मेंदोसा : अर्जेंटिनाच्या पश्चिम भागातील याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ६,०५,६२३ (१९८०). हे अँडीज पर्वताच्या स्यीरा दे लॉस ला पारामियोस या दुय्यम पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी, मेंदोसा नदीखोऱ्यात, सस. पासून ७६१ मी. उंचीवर वसले आहे. चिलीमधून आलेल्या स्पॅनिशांनी १५६० मध्ये या शहराची स्थापना केली. १७७६ पर्यंत या ठिकाणावर त्यांचाच ताबा होता. क्यूयो या नावानेही हे ओळखले जाई. १८६१ मध्ये झालेल्या भूकंपाने शहराची खूपच हानी झाली. त्यानंतर १८६३ मध्ये मूळ शहराच्या जवळच आधुनिक शहराची योजनाबद्ध आखणी करण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन लोकांनी मोठ्या प्रमाणावर येथे स्थलांतर केले त्यामुळेच त्यांची संख्या शहरात अधिक दिसते. इटालियनांच्या आगमनानंतरच तसेच ब्वेनस एअरीझ या राजधानीशी लोहमार्गाने जोडल्यानंतर येथील आर्थिक व्यापार व वाहतूक यांच्या विकासाला गती आली. शहराचे हवामान कोरडे असले, तरी मेंद्रोसा नदीचा व तिच्या कालव्यांचा जलसिंचनासाठी वापर करून फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे. द्राक्षांचे तसेच फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शहरात मध व मुरंबे निर्मिती, फळे डबाबंद करणे आणि खनिज तेल रसायनउद्योग महत्त्वाचे आहेत. रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग यांनी देशातील महत्त्वाच्या शहरांशी व बंदरांशी मेंदोसा जोडले असून हे चिलीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. तसेच ब्वेनस एअरीझ (अर्जेंटिना) व व्हॅलपारेझो (चिली) यांना जोडणारा ट्रान्श-अँडीज किंवा चिली–अर्जेंटिना हा लोहमार्ग मेंदोसा शहराच्या जवळूनच जातो. अर्जेंटिनाच्या वायुसेनेचा तळ या ठिकाणी आहे. शहरात अनेक चित्रपटगृहे व नाट्यगृहे, मानवशास्त्र व सृष्टिविज्ञानविषयक वस्तुसंग्रहालय, क्यूयो राष्ट्रीय विद्यापीठ (स्था. १९३९) व इतर दोन खाजगी विद्यापीठे आहेत. मेंदोसाच्या आसमंतात असलेली सुपीक मरुजलभूमी, हिमाच्छादित पर्वतश्रेण्या आणि शहरातील दुतर्फा भरपूर वृक्ष असलेले रुंद रस्ते व चौक, उद्याने यांमुळे मेंदोसाला ‘गार्डन ऑफ द अँडीज’ असे संबोधले जाते.
चौधरी, वसंत
“