मेसीना : इटलीच्या सिसिली बेटावरील ईशान्येकडील याच नावाच्या प्रांताची राजधानी आणि महत्त्वाचे सागरी बंदर. लोकसंख्या २,६३,९२४ (१९८३). ते मेसीना सामुद्रधुनीवर वसले आहे. ग्रीक वसाहतकारांनी इ.स.पू. आठव्याशतकात झांक्ली या नावाने त्याची स्थापना केली. रीजीम येथील राजा ॲनॅक्सि लास याने इ.स.पू. पाचव्या शतकात ते जिंकून त्यास आपल्या जन्मगावाचे ‘मेसीना’ असे नाव दिले. सिराक्यूस व कार्थेज या नगरराज्यांशी मेसीनाची अनेक युध्दे झाली (इ. स. पू. चवथे-पाचवे शतक). पहिल्या प्यूनिक युद्धाच्या (इ. स. पू. २६४–२४१) शेवटी ते स्वतंत्र झाले. रोमशी त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यानंतर सिराक्यूस येथील डायोनायसस पहिला याने ते पुन्हा जिंकून शहराचे २२२ मध्ये पुनर्वसन केले. पाचव्याशतकात पाश्चात्त्य राज्याचा पाडाव झाला असताना ते गॉथ लोकांच्या ताब्यात होते. नवव्या शतकात सार्सेन टोळ्यांनी त्यावर ताबा मिळविला. १०७२ मध्ये ते नॉर्मन लोकांच्या, तर १२८२–१७१३ या काळात ते स्पेनच्या अखत्यारित झाले. १८४८ मध्ये नेपल्सने त्यावर विजय मिळवून शहर उद्‌ध्वस्त केले. शिवाय १७८३ व १९०८ च्या भूकंपांनी त्याचे अतोनात नुकसान होऊन ६०,००० लोक मृत्यू पावले. दुसऱ्या महायुद्धाच्या तडाख्याची त्यात भर ते पडून बेचिराख झाले. १७ ऑगस्ट १९४३ रोजी मेसीना सिसिलीच्या ताब्यात आल्यावर त्याचे पुनर्वसन करण्यात आले.

पूर्वी रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर जलमार्ग व रेल्वेमार्ग यांनी देशातील इतर शहरांशी जोडले असून ते महत्त्वाचे औद्योगिक केंद्र समजले जाते. शहरातील बव्हंशी इमारती अत्याधुनिक पद्धतीच्या असून येथे अनेक चर्च, मेसीना विद्यापीठ (स्था. १५४८) आणि प्रसिद्ध संग्रहालय आहे. अन्नप्रक्रिया, मद्य व रसायने तयार करणे, जहाज बांधणी इत्यादींचे शहरात कारखाने असून येथून ऑलिव्ह तेल, मद्य व लिंबूवर्गीय फळे इत्यादींची निर्यात होते.

मिसार, म. व्यं.