मेतास्ताझ्यो, प्येअत्रो : (३ जानेवारी १६९८–१२ एप्रिल १७८२). इटालियन कवी आणि संगीत नाटककार. मूळ नाव प्येअत्रो. आंतोनीओ दोमेनीको बोनार्व्हेतुरा त्रापास्सी. त्याचा जन्म रोममध्ये झाला. आरंभी तो एका सोनाराकडे उमेदवारी करीत होता पण त्याच्यातील कवित्वशक्ती पाहून जिआन व्हीसेंझो ग्राव्हीना ह्या इटालियन साहित्यिकाने त्याला उत्तम शिक्षण आणि ‘मेतास्ताझ्यो’ हे नावही दिले.
मेतास्ताझ्योचा पहिला काव्यसंग्रह- Poesie di P. Metasasio १७१७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातच Giustino ही त्याने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहिलेली शोकात्मिका अंतर्भूत होती. १७१९ साली तो कायद्याच्या अभ्यासासाठी नेपल्सला गेला आणि तेथील उमरावांच्या वर्तुळात त्याला कवी म्हणून प्रवेश मिळाला. काही संगीतकारांशीही त्याचा परिचय झाला आणि तो संगीताच्या आणि गायनकलेच्या अभ्यासाकडे वळला. १७२३ मध्ये त्याने आपले संगीत नाटक- Didone abbandonata (इं. शी. डायडो फॉरसेकन) रचिले. त्यानंतचर त्याने लिहिलेल्या संगीत नाटकांत ‘द ऑलिंपिअड’ (१७३३ इं. शी.), ‘द मर्सी ऑफ टायटस’ (१७३४, इं. शी.), ‘थेमीस्टोक्लीझ’ (१७३६) आणि ‘आटिलस रेग्यूलस’ (१७४०, इं. शी.) ह्यांचा समावेश होतो.
उत्कृष्ट संगीत नाटककार म्हणून मेतास्ताझ्योचा लौकिक मोठा आहे. त्याच्या नाट्यकृतींना संगीत देण्यासाठी मोट्सार्टसारखे जगद्विख्यात संगीतकार त्याला लाभले. मेतास्ताझ्योच्या नाट्यलेखनशैलीत सहजपणाबरोबरच एक डौल होता. अठराव्या शतकात इटालियन संगीत रंगभूमीवर जी गायनशैली प्रचलित होती, तिला अनुकूल अशीच मेतास्ताझ्योची रचना असे.
पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट चार्ल्स सहावा ह्याच्या दरबारी १७३० पासून तो राजकवी होता आणि व्हिएन्ना येथे त्याचे वास्तव्य होते. तेथेच तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.