मेलर, नॉर्मन : (३१ जानेवारी १९२३–     ). अमेरिकन कादंबरीकार. लाँग ब्रँच, न्यू जर्सी येथे जन्मला. ब्रुकलिन मध्ये तो वाढला. हार्व्हर्ड विद्यापीठातून त्याने वायु गमनविज्ञानातील (एअरॉनॉटिक्स) अभियांत्रिकी पदवी घेतली. १९४४ ते १९४६ ह्या काळात त्याने सैन्यात नोकरी केली. द नेकिड अँड द डेड ही नॉर्मनची प्रकाशित झालेली पहिली कादंबरी (१९४८).(तत्पूर्वी ए ट्रांझिट टू व्हिनस ही कादंबरी त्याने लिहिली होती. ती अप्रकाशित आहे.) द नेकिड अँड द डेड मध्ये अमेरिकन समाजाच्या थरांतून आलेल्या काही तरुण सैनिकांचे, युद्धातील वेगवेगळ्या अनुभवांकडे पाहण्याचे दृष्टिकोण पहावयास मिळतात. ह्या कादंबरीला फार मोठे यश प्राप्त झाले. त्यानंतर त्याने बार्बरी शोअर (१९५१), द डिअर पार्क (१९५५), ॲन अमेरिकन ड्री  (१९६५), व्हाय आर वी इन व्हिएटनाम (१९६७) ह्या कादंबऱ्या लिहिल्या. बार्बरी शोअरमध्ये अमेरिकनांनी समाजवादाच्या घेतलेल्या धास्तीचा आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडातील विफलतेचा उपहास केलेला आहे. द डिअर पार्क ही युद्धात सहभागी झालेल्या एका वैमानिकाची कहाणी. ती तंत्रदृष्ट्या सदोष असली, तरी प्रभावी आहे… अमेरिकन ड्रीममध्ये अमेरिकन जीवनातील काम व हिंसा ह्यांचा हैदोस प्रत्ययकारीपणे दाखविलेला आहे. व्हाय आर वी इन व्हिएटनाममध्येही हिंसाचारातून वाढणाऱ्या व्यक्तिरेंखा दिसतात. ॲडव्हरटिझमेंटस् फॉर माय्‌सेल्फ (१९५९) हे त्याचे पुस्तक आत्मचरित्रात्मक असून त्यात त्याच्या अपूर्ण राहिलेल्या कथा कादंबऱ्यांचे काही भाग निबंध, अभिप्राय, त्याने केलेल्या काही नोंदी इ. बरेच संकीर्ण लेखन आहे.

मेलरने वैशिष्ट्यपूर्ण अशी पत्रकारीही केली आहे. त्याने पत्रकार म्हणून केलेल्या लेखनातून एक प्रकारचा आत्मनिष्ठ दृष्टीकोण प्रत्ययास येतो. १९६७ साली वॉशिंग्टनमध्ये शांततेच्या प्रीत्यर्थ झालेल्या निर्दशनांवरील द आर्मीज ऑफ द नाईट (१९६८) हे लेखन त्या दृष्टीने लक्षणीय होय.

मेलरने चित्रपटलेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनही केले (बियाँड द लॉ, १९६८ आणि मेडस्टोन, १९७८). डेथ्स फॉर द लेडीज अँड द डिझॅस्टर्स (१९६२) हा त्याचा कवितासंग्रह.

संदर्भ : 1.Foster, Richard, Narman Moiler, Minneapolis, 1968.

             2. Kaufman, D. L. Norman Mailer : The Countdown, 1869.

             3. Leeds, B. H. The Unstructured Vision of Norman Mailer, 1969.

नाईक, म. कृ.