मोरचूद : (कॉपर सल्फेट; ब्लू व्हिट्रिऑल). तांब्याचे संयुग. रासायनिक सूत्र CuSO4. 5H2O. निसर्गात हे कॅल्कन्थाइट या खनिजाच्या रूपात आढळते.

गुणधर्म : सजल मोरचुदाचे स्फटिक त्रिनताक्ष समूहातील [→ स्फटिकविज्ञान] व निळे असून त्यांच्यातील [Cu(H2O)4]++या आयनामुळे (विद्युत्‌ भारित अणुगटामुळे) निळा रंग येतो. निर्जल मोरचुदाचा रंग पांढरा असतो. मोरचूद पाण्यात सहजपणे, तर ग्लिसरीनमध्ये सावकाश व एथिल अल्कोहॉलात अल्प प्रमाणात विरघळतो. ह्याचे वि. गु. २·२८४ व चव मळमळ उत्पन्न करणारी असते. हा विषारी असून पोटात गेल्यास धोकादायक ठरू शकतो. हवेत उघडे राहिल्यास तिच्यातील बाष्प शोषून घेऊन हा ओलसर बनतो (म्हणून हा अनेक पदरी कागदी पिशव्यांत साठवतात).

सजल मोरचूद तापविल्यास त्याचे पुढीलप्रमाणे अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होते.

 

अशा प्रकारे निळ्या कॉपर सल्फेटातील पाण्याचे चार रेणू निघून गेल्याने १०० से. ला निळसर पांढरे मोनोहायड्रेट, २५० से. ला पांढरे निर्जल कॉपर सल्फेट आणि ७५०° से. ला कॉपर ऑक्साइड तयार होते. निर्जल मोरचुदाचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या साहाय्याने रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) अत्यल्प प्रमाणात होते व त्याच्यावर सौम्य हायड्रोक्लोरिक अम्लाची विक्रिया केल्यास क्युप्रिक क्लोराइड (CuCI2) मिळते.

उत्पादन : कॉपर सल्फेटाचे मोठ्या व छोट्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात.

(१) परिवर्तक भट्टीत तांब्याची मोड गंधकाबरोबर तापवून प्रथम क्युप्रस सल्फाइड (Cu2S) बनते. नंतर भट्टीत हवा घेऊन या सल्फाइडाच्या ऑक्सिडीकरणाने (→ ऑक्सिडीभवन) कॉपर सल्फेट मिळते. हे अशुद्ध सल्फेट विरल सल्फ्यूरिक अम्लात विरघळवितात. त्यामुळे अविद्राव्य (न विरघळणारी) अशुद्ध द्रव्ये खाली बसतात. ती काढून टाकून स्फटिकीकरणाने शुद्ध कॉपर सल्फेट मिळवितात.

(२) शिशाचे अस्तर असणाऱ्या मनोऱ्यामध्ये तांब्याची मोड टाकून वरून विरल सल्फ्यूरिक अम्लाची फवारणी करतात व खालून हवेचा झोत सोडतात. या पद्धतीत पुढीलप्रमाणे विक्रिया होऊन कॉपर सल्फेट तयार होते व त्याचे वरीलप्रमाणे शुद्धीकरण करतात.

2 Cu + 2H2 SO4 + O2 = 2 CuSO4+ 2H2 O

[हवेतून]

(३) तांब्याचे सल्फाइडी खनिज भाजून कॉपर ऑक्साइड मिळते. हे ऑक्साइड किंवा मॅलॅकाइट व ॲझुराइटासारखी तांब्याची खनिजे यांच्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करूनही कॉपर सल्फेट मिळते.

(४) भुवनेश्वर येथील रीजनल रिसर्च लॅबोरेटरीने टाकाऊ पदार्थापासून कॉपर सल्फेट मिळविण्याची पद्धत प्रगत केली आहे. या पद्धतीत तांब्याची मोड, प्रक्षालक उद्योगातून मिळणारे (वा व्यापारी) सल्फ्यूरिक अम्ल व सक्रियित कार्बन हा कच्चा माल वापरतात. एका मनोऱ्यात तांब्याची मोड योग्य त्या तापमानापर्यंत तापवून वरून तिच्यावर सल्फ्यूरिक अम्ल सोडतात. खालील बाजूस मिळणारा कॉपर सल्फेटाचा विद्राव संपृक्त करून (त्यातील कॉपर सल्फेटाचे प्रमाण वाढवून) तो सक्रियित कार्बनच्या थरांतून गाळून घेतात व शेवटी बाष्पीभवनाद्वारे कॉपर सल्फेटाचे स्फटिक मिळवितात. या पद्धतीत वापरण्यात येणारी यंत्रसामग्री व कच्चा माल भारतात उपलब्ध आहेत.

(५) प्रयोगशाळेत शुद्ध कॉपर ऑक्साइड (किंवा कार्बोनेट) शुद्ध विरल सल्फ्यूरिक अम्लात विरघळवून शुद्ध कॉपर सल्फेट बनवितात.

उपयोग : हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे संयुग असून कापड (रंग बंधक म्हणून), खनिज तेल, कृत्रिम रबर, चर्म (कातडी कमावणे) इ. उद्योगांत हे वापरतात. विद्युत्‌ विलेपनाने तांब्याचा मुलामा देण्यासाठी विद्युत्‌ घटमालांत, तसेच रसवैद्यकात औषध म्हणून ह्याचा वापर करतात. रंगद्रव्ये, केसांचे कलप, तांब्याची इतर संयुगे, कीटकनाशके, कवकनाशके (उदा., बोर्डो मिश्रण), पीडकनाशके, पशुखाद्ये, खते इ. बनविण्यासाठी आणि लाकूड व लगदा यांच्या परिरक्षणासाठी कॉपर सल्फेट वापरतात. वैश्लेषिक रसायनशास्त्रात विक्रियाकारक (उदा., बेनिडिक्ट विक्रियाकारक) बनविण्यासाठी याचा उपयोग होतो. निर्जल कॉपर सल्फेट अल्कोहॉलातील पाणी ओळखण्यासाठी आणि निर्जलीकारक म्हणून वापरतात.

गोखले, दि. मो.; घाटे, रा. वि.