विद्वेष, कायद्यातील : कोणतेही योग्य अथवा संभवनीय कारण नसताना, एखाद्याच्या विरूद्ध दुष्ट बुद्धीने वा वाईट हेतूने केलेले कृत्य. ‘विद्वेष’ (मॅलिस इन लॉ) या संज्ञेची व्याख्या भारतीय दंड संहितेत दिलेली नाही. तथापि सामान्यपणे एखाद्या व्यक्तिविरुद्ध विद्वेषाने, हेतूपूर्वक केलेले अवैध स्वरूपाचे कृत्य, असा याचा अर्थ होतो. एखादे कृत्य विद्वेषाने केले म्हणजे संबंधितांकडून, सहेतुक व असमर्थनीय ⇨अपकृत्य घडले, किंवा वाईट हेतूने घडले, हेहीतपासावे लागते.

सामान्य व्यवहारांत विद्वेष व दुष्टबुद्धी समानार्थीच आहेत पण दुष्टबुद्धी नसताही सबब नसलेले अपकृत्य घडले, तर कायदा त्यास विद्वेषाचे अस्तित्व मानतो आणि ही गोष्ट दिवाणी कायद्यात महत्त्वाची समजली जाते [⟶दिवाणी कायदा]. फौजदारी विधीत मात्र विद्वेष अथवा आकस असल्याशिवाय गुन्हा ठरला जात नाही [⟶फौजदारी विधी].

विद्वेष म्हणजे अयोग्य हेतू व अशा हेतूने कृत्य दोषी होय. खोटी फिर्याद, अब्रुनुकसानी वगैरे अपकृत्यांत हा हेतू पाहिला जातो. कायदेशीर कामाकरिता हेतू काय होता, हे पाहणे अनावश्यक आहे. फिर्याद कायदेशीर असेल, तर फिर्यादीचा हेतू सूड घेण्याचा होता, हा मुद्दा गैरवाजवी आहे. त्याचप्रमाणे कृत्य कायद्याने निषिद्ध असेल, परंतु त्यामागे उदात्त हेतू होता असे म्हणून ते निर्दोषी ठरत नाही. गरिबांना मदत करण्यासाठी दुसऱ्याच्या घरावर दरोडा घालणे, हा गुन्हा होय.त्याशिवाय नुकसानभरपाईच्या मोजमापात हेतू किती प्रमाणात अयोग्य होता व आकस कितपत होता, याचीही छाननी केली जाते.

काही अपकृत्यांच्या बाबतीत अयोग्य हेतू दाखविणे जरूर असते. उदा., अब्रुनुकसानी, खोटी फिर्याद, मालाची निंदानालस्ती, कट, उपद्रव इत्यादी. कोणतेही कृत्य गुन्हा आहे हे शाबीत करताना कर्त्याच्या ⇨दुराशयास (मेन्झरी) महत्त्व येते. दुराशय ठरविताना कृत्याचा परिणाम न पाहता ते करणाऱ्याझचा हेतू काय होता, हे पाहिले जाते. काही बाबतींत कल्याणकारी व सामाजिक हित डोळ्यापुढे ठेऊन, विशेषतः सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता व सुरक्षितता यांसाठी केलेल्या कायद्यांत, दुराशयाशिवाय फक्त परिणामावरून शिक्षा देण्याकडे कल दिसून येतो.

भारतीय दंड संहितेत काही विद्वेषपूर्वक गुन्ह्यांची माहिती देण्यात आलेली आहे. उदा., लोकसेवकाने एखादा निकाल विद्वेषपूर्वक देणे, एखाद्या इसमास विद्वेषाने गैरकायदा अटकेत ठेवणे इत्यादी. अशा विद्वेषांची छाननी होताना त्यांपासून दुसऱ्या इसमास त्रास झाला आहे की नाही, याचा विचार केला जातो.

इंग्लिश विधीनुसार खुनाच्या आरोपामध्ये खून करण्याअगोदर आरोपीचा हेतू विद्वेषमूलक होता, हे सिद्ध करावे लागते. भारतीय कायद्यानुसार भारतीय दंड संहितेमधील व्याख्येप्रमाणे जर खून झाला असेल, तर हेतूचा प्रश्न अप्रस्तुत आहे.  

कवळेकर, सुशील