मोरगाव :महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान व गाणपत्य संप्रदायाचे एक आद्यपीठ. हे पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यात, पुणे-बारामतीरस्त्यावर, पुण्याच्या आग्नेयीस ६४ किमी. अंतरावर कऱ्हा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. लोकसंख्या ३,५५८ (१९८१). येथील मयूरेश्वर (मोरेश्वर) महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक प्रमुख असून तत्संबंधी श्रीगणेशपुराणमुद्‌गलपुराणात उल्लेख आढळतात. याच मयुरेश्वराने प्राचीन मिथिला देशातील सिंधू दैत्याचा वध केल्याचाही उल्लेख आढळतो. या क्षेत्रास ‘स्वानंदपुरी’ असेही म्हटले जाते.

बरीदशाहीतील (१५००–१६२०) जामदारखान्याचा एक सेवक मोरो केशव गोळे याने गणेशमंदिराचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने इस्लामी वास्तूशैलीत मंदिराभोवती एक दगडी तट बांधला असून त्याला चार मीनार आहेत. मंदिराच्या पायऱ्या चढण्यापूर्वी नगारखान्यात गणेशाकडे तोंड करून बसविलेला मोठा दगडी उंदीर आहे. महाद्वारात दोन व आतील प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. मंदिरापुढेच चौथ्यऱ्यावर एक मोठा नंदी आहे. गणेशापुढे नंदी हे येथील आगळे वैशिष्ट्य मानले जाते. येथून जवळच असलेल्या भुलेश्वर येथील महादेव मंदिरात स्थापनेच्या हेतूने हा नंदी नेत असताना त्याने या जागी मयूरेश्वरासमोर आपली स्थापना करण्याविषयी दृष्टांत दिला, अशी त्याच्याविषयी आख्यायिका सांगितली जाते. सभामंडपात नग्नभैरवाचे देऊळ असून तटाच्या आठ कोपऱ्यात आठ गणेशप्रतिमा बसविलेल्या आहेत. सांप्रतचा तट व सभामंडप यांचा जीर्णोद्वार करण्यात आला आहे. मंदिराचे प्राचीन शिखर वेधक आहे. सभामंडपाजवळील तरटीचे झाड ‘कल्पवृक्ष’ म्हणून प्रसिद्ध आहे.

येथील मूळ गणेशमूर्ती लोह व रत्ने यांपासून बनविलेली होती. ती सांप्रतच्या मूर्तीमागे तांब्याच्या पत्र्याने झाकलेली आहे. येथे एक धर्मशाळा आहे. कऱ्हा नदीवर १९८५ साली पूल बांधण्यात आला. असून नदीच्या पात्रात गणेशकुंड आहे.

मोरगावला प्रत्येक चतुर्थीस भाविकांची गर्दी होते. विशेषतः भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थी, विजयादशमी व सोमवती अमावास्या या दिवशी येथे गणेशपूजा व उत्सव साजरे केले जातात. येथील शेतीस नाझरे बंधाऱ्यातून आठमाही पाणीपुरवठा केला जातो. येथे शनिवारी आठवड्याचा बाजार भरतो. बँका, डाकघर, माध्यमिक शाळा, दवाखाने इ. सोयीही येथे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, विश्रामधाम, एस्. टी. बसस्थानक आणि कऱ्हा नदीवरील वसंत बंधारा या नियोजित सोयी आहेत. या देवस्थानचा सर्व कारभार व व्यवस्था चिंचवडच्या मोरया गोसावी संस्थानचे विश्वस्त मंडळ पाहते.

अनपट, रा. ल.