मोंबासा : केन्या देशातील (पूर्व आफ्रिका) दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि प्रसिद्ध बंदर. लोकसंख्या ३,४१,१४८ (१९७९). हे नैरोबीच्या आग्नेयीस सु. ५३० किमी. वर असून याचा जास्तीतजास्त भाग हिंदी महासागरातील किनाऱ्यालगतच्या प्रवाळ बेटावर आहे. बंदराचे क्षेत्र ५ किमी. लांब व ३ किमी. रुंद असून अरुंद खाडीमुळे ते भूभागापासून विभक्त झाले आहे. त्याचा उत्तर भाग हिंदी महासागरपासून मोंबासाच्या जुन्या बंदरापर्यंत, तर दक्षिण भाग किलिंडिनी बेटापर्यंत पसरलेला आहे. बंदर मुख्य भूभागाशी माकुपा, किपेव्हू व न्याली या पुलांनी तसेच जलमार्गाने जोडलेले आहे.
‘किसिवा चा एम्व्हिता’ (महायुद्धाचे बेट) हे बेटाचे प्राचीन नाव त्याच्या एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचे निदर्शक ठरते. १५०५ मध्ये पेद्रू काब्राल व फ्रॅन्सिस्कू द आल्मेईदा या पोर्तुगीज वसाहतकारांनी हे बंदर काबीज केले. पंधराव्या ते अठराव्या शतकांपर्यंत ते पोर्तुगीजांच्या अखत्यारीत होते. झांझिबार येथील सुलतानाच्या राज्यात अरबांना आश्रय लाभून ते येथे स्थायिक झाले. १८८७ मध्ये मोंबासा ब्रिटिशांच्या ताब्यात आले त्यानंतर १९०७ पर्यंत ते ब्रिटिश पूर्व आफ्रिका संरक्षित प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण होते. दुसऱ्या महायुद्धकाळात हिंदी महासागरातील वाहतुकीचे प्रमुख ठाणे म्हणून त्याचा उपयोग करण्यात आला.
मोंबासा हे मासेमारीचे केंद्र असून ते केन्या,युगांडा आणि वायव्य टांझानिया यांच्याशी लोहमार्गाने जोडलेले आहे. शहरात तंत्रशिक्षण संस्था, फोर्ट जीझस वस्तुसंग्रहालय, सर्वोच्च न्यायालय व विमानतळ असून साबण, सिमेंट, कॉफी, तेलशुद्धीकरण इत्यादींचे कारखाने आहेत, येथून चहा, रबर, कॉफी, कापूस, खोबरे इत्यादींची निर्यात होते. येथील अँग्लिकन आणि रोमन कॅथलिक चर्च, पोर्तुगीजांनी बांधलेला जीझस किल्ला ही वसाहतकालीन इतिहासाची प्रतिके होत.
मिसार, म. व्यं.