मेनेंदेथ पिदाल रामॉन : (१३ मार्च १८६९–१४ नोव्हेंबर १९६८). विख्यात स्पॅनिश विद्वान. स्पेनमधील ला कॉरुना येथे जन्मला. मार्सेलीनो मेनेंदेथ ई पेलायो ह्या स्पॅनिश पंडिताचा तो शिष्य. माद्रिद विद्यापीठात तो रोमान्स भाषा-विज्ञानाचा प्राध्यापक होता (१८९९–१९३९). स्पॅनिश भाषा, मध्ययुगीन स्पॅनिश कविता, इतिवृत्ते ह्यांचा सखोल अभ्यास त्याने केला होता. La Leyenda de los Infantes de Lara (१८९६) हा त्याचा पहिला  ग्रंथ. स्पेनसंबंधीच्या इतिवृत्तांचे वर्गीकरण आणि प्राचीन बॅलडांचे अर्थान्वेषण ह्या ग्रंथात त्याने केलेले आहे.

त्याच्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांत ‘मॅन्युअल ऑफ हिस्टॉरिकल स्पॅनिश ग्रामर’ (१९०४ इं. शी.), ‘ऑरिजिन्स ऑफ स्पॅनिश’ (१९२६, इं. शी.), द थीद अँड स्पेन (१९२९, इं. भा. १९३४) ह्यांचा समावेश होता.

लोकविद्या (फोकलोअर), वाङ्‌मयेतिहास, व्युत्पत्तिशास्त्र ह्यांचे उत्तम संशोधन त्याने केले. काही साहित्यिकांच्या साहित्याचा-उदा., लोपे दे व्हेगा – शैलीवैज्ञानिक दृष्टीकोणातून त्याने अभ्यास केला. स्पॅनिश संस्कृतीच्या मूलस्त्रोतांचा शोध घेणे हे उद्दिष्ट त्याच्या ग्रंथांतून सतत प्रत्ययास येते. El Cantar de mio Cid ह्या प्राचीन स्पॅनिश काव्याची चिकित्सक आवृत्तीही त्याने संपादिली. (३ भाग, १९०८–११). १९३० मध्ये स्पनेच्या इतिहासाच्या संपादनाचे काम अनेक तज्ञांच्या सहकार्याने त्याने सुरू केले. त्याच्याहयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही. तथापि, ह्या महान इतिहासग्रंथाला तयाने लिहिलेली महत्त्वपूर्ण प्रस्तावना – ‘इ स्पॅनिआर्डस इन देअर हिस्टरी’ – १९४७, इं. भा. १९५० – वाचकांना उपलब्ध आहे.

माद्रिद येथे तो निधन पावला.

कळमकर, यं. शं.