मेडिनेत अल् शाब : दक्षिण येमेन या देशाची पूर्वीची प्रशासकीय राजधानी. लोकसंख्या २०,००० (१९६७ अंदाज). एडनच्या आखातावरील लिटल एडन द्विपकल्पावर एडन शहराच्या पश्चिमेस २३ किमी. अंतरावर हे नगर वसलेले आहे. ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील संरक्षित दक्षिण अरेबिया या प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण म्हणून १९५९ मध्ये अल्‌-इतिहाद नावाने या नगराची स्थापना करण्यात आली. १९६७ मध्ये दक्षिण येमेन स्वतंत्र झाल्यापासून अल्‌-इतिहादचे मेडिनेत अल् शाब असे नामकरण करण्यात आले. १९६७ ते १९७० या काळात एडनबरोबरच मेडिनेत अल् शाब हेही दक्षिण येमेनच्या राजधानीचे ठिकाण होते. १९७० पासून मात्र एडन हेच देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

चौधरी, वसंत