मेटलंड, फ्रेडरिक विल्यम : (२८ मे १८५०–१९ डिसेंबर १९०६). सुप्रसिद्ध इंग्लिश इतिहासकार व विधिवेत्ता. जन्म लंडन येथे एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. शिक्षण केंब्रिजच्या ईटन व ट्रिनिटी महाविद्यालयात बी. ए. (१८७३) व एम्. ए. (१८७६). त्यानंतर लंडन येथील ‘लिंकन्स इन’ मधून कायद्याची पदवी. १८७६ ते १८४४ पर्यंत वकिलीचा व्यवसाय. पुढे केंब्रिज विद्यापीठात प्रपाठक (१८८४) व प्राध्यापक (१८८८).

सर फ्रेडरिक पोलॅकसह दोन खडांत लिहिलेल्या द हिस्टरी ऑफ इंग्लिश लॉ बिफोर द टाइम ऑफ एडवर्ड द फर्स्ट (१८९५) हा त्याचा ग्रंथ विशेष महत्त्वाचा होय. या ग्रंथातील अँग्लो-सॅक्सन कायद्याचे लेखन वगळता उर्वरित सर्व लेखन मेटलंडनेच केले. या ग्रंथाच्या दोन आवृत्त्याही निघाल्या (१८९८, १९६८). इंग्लिश विधीवरील हा विस्तृत ग्रंथ अभिजात वाङ्‌मयात मोडतो.

 

द लॉ ऑफ रिअल प्रॉपर्टी (१८७९) ह्या त्याच्या पहिल्या ग्रंथामुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. या ग्रंथात त्याने सुचविलेल्या काही सुधारणा ब्रिटिश संसदेने १९२६ मध्ये स्वीकारल्या. तसेच रेकॉर्डस् ऑफ द पार्लमेंट होल्डन ऑफ वेस्टमिन्स्टर (१८९३) ह्या त्याने संपादित केलेल्या ब्रिटिश संसदेच्या वृत्तांताने संसदइतिहासाच्या अध्ययनास चालना मिळाली. यांशिवाय तेराव्या शतकातील ब्रॅक्टन हेन्री डी या न्यायाधीशाने संगृहीत केलेल्या खटल्यांच्या आधारावर लिहिलेला ब्रॅक्टन्‌स नोट बुक (१८८७), रोमन कॅनन लॉ इन द चर्च ऑफ इंग्लंड (१८९८), इंग्लिश लॉ अँड द रिनेसन्स (१९०१) इ. ग्रंथांचे लेखन करून त्याने विधिविषयामध्ये मोलाची भर घातली. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी १८८७ मध्ये स्थापन केलेल्या ‘सेल्डन सोसायटी’ मधून त्याने अनेक ग्रंथ संपादित केले. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या अधिव्याख्यानांची टिपणे संपादित करून द कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी ऑफ इंग्लंड (१९०८), एक्विटी (१९०९) व द फॉर्म्‌स ऑफ ॲक्शन ॲट कॉमन लॉ (१९०९) ही पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली. मेटलंड याने प्रथमच कायद्याच्या अभ्यासाची समाजाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक इतिहासाशी सांगड घातली. त्याचप्रमाणे कायद्याच्या तौलनिक अभ्यासाचेही महत्त्व पटवून दिले. यूरोपीय न्यायशास्त्राच्या मध्यवर्ती प्रवाहात इंग्लिश कायद्याला त्याने महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. केंब्रिज, ऑक्सफर्ड व परदेशातील इतरही काही विद्यापीठांनी त्याला अनेक बहुमानाच्या पदव्या दिल्या. कानेरी बेटावरील लास पाल्मास येथे त्याचे निधन झाले.

राव, सुनीती