मृत्युपत्र : कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या मिळकतीसंबंधी, आपल्या मृत्यूनंतर अंमलात यावे या हेतूने स्वतःच्या इच्छेने केलेले प्रकटीकरण म्हणजे मृत्युपत्र. तसेच ज्या लेखाने मृत्युपत्रात काही बदल केला असेल, अगर त्याचे स्पष्टीकरण केलेले असेल अगर त्यात काही अधिक घातले असेल, तर अशा लेखास मृत्युपत्राची पुरवणी म्हणतात.

मृत्युपत्रकर्ता म्हणजे मृत्युपत्र करून ठेवणारा. मृत्युपत्रांत लिहिल्याप्रमाणे मरणोत्तर व्यवस्था करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक मृत्युपत्राने केलेली असते, अशा व्यक्तीस मृत्युपत्र बजावणारा असे म्हणतात.

 

भारतीय उत्तराधिकार अधिनियमाच्या (१९२५) सहाव्या भागामध्ये कलम ५७ ते १९० यांत मृत्युपत्रीय उत्तराधिकारासंबंधी अनेक तरतुदी केलेल्या आहेत. त्यांपैकी ५८, ६०, ६५, ६६, ६७, ६९, ७२, ९१, ९२, ९३, ९४ व ११८ ही कलमे हिंदू, बौद्ध, शीख व जैन यांस लागू नाहीत. तसेच कलम २१३ हे १ जानेवारी १९२७ नंतरच्या हिंदू, बौद्ध, शीख व जैन या जमातींपैकी कोणत्याही इसमाचे मृत्युपत्रास लागू नाही. जर असे मृत्युपत्र कलकत्ता, मुंबई व मद्रास या शहरांतील मिळकतीसंबंधी असेल, तर कलम २१३ लागतेच. कलम २१३ जेव्हा लागत असेल, तेव्हा मृत्युपत्रप्रमाणाशिवाय (प्रोबेट) मृत्युपत्राचा अंमल होऊ शकत नाही. वरील तीन शहरांखेरीज इतर कोठल्याही ठिकाणच्या मिळकतीसंबंधी मृत्युपत्रप्रमाण मिळविण्याची जरूरी नाही. 

मुसलमानांची मृत्युपत्रे मुसलमानी विधिप्रमाणे करावी लागतात. मुसलमानी कायद्याप्रमाणे मुस्लिम व्यक्तीस स्वतःच्या संपत्तीच्या फक्त १/३ भागाची व्यवस्था मृत्युपत्रान्वये करता येते. इतरांसाठी मात्र हा नियम नाही. मुस्लिम व्यक्तीखेरीज बाकी सर्वजण स्वतःच्या संपूर्ण मालमत्तेची व्यवस्था मृत्युपत्रान्वये करू शकतात. 

एतद्‌देशीय ख्रिश्चनांस भारतीय उत्तराधिकार अधिनियमाचा भाग सहा पूर्णतः लागू आहे. 

मृत्युपत्र साध्या कागदावरच करावयाचे असते. मृत्युपत्र लिहून (स्वदस्तुरचे अगर इतर कोणाचे हस्ताक्षर) झाल्यानंतर मृत्युपत्र करणाऱ्या इसमाने त्याची स्वाक्षरी त्यावर करावी लागते. (स्वाक्षरी करणे यात स्वतःची कोणतीही खूण, साधारणपणे डाव्या हाताचा अंगठा इ. करून त्यास दस्तुर लावतात).

त्यानंतर मृत्युपत्रावर मृत्युपत्रकर्त्याने आपली स्वाक्षरी केली आहे, याचा पुरावा म्हणून कमीत कमी दोन साक्षीदारांच्या साक्षीच्या सह्या घेतल्या पाहिजेत. अशा साक्षी घालणाऱ्या इसमांच्या समोर मृत्युपत्रकर्त्याने आपली सही केलेली असली पाहिजे. अगर साक्षी घालण्यापूर्वी मृत्युपत्रकर्त्यानेच मृत्युपत्रावर सही केली आहे, अशी त्याची कबुली घेऊन साक्षीदारांनी साक्षी घातलेल्या असल्या पाहिजेत. मात्र साक्षीदारांनी ज्या साक्षी घालावयाच्या असतात त्या भिन्न वेळी घातल्या असल्या, तरी प्रत्येक साक्षीदाराची सही मात्र मृत्युपत्रकर्त्याच्या समोर झालेली पाहिजे. याप्रमाणे सही व साक्षी झाल्या आहेत असे शाबीत झाले, तरच कायदेशीर रीत्या मृत्युपत्र शाबीत झाले असे म्हणतात. मृत्युपत्र नोंद (रजिस्टर्ड) करण्याची सक्ती कायद्याने केलेली नाही. परंतु पुरेसा पुरावा व नंतर उद्‌भवणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मृत्युपत्र नोंद करणे योग्य ठरते.

पटवर्धन, वि. भा.