिण-पूर्व आशियातील अन्य राष्ट्रांनी परराष्ट्र धोरणात अलिप्तता अंगीकारली. परिणामतः त्यांचे लष्करी सामर्थ्य वाढले नाही. या संघटनेचे कार्यालय थायलंडमध्ये होते. संघटनेचे स्वतःचे असे सैन्य नव्हते. त्यामुळे सदस्य राष्ट्रांच्या लष्करावर अवलंबून राहावे लागे. प्रथम पाकिस्तानने या संघटनेतून सहभाग काढून घेतला (१९६८). फ्रान्सने १९७५ मध्ये आर्थिक मदत थांबविली, तेव्हा संघटनेची २० फेबुवारी १९७६ रोजी शेवटची बैठक झाली आणि पुढे औपचारिक रीत्या तिचे विसर्जन ३० जून १९७७ रोजी करण्यात आले.

शिंदे, आ. ब.