मेंफिस–१ :अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील सर्वांत मोठे शहर. हे राज्याच्या नैर्ऋत्य भागात मिसिसिपी नदीकाठावर वसले आहे. लोकसंख्या ६,४८,३९९ (१९८४ अंदाज). व्यापारी व औद्योगिक केंद्र, कापसाची जागतिक बाजारपेठ व इमारती लाकडाचे उत्पादन यांसाठी ते प्रसिद्ध आहे. देशाच्या एकूण कापूस उत्पादनाच्या एकतृतीयांश कापसाची खरेदी-विक्री या शहरात होते. तांदूळ, गहू, तंबाखू, सोयाबीन, फळे, भाजीपाला इ. पिके शहराच्या परिसरात घेतली जातात. दूधदुभत्याच्या पदार्थांचेही उत्पादन केले जाते.

शहरातील उद्योगधंद्यांत प्रामुख्याने खाद्यपदार्थ, कागद, विजेची उपकरणे, फर्निचर, मांसप्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो. शहराजवळील परिसरात कोळसा, इमारती दगड, संगमरवर इ. नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. वायुमार्ग, लोहमार्ग व जालमार्ग यांचे हे केंद्र असून सेंट लूइस व न्यू ऑर्लीअन्स बंदरांमार्फत येथील व्यापार चालतो. शहरात २० दवाखाने, ५ दूरचित्रवाणी केंद्रे, ११० प्राथमिक शाळा, ५० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, एक राज्य विद्यापीठ, ‘मेंफिस अकादमी ऑफ आर्ट्स’ इ. सुविधा असून द मेंफिस पिंक पॅलेस म्यूझियम आहे. येथील नागरिकांपैकी सु. २०% लोक निग्रो आहेत.

मिसार, म. व्यं.