मैमनसिंग : बांगला देशातील याच नावाच्या जिल्ह्याचे ठाणे, प्रशासकीय केंद्र आणि औद्योगिक शहर. लोकसंख्या १,०७,७६३ (१९८३). ते डाक्क्याच्या उत्तरेस सु. १२६ किमी. वर प्राचीन ब्रह्मपुत्रेच्या (जमुनेच्या) काठी वसले आहे. जमुना आणि मेघना नद्यांमुळे येथील जमीन सुपीक झाली असून ऊस, ताग, तंबाखू व कापूस ही नगदी पिके निघतात. तांदळाचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर होते.
मैमनसिंगचे पूर्वीचे नाव नासिराबाद असून चौदाव्या शतकात येथे स्थानिक मुसलमानी सत्ता होती आणि पुढे ते दिल्लीच्या मोगलांच्या आधिपत्याखाली गेले (१५५६–१७०७). पुढे काही वर्षे स्थानिक मुस्लिम सत्ता होती. त्यानंतर १७६५ मध्ये ब्रिटिशांनी ते घेतले आणि १७८७ मध्ये मैमनसिंग जिल्ह्याची स्थापना झाली. १९४७ मध्ये ते पूर्व पाकिस्तानात गेले आणि १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्थापनेनंतर ते आता त्या देशात आहे.
सुरुवातीपासून मैमनसिंग काचेच्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध असून या उद्योगाव्यतिरिक्त जिल्ह्यात साखरकारखाने, वस्त्रोद्योग, तागाच्या गिरण्या व मच्छीमारी हे उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. येथे १८६९ साली नगरपरिषद स्थापन झाली. या परिषदेतर्फे सर्व नागरी सुविधा पुरविल्या जातात. शहरात एक कृषी विद्यापीठ असून डाक्का विद्यापीठाशी संलग्न अशी अनेक शासकीय महाविद्यालये आहेत.
देशपांडे, सु. र.