मेसोपोटेमिया : आशिया खंडातील एक प्राचीन प्रसिद्ध प्रदेश. त्याच्या भौगोलिक सीमा निश्चित नाहीत आणि येथील मूळ रहिवासी कोण, यासंबंधीही विश्वसनीय माहिती अद्यापि ज्ञात नाही. विद्यमान इराकमध्ये हा प्रदेश समाविष्ट होतो.

युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांमधील सुपीक प्रदेशाला प्राचीन ग्रीकांनी मेसोपोटेमिया (दोन नद्यांमधील) हे नाव दिले. दक्षिणेला बॅबिलोनिया, उत्तरेस आर्मेनि यातील टॉरसचा डोंगर, पश्चिमेस सिरियाचा प्रदेश व पूर्वेस ॲसिरिया यांनी तो सीमांकित झाला आहे. युफ्रेटीस, टायग्रि स, खाबूरा, बलीक, दियाला, झॅब इ. या प्रदेशातील प्रमुख नद्या असून काही ज्वालामुखी शिखरेही आहेत. बगदाद, बसरा, राक्का, आन, मोसूल, हारान, मार्डेन इ. प्रमुख शहरे आहेत. या प्रदेशातील बहुसंख्य लोक अरब व मुसलमान असून त्यांच्यात कुर्द, तु र्कोमान, समार इ. जाती आहेत. ते अरबी, तुर्की, कुर्दी आदी भाषा बोलतात. या भूप्रदेशात खनिज तेलाचा भरपूर साठा असून कैयाराह व मंडाली येथील खनिज तेलाचे साठे विख्यात आहेत. सुपीक गाळाची जमीन व नद्यांचे पाणी यांमुळे गहू, कापूस, खजूर, तांदूळ इ. पिके येतात.

दक्षिण मेसोपोटेमियाचा भाग बहुविध संस्कृतींचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या प्रदेशात अनेक उत्खनने झाली आणि अद्यापही चालू आहेत. या प्रदेशावर सेमिटिक, हिटाइट, आर्मेनियन इत्यादींनी सत्ता गाजविली. जर्मो येथील वसती सर्वांत प्राचीन (इ. स. पू.५०००) असून या भागात कृषिसमाजाच्या प्राचीन खुणा आढळल्या आहत. त्यानंतर अनेक संस्कृती उदयास आल्या. त्यापैकी टेल हसुना, समार आणि टेल हलाफ या महत्त्वाच्या असून खाबूराची हलाफियन प्रागैतिहासिक अलंकृत मृत्पात्रे अत्यंत प्रगत अवस्था दर्शवितात. ती ⇨ निनेव्ह आणि तेपे गावरा या ठिकाणी सापडली. ही उत्तरेकडील स्थाने असून दक्षिणेला एरिडू या स्थळी प्रगत संस्कृती नांदत होती. या नंतरची अल्‌-उबाइद संस्कृती उत्तर व दक्षिण दोन्ही प्रदेशांत भरभराटीस आली व हळूहळू ग्रामीण संस्कृती लोप पावून नागरी संस्कृतीला प्रारंभ झाला. या काळाचे ईरेक (विद्यमान वर्का) हे प्रातिनिधिक स्थल होय. या काळातील भव्य वास्तू उत्खननात मिळाल्या असून त्यांपैकी इनान्नाचे मंदिर व अनूचे झिगुरात प्रसिद्ध आहे. वास्तुशैलीच्या दृष्टीने येथे सुमेरियन, बॅबिलोनियन आणि अकेडियन या तीन अवस्था विशेषतः इ. स. पू. ३०००–१२७५ दरम्यान आढळतात. याशिवाय ईरेकला काही चित्रलिपीतील मुद्रा मिळाल्या. यानंतरच्या नगरराज्यांचा विकास मध्यपूर्वेत उत्तर सिरिया, उत्तर मेसोपोटेमिया आणि बहुधा ईलम यांत झालेला आढळतो. या काळातील प्रसिद्ध नगरराज्यांत टेल-ॲस्मार, काफये, ⇨ अर, कीश, मारी, फराह, लेगॅश यांचा समावेश होतो. दक्षिण मेसोपोटेमियातील नगरराज्यांतील प्रमुख रहिवासी सुमेरियन असून ⇨ निप्पुर येथे ते एकत्र जमत आणि एनलिल देवतेची (जलदेवता) पूजा करीत असत. अरचा प्रसिद्ध पहिला वंश संपुष्टात येऊन तेथे सारगॉनने अकेडियन वंशाची इ. स. पू. २३४० मध्ये स्थापना केली. हेच मेसोपोटेमियाचे पहिले साम्राज्य असून त्याचे अनुकरण पुढे बॅबिलोनियन व नंतरच्या असिरियन राजांनी केले. मेसोपोटेमियाआणि ईलम या दोन संस्कृत्यांत देवाण-घेवाण झाली आणि संघर्षही उद्‌भवले. हे संघर्ष अलेक्झांडर द ग्रेटच्या स्वारीपर्यंत अस्तित्वात होते. अलेक्झांडरने येथे ग्रीक प्रशासक नेमले. सुमारे दोन-अडीचशे वर्षे येथे ग्रीकांश संस्कृती होती. पुढे हा भाग इ.स. तिसऱ्या शतकात रोमन साम्राजाचा एक प्रशासकीय भाग बनला. अरबांनी तो बायझंटिनांकडून जिंकला आणि अब्बासी खिलाफतीच्या स्थापनेनंतर (इ. स. ७६२) बगदादचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढले. अरबी लिपी, भाषा व वाङ्‌मय यांचा प्रसार झाला. पुढे मंगोलांचा राजा हुलागू खान याने अब्बासी खिलाफत उद्‌ध्वस्त करून प्राचीन जलसिंचन व्यवस्था धुळीस मिळविली (१२५८). यानंतर मेसोपोटेमियाला पूर्वीचे सांस्कृतिक वैभव कधीच प्राप्त झाले नाही. पहिल्या महायुद्धात त्याला रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. इराकचे राज्य १९२१ मध्ये अस्तित्वात आले आणि त्याचे १९५८ मध्ये लोकसत्ताक राज्यात रूपांतर झाले. त्याचे महत्त्व आजही प्राचीन अवशेषांमुळे टिकून आहे.

पहा : ॲसिरिया इराक बॅबिलोनिया.

संदर्भ : 1. Bury, J. B. Cook, S. A. and Others, Ed. Cambridge Ancient History, Vols., 3 &amp 4, Cambridge, 1970-75.

             2. Delaporte, L. J. Mesopotamia, New York, 1971.

             3. Frankfort, Henri, The Birth of Civilization in the Near East, New York, 1965.

             4. Kramer, S. N. Craidle of Civilization, New York, 1967.

             5. Oates, David, Studies in the Ancient History of Northen Iraq, Oxford, 1968.

             6. Oppenheim, Leo, Ancient Mesopotamia, Chicage, 1968.

देशपांडे, सु. र.