निखातनिधि : निखातनिधी म्हणजे अज्ञात मालकाची जमिनीत पुरलेली मूल्यवान चीजवस्तू असे सामान्यपणे म्हणता येईल. इंग्रजी विधीप्रमाणे तो सहकारी मालकीचा असतो. भारतात १८७८ चा ६ वा भारतीय निखात धन अधिनियम अंमलात आहे. त्यानुसार दहा रुपये किंवा अधिक मूल्याच्या धनाबद्दल तपशीलवार माहिती निखातनिधी सापडणाऱ्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते. या संदर्भात हक्क सांगणाऱ्यांनी उपस्थित रहावे म्हणून जिल्हाधिकारी अधिसूचना प्रसिद्ध करतात. अनुपस्थितांचा हक्क जातो. धन कोणी व कोठे पुरले आणि कोणाला सापडले यांबद्दल जिल्हाधिकारी चौकशीअंती निर्णय देतात. तत्पूर्वी शंभर वर्षांच्या आत हक्क सांगणाऱ्याने किंवा त्याच्या पूर्वाधिकाऱ्यांनी ते धन पुरल्याचे दिसून आल्यास हक्कदाराला दिलेल्या योग्य वेळात हक्क स्थापनेचा दावा लावता यावा, म्हणून कार्यवाही स्थगित करतात. हक्कदाराने दावा न लावल्यास किंवा तो फेटाळला गेल्यास किंवा धन पुरलेच नव्हते, असे वाटल्यास जिल्हाधिकारी ते निर्मालक असल्याचे ठरवतात. जागामालक म्हणून कोणीही पुढे न आल्यास निर्मालक धन ज्याला सापडले असेल त्यास देतात. अशा व्यक्तीला मान्य असा एकच हक्कदार पुढे आल्यास त्याला निखातनिधीचा चौथा आणि शोधकाला पाऊण हिस्सा देतात. एकापेक्षा अधिक हक्कदार पुढे आल्यास कार्यवाही स्थगित करून हक्कदारांना दावा लावण्याची संधी देतात आणि न्यायनिर्णयाप्रमाणे विभागणी करतात. सरकारासाठी धनसंपादन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे. शोधकाने नोटीस देण्यासारखी कर्तव्ये न केल्यास त्याचा व त्याच्या अपप्रेरक हक्कदारांचा धनांश सरकारजमा होतो व ते शिक्षेस पात्र होतात.

श्रीखंडे, ना. स.