प्रायगोजीन, इल्या : (२५ जानेवारी १९१७ – ). जन्माने रशियन परंतु आता बेल्जियमचे नागरिक झालेले भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. ⇨ ऊष्मागतिकी या भौतिकीच्या शाखेच्या कक्षा अधिक विस्तृत करण्याच्या कामगिरीबद्दल त्यांना १९७७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचा जन्म मॉस्को येथे झाला परंतु ते चार वर्षांचे असतानाच प्रायगोजीन कुटुंबाने देशत्याग केला आणि पश्चिम यूरोपात येऊन बेल्जियममध्ये १९२९ मध्ये स्थायिक झाले. ब्रूसेल्स येथील Universite Libre de Bruxelles या विद्यापीठातून त्यांनी १९४५ मध्ये पीएच्.डी पदवी संपादन केली. १९४७ मध्ये याच विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्र व सैद्धांतिक भौतिकी या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेक्सस विद्यापीठाच्या सांख्यिकीय यामिकी [⟶ सांख्यिकीय भौतिकी] व ऊष्मागतिकी विभागाचे संचालक म्हणूनही १९६८ पासून ते काम करू लागले. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला आहे.

ऊष्मागतिकीमध्ये उष्णता व कार्य यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास केला जातो. उदा., वाफेची किंवा अंतर्ज्वलन पद्धतीची (ज्यात इंधन आतच जाळण्याची व्यवस्था केलेली असते अशा पद्धतीची) एंजिने, प्रशीतक (रेफ्रिजेटर) यांसारख्या साधनांच्या कार्याची मूलतत्त्वे या शास्त्रशाखेतच अभ्यासली जातात. ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमावरून असा निष्कर्ष निघतो की, विश्वातील सर्व नैसर्गिक घटनांमध्ये ⇨ एंट्रॉपी वाढत जात असते. एंट्रॉपी ही राशी अव्यवस्थेचे माप आहे. तिच्या उलट ‘निर्गेट्रॉपी’ हे सुव्यवस्थेचे माप आहे. विश्वातील एंट्रॉपी वाढत जाते याचा अर्थ सुव्यवस्था जाऊन अव्यवस्था वाढत जाते (उदा., व्यवस्थित रांगा करून संचलन करणारी मुले, संचलन संपले म्हणजे इतस्ततःपांगतात त्याप्रमाणे).

सर्वसामान्यपणे या नियमाची सत्यता अनेक क्षेत्रांत प्रत्ययास येते परंतु जीवसृष्टीत मात्र या नियमाविरुद्ध व्यवहार होत असल्यासारखे दिसते. उदा., सजीव प्राण्यांच्या शरीरात विविध अणू काही खास व्यवस्थेनुसार रचलेले असतात. म्हणजे निर्जीवांपेक्षा सजीवांत सुव्यवस्था जास्त असते. मग दुसऱ्या नियमानुसार असे प्रश्न उपस्थित होतात की, निर्जीवापासून सजीव सृष्टी उत्पन्न झालीच कशी? आणि सजीव मृत होऊन त्यांचे ताबडतोब (जास्त अव्यवस्थित) निर्जीवांत रूपांतर का होत नाही? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे प्रायगोजीन यांनी केलेल्या विवरणामुळे मिळू शकतात. इतकेच नव्हे, तर सामाजिक शास्त्रे, ⇨ परिस्थितिविज्ञान, जगातील नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य वापर यांसारख्या विविध विषयांच्या क्षेत्रात ऊष्मागतिकीच्या मूलतत्त्वांचा उपयोग त्यामुळे शक्य झाला आहे.

रूढ किंवा जुन्या ऊष्मागतिकीमध्ये फक्त ऊष्मागतिकीय समतोल अवस्थेत असलेल्या ‘पृथक्’ व्यूहांचा विचार केला जातो (अशा व्यूहात ऊर्जा किंवा द्रव्य आतून बाहेर किंवा बाहेरून आत जाऊ-येऊ शकत नाही) परंतु निसर्गातील बहुतेक सर्व महत्त्वाचे व्यूह असमतोल अवस्थेत असतात. प्रायगोजीन यांनी असमतोल आणि परिसराशी ऊर्जा व द्रव्य यांची देवघेव करणाऱ्या व्यूहांनाही लागू पडेल अशा स्वरूपात ऊष्मागतिकीचा दुसरा नियम मांडला. अशा व्यूहांना त्यांनी ‘ऱ्हासकारी व्यूह’ हे नाव दिले आहे. विशिष्ट व्यूहात बाहेरून आत निर्गेट्रॉपी आली, तर त्या व्यूहातील सुव्यवस्था अंशतः वाढेल, तरीही एकूण विश्वाच्या संदर्भात अव्यवस्था वाढलेली असते व म्हणून दुसऱ्या नियमाचे पालन झालेले असते. उदा., प्राणी जे अन्न खातो त्याच्या रेणूंमध्ये सुव्यवस्थित रचलेले अणू असतात. अशा तऱ्हेने तो प्राणिरूपी व्यूह काही निर्गेट्रॉपी आत घेतो. अन्नाचे पचन होण्याच्या क्रियेत या रेणूंची सुव्यवस्था कमी होते. त्याचबरोबर प्राण्याच्या शरीराच्या कोशिका (पेशी) तयार होऊन काही जास्त सुव्यवस्थित रचनाही तयार होतात परंतु या दोन्हींची (अव्यवस्थेतील वाढ व सुव्यवस्थेतील वाढ यांची) गोळाबेरीज केली, तर एकंदरीत अव्यवस्थाच वाढली आहे, असे आढळते. अशा रीतीने असंतुलित व्यूहाला बाहेरून निर्गेट्रॉपी पुरवून सुव्यवस्थित रचनेत राखता येईल, असे प्रायगोजीन यांनी दाखवून दिले.

असंतुलित व्यूहांना लागू पडेल अशी सांख्यिकीय यामिकी प्रगत करण्याचे प्रयत्न प्रायगोजीन व त्यांचे सहकारी करीत आहेत आणि आतापर्यंत झालेली प्रगती अत्यंत आशादायक आहे.

नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस अँड आर्ट्‌स या अमेरिकेतील संस्थांचे तसेच जर्मनी, स्वीडन, डेन्मार्क, पोलंड इ. देशांतील शास्त्रीय संस्थांचे ते सन्माननीय सदस्य आहेत. रॉयल ॲकॅडेमी ऑफ बेल्जियमचे १९५३ मध्ये सदस्य व पुढे १९६९ मध्ये अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करून त्यांचा बहुमान करण्यात आला. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना अऱ्हेनियस सुवर्णपदक (स्वीडन, १९६९), कॉथेनियस पदक (जर्मनी, १९७५) इ. सन्मान मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी पुढील विशेष महत्त्वाचे आहेत : (१) Etude Thermodynamigue des Phenomenes Irreveresibles (१९४७), (२) मॉलिक्युलर थिअरी ऑफ सोल्यूशन्स (ए. बेलमान्स व व्ही. मॅथो यांच्या समवेत, १९५७), (३) डायनॅमिकल थिअरी ऑफ इर्‌रिव्हर्सिबल प्रोसेसेस (१९७७) आणि (४) सेल्फ ऑर्गनायझेशन नॉनइक्किलिब्रियम सिस्टिम्स : फ्रॉम डिसिपेटीव्ह स्ट्रक्चर्स टू ऑर्डर थ्रू फ्लक्चुएशन्स (१९७७).

पुरोहित, वा. ल.