आल्बेर्तो मोराव्हीआ

मोराव्हीआ, आल्बेर्तो : (२८ नोव्हेंबर १९०७–    ). इटालियन कथा-कादंबरीकार. रोम शहरी जन्मला. त्याचे वडील वास्तुविशारद होते. किशोरावस्थेतला बराचसा काळ आजारपणात गेल्यामुळे आल्बर्तोच्या औपचारिक शिक्षणात बरेच अडथळे आले परंतु ह्या काळात त्याने भरपूर वाचन केले. फ्रेंच, जर्मन, इंग्रजी ह्या भाषा तो शिकला. टाइम ऑफ इन्डिफरन्स (१९२९, इं. भा. १९५२) ही त्याची प्रकाशित झालेली पहिली कादंबरी परंतु प्रकाशित न झालेल्या अशा तीन कादंबऱ्या त्याने तत्पूर्वी लिहिल्या होत्या. टाइम ऑफ इन्डिफरन्स ही रोममधील एका डच मध्यम वर्गीय कुटुंबाच्या नैतिक अधःपाताची वास्तववादी कहाणी होय. विख्यात फ्रेंच साहित्यिक झां पॉल सार्त्र आणि आल्बेअर काम्यू ह्यांच्या अनुक्रमे ला नॉझे (१९३८, इ. शी. नॉसिआ) आणि ले त्राँज्य (१९४२, इं. भा. द आउटसाइडर, १९४६) ह्या गाजलेल्या अस्तित्ववादी कादंबऱ्यांची पूर्वसूरी म्हणून टाइम ऑफ इन्डिफरन्स ह्या कादंबरीकडे पाहिले जाते. मोराव्हीआच्या नंतरच्या साहित्यातील विशेष उल्लेखनीय साहित्यकृती अशा: कादंबऱ्या आणि कादंबरिका – द फॅन्सी ड्रेस पार्टी (१९४१, इं. भा. १९४७), आगोस्तीनो (१९४४, इ. भा. १९४७), द वूमन ऑफ रोम (१९४७, इं. भा. १९४९). डिस्ओबीडिअन्स (१९४८, इं. भा. १९५०), द कन्‌फर्मिस्ट (१९५१, इं. भा. १९५२), टू विमेन (१९५७, इं. भा. १९७४) आणि दि एम्प्टी कॅनव्हास (१९६०, इं. भा. १९६२). कथासंग्रह – रोमन टेल्स (१९५४, इ. भा. १९५६), मोअर रोमन टेल्स (१९५९, इं. भा. १९६३), पॅरडाइज (१९७०, इं. शी.) आणि द व्हॉइस ऑफ सी अँड अदर स्टोरीज (१९७६, इं. भा. १९७८).

व्यक्तीच्या प्रत्ययाला येणारी भावनिक शुष्कता, सामाजिक दुरावलेपण आणि प्रेमशून्य लैंगिकता हे मोराव्हीआच्या साहित्याचे काही लक्षणीय विषय होत. आपण अस्तित्ववादी असल्याचे मोराव्हीआने नाकारले असले, तरी अस्तित्ववादी प्रवृती त्याच्या साहित्यातून प्रतीत होतात, असे दिसते. प्रभावी निवेदनशैली आणि जिवंत संवाद ही त्याच्या साहित्याची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत. मॅन ॲज ॲन एंड (१९६३, इ. भा. १९६६) ह्या निबंधसंग्रहातून त्याने आपले वाङ्‌मयविषयक विचार व्यक्त केले आहेत. विविध भाषांतून मोराव्हीआचे साहित्य अनुवादिले गेले आहे.

संदर्भ : 1. Dego, Giuliano, Moravia, London, 1966.

            2. Pacifici, Sergio, A Guide to Contemporary Italian Literature, New York, 1962.

 

कुलकर्णी,अ.र.