मेलिएसी : (निंब कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वर्गातील एका कुलाचे शास्त्रीय नाव. कडू निंब, तून, मॅहॉगनी, रोहितक इत्यादींसारख्या अनेक वनस्पतींचा यात समावेश आहे. या कुलाचा अंतर्भाव रूटेलीझ या गणात केला आहे. ⇨ रूटेसी (सताप कुल), ⇨ बर्सेरेसी (गुग्गुळ कुल) व सिमॅरूबेसी ही कुले मेलिएसी कुलाशी साम्य (व आप्तभाव) दर्शवीत असल्याने त्याच गणात आहेत. ए. एंग्लर (जी. बेंथॅ म आणि जे. डी. हूकर) यांनी रूटेसी व मेलिएसी ही कुले ⇨ जिरॅनिएलीझ अथवा भांड गणात घातली आहेत. जे. हचिन्सन यांनी मेलिएसी हे कुल मेनिएलीझ (निंब गण) या स्वतंत्र गणात घालून रूटेलीझ, मेलीएलीझ व ⇨ सॅपिंडेलीझ (अरिष्ट गण) हे तीन गण त्यांचे आप्तभाव त्यांनी ध्यानी घेऊन जवळ-जवळ ठेवले आहेत. एकसंघ (एकत्र जुळलेले) केसरमंडल, फुलातील बिंब (देठ व पुष्पदले या दोन्हींच्या सीमेवरचे उपांग), बीजकावरची औदर संधिरेषा, संयुक्त पिसासारखी पाने व त्यांचे (वनस्पतींचे) वृक्षस्वरूप ही मेलिएसीची प्रमुख लक्षणे आहेत. या कुलात सु. ४० प्रजाती (जे. सी. विलिस) अथवा ५० प्रजाती (ए. एंग्लर) व ८०० जाती (ए. बी. रेंडेल यांच्या मते ४५ प्रजाती व ७५० जाती) असून त्यांचा प्रसार मुख्यत्वे करून उष्ण कटिबंधात आहे. बहुतेक वनस्पती क्षुपे (झुडूपे) किंवा वृक्षे असून पाने अनुपपर्ण (तळाशी उपांगे नसलेली), एकाआड एक, संयुक्त व पिच्छकल्प (पिसासारखी) असतात. फुले नियमित, लहान द्विलिं गी व अवकिंज (इतर पुष्पदलांच्या वरच्या पातळीवर स्त्री-केसर असलेली) असतात. [→ फुल] . फुलोरा पानांच्या बगलेत किंवा फांदीच्या टोकास, कुंठित (मर्यादित वाढ असलेल्या), वल्लरीय परिमंजरी [पुष्कळ शाखा असलेला → पुष्पगंध] असते. फुलात संदले (पाकळ्यांखालील दले) ४–५, बहुधा सुटी पण फार क्वचित तळाशी जुळलेली आणि प्रदले (पाकळ्या) ४–५, क्वचित कमी जास्त व संदलाप्रमाणे असतात ८–१० केसरदले (पुं-केसर) जुळून वाढल्याने त्यांची लहान किंवा मोठी नळी बनते क्वचितच ते सुटे असतात (उदा., तून). केसरमंडल व किंजमंडल यांमध्ये बिंब असते. किंजदले (स्त्री-केसर) बहुधा २–५ जुळलेली असून किंजपुट (तळभाग) ऊर्ध्वस्थ (इतर दलांपेक्षा वरच्या पातळीवर) २–५ कप्प्यांचा असतो प्रत्येक कप्प्यात १–२ बीजके (बीजपूर्व अवयव) असून फळ मृदू (उदा., निंब), अश्मगर्भी (आठळीयुक्त) किंवा शुष्क प्रकारचे (बोंड) असते [→ फळ]. बी बहुधा पंखयुक्त असते. या कुलातील अनेक वृक्ष उपयुक्त असून सामान्यपणे आढळतात. बकाणा निंब व कडू निंब औषधी आहेत. तून, ⇨ मॅहॉगनी, लाल चंदन, लाल देवदारी हे वृक्ष लाकडाकरिता प्रसिद्ध आहेत काही वृक्ष शोभा व सावलीकरिता लावतात.
संदर्भ : 1. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
2. Rendle, A. B. The Clasification of Flowering Plants, Vol.II, Cambridge, 1963.
वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.