मोरोनी :हिंदी महासागरातील कॉमोरो द्वीपसमूहाची राजधानी व प्रसिद्ध बंदर. ते नैर्ऋत्य ग्रँड कॉमोरो बेटावर वसले आहे. लोकसंख्या २०,११२ (१९८०). त्याची स्थापना अरबांनी केली. १९५८ मध्ये मोरोनीला राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. तेथे काकाओ, व्हॅनिला, कॉफी व खनिज तेल यांचे उत्पादन होते. बंदरात आयात व निर्यातीच्या मालासाठी गुदामे बांधलेली आहेत. त्यांमध्ये खनिज तेलाची अधिक ने-आण होते. यांशिवाय शहरात सौम्य पेये व तेल शुद्धीकरणाचे छोटे कारखाने असून धातू व लाकूड यांच्या वस्तू आणि पॉट्सलान (सिमेंट) निर्मितीचे कारखाने आहेत. राजधानीमुळे शहरात अनेक प्रशासकीय कार्यालय वास्तू उभारण्यात आल्या असूनही येथे अनेक इतिहासकालीन अरबी मशिदी आढळतात. त्यांपैकी ‘चिआउंडा’ ही मशीद उल्लेखनीय आहे. दक्षिण मोरोनीतील इकोनी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
देशपांडे, सु. र.