मोपल्यांचे बंड : आठव्या शतकापासून अरब व्यापाऱ्यांनी केरळच्या मलबार भागात वखारी काढल्या व इस्लामचाही प्रसार केला. त्यामुळे तेथे मुस्लिस वस्ती वाढू लागली. मुस्लिस शेतकऱ्यांना मोपला असे म्हणत असत. एकोणिसाव्या शतकात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. कंपनीच्या राज्यात शेतकरी विरुद्ध सावकार-जमीनदार वाद सुरू झाले आणि अरबस्तानातील कडव्या पुनरुत्थानवादी, सकल इस्लामवादी वहाबी विचारांचा पगडा मोपला शेतकऱ्यांवर बसू लागला. आर्थिक आणि धार्मिक संघर्षातून मुसलमान आणि मुसलमानेतर असा जातीय संघर्षही उद्भवला. परिणामी मोपल्यांमध्ये पुनरुत्थानवादी कडव्या वहाबी विचारांची पकड अधिकच घट्ट झाली. वहावी उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी १९१९ साली मोठ्या प्रमाणावर हिंसा करून एका तालुक्यात वहाबी अंमल स्थापण्याचाही मोपल्यांकडून प्रयत्न झाला. तो सरकारने चिरडून टाकला. वर्षभराने म.गांधीनी खिलाफत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. परंतु काँग्रेसवादी खिलाफत नेते कडवे धर्मगुरू होते. त्यांनी साऱ्या देशभर धर्मयुद्धाचे आवाहन केले. म.गांधींनी जरी अहिंसेचा आग्रह धरला असला आणि खिलाफत आंदोलनाचे नेतृत्व धर्मगुरूंनी म.गांधीना दिले असले, तरी या मुल्लामौलवींचा अहिंसेवर काडीइतकाही विश्वास नव्हता व ते तसे उघडपणे बोलूनही दाखवीत. खिलाफत आंदोलनाचे काळी सुशिक्षित मवाळ मुस्लिम नेते मागे पडले आणि मुल्लामौलवींना अफाट लोकप्रियता मिळाली. त्यातून मलबारमध्ये वहाबी मौलवींना मोकळे रान मिळाले. त्यांच्या धर्मयुद्धाच्या भडक प्रचाराला धार आली आणि १९१९ साली वहाबी अंमल स्थापण्याचा प्रयत्न झाला. तसा प्रयत्न संबंध मलबारभर करावा असे स्थानिक धर्मगुरूंच्या मनात आले.
मोपल्यांनी १९२१ च्या ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर खून, लुटालूट व जबरदस्तीने स्थानिक हिंदूंना बाटविण्याचे प्रकार केले. वरवर पाहता ब्रिटीश सरकारविरुद्ध ही बंडाळी असली, तरी तिला अखेर धार्मिक संघर्षाचे रूप आले आणि त्या संघर्षात हिंदूंची फार हानी झाली. ही बंडाळी सरकारने अखेर लष्कराकरवी मोडून काढली. मोपल्यांनी जेवढे प्रकार केले त्याच्या दसपटीने लष्कराने केले. या बंडाळीमुळे गांधीजींनी पुकारलेल्या असहकारितेच्या आंदोलनाला मात्र खीळ बसली. मोपल्यांचे हिंसाचार आणि अत्याचार यांचा खिलाफत आंदोलनाशी काही संबंध नाही असे जरी काँग्रेस व खिलाफत नेत्यांनी जाहीर केले, तरी या गोष्टीचा कडक निषेध करण्याचे धैर्य काँग्रेस नेत्यांना झाले नाही. खिलाफत नेत्यांनी तर या हिंसाचारी कृत्यांचे अप्रत्यक्षतः समर्थनच केले. या धोरणाची देशभर तीव्र प्रतिक्रया उमटली. मोपल्यांचे इंग्रजांशी स्वातंत्र्ययुद्ध चालू असता स्थानिक हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ इंग्रजी सैन्याला पाचारण केले. पण त्यामुळे मोपल्यांना चीड आली. काँग्रेस-खिलाफत नेते मौलाना हसरत मोहानी यांच्या वक्तव्यामुळे तर आगीत तेल ओतल्यासारखे झाले. खिलाफत आंदोलनाला मदत करून हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्याचे म. गांधीजींचे स्वप्न यामुळे धुळीला मिळाले. मुल्लामौलवींच्या तब्लीग आणि तंजीम (धर्मप्रसार आणि संघटना) या कडव्या धोरणाची प्रतिक्रिया म्हणून संघटन व शुद्धी आंदोलने सुरू झाली आणि त्या दशकात देशात अभूतपूर्व अशा जातीय दंगलीचे वातावरण उत्पन्न झाले.
पहा : खिलाफत चळवळ.
संदर्भ : 1. Karnadikar, M. A. Islam in India’s Transition to Modernity, Bombay, 1963
2. Nagarkar, V. V. Genesis of Pakistan, New Delhi, 1980.
नगरकर, व. वि.