उपद्रव: (न्यूसन्स). अपाय किंवा नुकसान. दुसऱ्याच्या शरीरास, मालमत्तेस अगर उपभोगाच्या हक्कास अतिक्रमणाच्या स्वरूपात न मोडणारा अपाय किंवा इजा करणे म्हणजे कायद्याच्या परिभाषेत उपद्रव होय. त्याची गणना गुन्ह्यात किंवा अपकृत्यात होते व काही परिस्थितीत दोन्हीतही होते. इजा व नुकसान झाले, तरच तो कारवाईयोग्य होतो.

उपद्रव अतिक्रमणाहून भिन्न आहे. नुकसान झाले नाही, तरी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई होऊ शकते. तसे उपद्रवाचे नाही. नुकसान किंवा इजा सिद्ध झाल्यावरच तो कारवाईयोग्य असतो. त्याचप्रमाणे अल्पकाळापर्यंत का होईना, उपद्रवाच्या परिस्थितीत सातत्य असले पाहिजे. अतिक्रमण प्रसंगविशेषी झाले, तरी ते कारवाई योग्य असते. प्रत्यक्ष कबजास इजा न पोहोचता कबजात अंगभूत असणाऱ्या उपभोगाच्या आनुषंगिक हक्कास उपद्रवानने इजा पोहोचते. उदा., रहदारीचा हक्क किंवा प्रकाशाचा हक्क हा एखाद्याच्या मालमत्तेवर असलेला अमूर्त हक्क आहे. अशा हक्कात अतिक्रमण न करता व्यत्यय आणल्यास उपद्रव होईल परंतु कबजालाच ज्यावेळी इजा पोहोचते, त्यावेळी उपद्रव व अतिक्रमण यांची परस्परव्याप्ती होते. उदा., एखाद्याच्या जनावरांनी दुसऱ्याच्या मालमत्तेवर केलेले अतिक्रमण.

अपायाच्या किंवा इजेच्या स्वरूपातील फरकाच्या दृष्टीने सार्वजनिक उपद्रव व खासगी उपद्रव असे उपद्रवाचे दोन प्रकार करण्यात आले आहेत. साधारणतः सार्वजनिक उपद्रव गुन्हा होतो, तर खासगी उपद्रव अपकृत्य होते. काही वेळा सार्वजनिक उपद्रव व खासगी उपद्रव एकच असू शकतो. उदा., त्रासदायक आवाज होणारा धंदा शेजाऱ्याला किंवा सर्व साधारण जनतेला इजा पोहोचविणारा वास. उपद्रव हा खासगी आहे किंवा सार्वजनिक आहे, हे ठरविणे प्रत्येक प्रकरणाच्या तपशिलावर अवलंबून आहे. खासगी उपद्रवाने विशिष्ट मालमत्ता उपभोगीत असलेल्या एका किंवा अधिक व्यक्तींवर परिणाम होतो. सर्व साधारण जनतेला किंवा आसपास राहणाऱ्या बऱ्याच मोठ्या विभागातील लोकांना अपाय किंवा त्रास झाला, तर तो सार्वजनिक उपद्रव होतो.

सार्वजनिक उपद्रव: आजूबाजूस राहणार्‍या किंवा सार्वजनिक हक्क उपभोगणाऱ्या लोकांस अपाय, धोका किंवा अडथळा होण्याजोगी किंवा चीड आणण्याजोगी कृती किंवा अकृती म्हणजे सार्वजनिक उपद्रव होय. सार्वजनिक उपद्रवामुळे सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता वा सुखसोयी यांस बाधा उत्पन्न होते. कृतीने किंवा अकृतीने होणारा हा अपाय भरीव व प्रत्यक्ष असावयास पाहिजे. सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, आराम यांना बाध आणणाऱ्या कृतीबरोबर सार्वजनिक नीतिमत्ता धोक्यात आणणारी कृतीही सार्वजनिक उपद्रवात मोडते. जीवनास किंवा मालमत्ता उपभोगण्यास त्रासदायक होईल, अशा तऱ्हेने वेश्यागृहे, दारूची भट्टी किंवा खाटिकखाना चालविणे हेही सार्वजनिक उपद्रवात मोडू शकेल व संबंधित व्यक्तीवर फौजदारी खटला होऊ शकेल. साथ फैलावणारे अन्न, पाणी, औषध यांमध्ये भेसळ निर्माण करणारे आरोग्यास बाधक असणारे व हवा दूषित करणारे कृत्य सार्वजनिक उपद्रव आहे. त्याचप्रमाणे वाहन बेफाम हाकणे किंवा चालविणे, खोट्या चिन्हाचे किंवा प्रकाशाचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक मार्ग किंवा नाविक मार्ग यामध्ये अडचण किंवा धोका निर्माण करणे अश्लील साहित्य किंवा चित्र विकणे किंवा अश्लील हावभाव करणे, याही गोष्टी उपद्रवात मोडतात. विष, आग, ज्वालाग्राही वस्तू, यंत्रसामग्री, इमारत अथवा जनावरे यांच्या बाबतींत सार्वजनिक अपाय होईल अशा निष्काळजीपणाने वागणे, ही सार्वजनिक उपद्रवाची आणखी काही उदाहरणे आहेत.

सार्वजनिक उपद्रवाच्या खटल्यात सोय किंवा फायदा हा बचाव होऊ शकत नाही. चिरभोगाने सार्वजनिक उपद्रव वैध होऊ शकत नाही. सार्वजनिक उपद्रव गुन्ह्यात मोडत असला, तरी त्याबद्दल नुकसानभरपाईचा दिवाणी दावा होऊ शकतो. साधारणतः त्याचे उपशमन पीडितांना स्वतःला करता येत नाही त्याकरिता न्यायालयातच दाद मागावी लागते.

सार्वजनिक उपद्रव दूर करण्याकरिता खालील उपाय आहेत : (अ) सार्वजनिक उपद्रव करणार्‍याविरुद्ध फौजदारी खटला करता येतो. (ब) महाधिवक्ता किंवा लोकातील दोन किंवा अधिक व्यक्ती महाधिवक्त्याच्या लेखी संमतीने दिवाणी व्यवहारसंहितेच्या कलम ९१ प्रमाण हक्क घोषणेकरिता, व्यादेशाकरिता किंवा परिस्थितीनुरूप अशाच इतर अनुतोषाकरिता दावा करू शकतात. विशेष नुकसान न झालेल्या परिस्थितीत हेच फक्त दिवाणी अनुतोष पीडितांना उपलब्ध आहेत. विशेष नुकसान सिद्ध करणाऱ्या व्यक्तीस मात्र नुकसान-भरपाईबाबत दिवाणी दावा लावता येतो.

खासगी उपद्रव: आपल्या मालमत्तेच्या गैरउपयोगामुळे दुसऱ्याच्या आरोग्यास, सुखसोयीस अथवा मालमत्तेस इजा पोहोचविणारे कृत्य सर्वसाधारणत: खाजगी उपद्रव समजण्यात येते व ते अपकृत्यात मोडते. या उपद्रवाने सर्वसाधारण जनता किंवा अनेक व्यक्ती पीडित न होता साधारणतः एका विशिष्ट व्यक्तीवर किंवा सर्वसाधारण जनतेत न मोडणाऱ्या विशिष्ट व्यक्तींच्यावर त्याचा परिणाम होतो. सोयीच्या दृष्टीने या उपद्रवाचे दोन वर्ग पाडता येतील. (१) स्थावर संपत्तिविषयक अमूर्त हक्कास अपाय करणे. उदा., कोणत्याही प्रकारच्या सुविधाधिकारास इजा पोहोचविणे. (२) स्वतःच्या मालमत्तेचा अयोग्य वापर करून व्यक्तीस, मालमत्तेस अपाय करणे. उदा., धूर, पाणी, जनावरे इ. अपायकारकरीत्या मालमत्तेवर जाऊ देणे. प्रकाशास अडथळा, हवापाणी दूषित करणे व आरडाओरड किंवा गोंधळ करणे यांपासून निर्माण होणारे उपद्रव बव्हंशी शारीरिक अस्वास्थ्यास कारणीभूत होतात. चिरभोगाने खासगी उपद्रवाला मात्र वैध स्वरूप देता येते.

खासगी उपद्रव दूर करण्याचे तीन उपाय आहेत : (१) कायदेशीर कारवाई न करता पीडित व्यक्ती स्वतःच अशा उपद्रवाचे उपशमन करू शकते पण ते शांततेच्या मार्गाने व अतिक्रमण न करता व्हावयास पाहिजे. (२) दिवाणी न्यायालयात दावा करून पीडित व्यक्ती नुकसान-भरपाई मागू शकते. (३) दिवाणी न्यायालयातून पीडित व्यक्ती व्यादेश मिळवू शकते.

वादी स्वतः होऊन उपद्रवाच्या सान्निध्यात आला आहे, उपद्रवाचे कृत्य लोकहिताचे आहे, जागा सोईस्कर आहे, दुसऱ्याचे साहाय्यक कृत्य आहे, पीडकाने स्वतःच्या मालमत्तेचा योग्य तो उपयोग केला आहे, हे बचाव उपद्रवाच्या दाव्यात निरुपयोगी आहेत.

संदर्भ : 1. Heuston, R. V. Ed. Salmond on the Law of Torts, London, 1961.

          2. Iyer, S. Ramaswami, The Law of Torts, Madras, 1965.

          3. Thakore, Dhirajlal Keshavlal Vakiel, Manharlal Ratanlal, The English and Indian Law of Torts. Bombay, 1960.

खोडवे, अच्युत