छोडो भारत आंदोलन : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे आंदोलन. अगोदरच्या म्हणजे १९२०–२१ आणि १९३०–३३ च्या स्वातंत्र्य आंदोलनाशी तुलना करता १९४२ चा छोडो भारत लढा हा आगळाच होता. आझाद हिंद सेनेने दिलेला लढा वगळता स्वातंत्र्यासाठी ते शेवटचेच आंदोलन होते. इतर कोणत्याही संग्रामापेक्षा अत्यंत उग्र स्वरूपाचा हा लढा होता. आधीच्या सर्व जनआंदोलनांना पुढाऱ्यांचे मार्गदर्शन दीर्घकाळ लाभले. १९४२ चा लढा सर्व नेत्यांची धरपकड झाल्यानंतर जनतेने उत्स्फूर्तपणे लढविला. अर्थात अगोदरच्या दीर्घकालीन लढ्यांच्या मानाने हे आंदोलन फारच थोडा काळ, म्हणजे फक्त चार-पाच महिनेच टिकून राहिले, याला अपवाद फक्त महाराष्ट्रातील प्रतिसरकार होते. हे प्रतिसरकार मात्र १९४५ पर्यंत व्यवस्थित कार्य करीत होते व ज्या भागात ते स्थापन झाले होते, त्या भागात सरकारी राज्ययंत्रणा रखडतच काम करीत होती. बाकीची आंदोलने निव्वळ स्वराज्य मिळविण्यासाठी होती. बेचाळीसच्या लढ्याच्या उद्देशात देशाचे अखंडत्वही अंतर्भूत होते.

 दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्या अगोदर ब्रिटिश साम्राज्य बरीच वर्षे टिकेल, अशी लोकांची भावना होती परंतु दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी स्वराज्य जवळ आले, हे स्पष्टपणे दिसून आले होते. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरॉयने परस्पर भारताला युद्धात खेचले त्याच्या निषेधार्थ निरनिराळ्या प्रांतांतील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले आणि राजकीय कोंडी सुरू झाली. थोड्याच महिन्यांत मुस्लिम लीगने अधिकृतपणे पाकिस्तानची मागणी केली. वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश म. गांधींनी दिला तो काहींनी अंमलात आणला. तथापि राजकीय कोंडी फुटू शकली नाही आणि व्हाइसरॉयचा एकतंत्री अमल अधिकाधिक मजबूत होऊ लागला. अशा वातावरणात युद्धपरिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन यांनी हिंदी जनतेचे युद्धास सहकार्य मिळविण्यासाठी भरीव राजकीय सुधारणा द्या, असा ब्रिटनकडे लकडा लावला. तेव्हा चर्चिल मंत्रिमंडळाने एक योजना तयार केली आणि क्रिप्सना वाटाघाटीसाठी भारतात धाडले. आराखडा पाहिल्याबरोबर गांधीजींनी या योजनेमुळे पुढे भारताचे तुकडे होतील, असे जाहीर करून सेवाग्रामाचा रस्ता धरला. काँग्रेसच्या नेत्यांनी वाटाघाटी चालू ठेवल्या परंतु युद्धकाळातसुद्धा ब्रिटन आपली पकड ढिली करू इच्छीत नाही, असे दिसल्यावर काँग्रेसने योजना फेटाळली. महिन्याभराने, म्हणजे मे अखेरीस, गांधीजींनी ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी करावयास सुरुवात केली. जुलैमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकण्याचे निश्चित करणारा ठराव केला. तो ७ आणि ८ ऑगष्टला मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीसमोर मांडण्यात आला व तो मान्य झाला. त्यान्वये भारताचे राजकीय स्वातंत्र्याचे उद्दिष्ट ताबडतोब सिद्ध करण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जनआंदोलनाची हाक दिली. आपल्या भाषणात गांधीजी म्हणाले की, आपण परकीय सत्तेचे गुलाम आहोत ही भावना मनातून काढून टाका आणि देश स्वतंत्र करू वा मरू, या भावनेने या लढ्यात सहभागी व्हा. ज्येष्ठ नेत्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले. जर तसे झाले आणि काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शन मिळाले नाही, तरी लोकांनी आपल्या कुवतीप्रमाणे व बुद्धीप्रमाणे आंदोलन चालू ठेवावे, असा आदेश दिला. त्या रात्रीच सर्व पुढाऱ्यांना अटक झाली व लोकांत संतापाची इतकी तीव्र लाट उसळली की, देशभर राजकीय आंदोलनाचा वणवा पेटला.

अनेक दिवस उत्स्फूर्तपणे हरताळ पाळण्यात आले. जागोजागी निषेध मोर्चे निघाले. अनेक ठिकाणी सरकारी कचेऱ्यांवर हल्ले झाले आणि युनियन जॅक खाली उतरवून राष्ट्रीय झेंडा त्या ठिकाणी उभारण्याचे प्रयत्न झाले. अनेक ठिकाणी दूरध्वनी, तारयंत्रे इ. दळणवळणाची साधने उद्‌ध्वस्त करण्यात आली आणि रस्ते व रेल्वेवाहतुकीत जागोजागी अडथळे निर्माण केले गेले. परंतु धरपकड, लाठीमार आणि गोळीबार यांपुढे नि:शस्त्र जनता फार काळ टिकाव धरू शकली नाही. अनेक शहरे मुक्त करण्यात आली परंतु २४ तासांतच सरकारने पुन्हा ती ताब्यात घेतली. बंगाल आणि बिहारमध्ये अनेक खेडी मुक्त केली गेली. तेथे तीन-चार महिन्यांपर्यंत सरकारी यंत्रणा बंद पडली आणि जनतेनेच कारभार हाती घेऊन चालविला. याला अपवाद फक्त महाराष्ट्रातील सांगली-सातारा विभाग होता. तेथे यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, किसन वीर, लाडबंधू, वसंतराव पाटील यांसारख्या नव्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली व ती १९४५ पर्यंत व्यवस्थितपणे कार्य करीत होती. या आंदोलनात यशवंतराव चव्हाणांनी कारागृहवास लवकर पत्करला परंतु इतर कित्येकजण भूमिगत होऊन आंदोलन चालवीत राहिले. ठिकठिकाणी गावठी बाँबचे कारखाने निघाले. १९४४ अखेरीस तर वाळव्याच्या नागनाथ नायकवडींनी सशस्त्र फौज उभारण्याचा मोठा प्रयत्न केला.

 या लढ्यास फक्त फॉर्वर्ड ब्लॉकने पाठिंबा दिला होता. देशातील इतर सर्व पक्ष काही ना काही कारण काढून लढ्यापासून दूर राहिले. काँग्रेस समाजवादी पक्षाचे बहुतेक नेते भूमिगत झाले आणि त्यांनी लढ्यास एकसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शन केले. जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, अरुणा असफ अली, डॉ. राम मनोहर लोहिया यांनी देशव्यापी लढ्याचे नेतृत्व केले. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्तेही भूमिगत झाले व त्यांनी लढ्यास चांगला हातभार लावला. मोठ्या शहरांतील विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे लढ्यात उडी घेतली. परिणामी स्वातंत्र्योत्तर काळात बेचाळीसच्या लढ्यात तावून सुलाखून निघालेल्या अनेक विद्यार्थी नेत्यांना राजकारणात मोठे स्थान प्राप्त झाले.

 छोडो भारत आंदोलनाची उग्रता भयंकर होती. पोलीस व सैनिकी तुकड्यांनी एकूण ६६९ वेळा गोळीबार केला. त्यांत १,०६० वीरांच्या आहुती पडल्या आणि २,१७९ जण जखमी झाले. लाठीहल्ल्यातील जखमींची संख्या याहून कितीतरी पट अधिक होती. क्षुब्ध जमावांनी २०८ पोलीस ठाणी, ९४५ पोस्ट आणि टपाल कचेऱ्या व इतर ७५० सरकारी इमारती उद्‌ध्वस्त केल्या. ३८२ रेल्वे स्थानकांची नासधूस झाली आणि हजारेक ठिकाणी रूळ उखडण्यात आले. ४७४ ठिकाणी रस्त्यांची वाहतूक बंद पाडण्यात आली. ६६४ ठिकाणी बाँबस्फोट झाले. अनेक सरकारी कर्मचारी आणि गोरे सैनिक ठार किंवा जखमी झाले. उषा मेहता आणि ठक्कर यांनी अनेक महिने स्वतंत्र भारताचे नभोवाणी केंद्र गुप्तपणे चालविण्यात यश मिळविले. लढ्याचे लोण खेड्यापाड्यांतही पसरले होते. त्यामुळे एकूण १७३ गावांवर ९० लाखांहून अधिक रुपये सामुदायिक दंड बसविण्यात आला. हजारो स्वातंत्र्य-सैनिकांची धरपकड झाली आणि त्यांपैकी २,५६२ जणांना फटक्याच्या शिक्षाही झाल्या. आंदोलन अल्पकाळ टिकले परंतु त्याची उग्रता एवढी होती की, पुन्हा आंदोलन झाले तर ते किती भयंकर होईल, याची ब्रिटिश सरकारला खात्री पटली. आंदोलन फसल्यामुळे देशाचे विभाजन जरी टळू शकले नाही, तरी स्वराज्य अटळ झाले ही गोष्ट निश्चित.

संदर्भ :1. Mujumdar, R. C. History of the Freedom Movement in India, Vol. 3, Calcutta, 1963.

           2. Nagarkar, V. V. Aspects of Modern Indian History 1 – Genesis of Pakistan, New Delhi,  1975.

           3. Tara Chanda, History of the Freedom Movement in India, Vol. 4,  Calcutta, 1972. 

नगरकर, व. वि.