गहाण: कर्जफेडीच्या शाश्ववतीसाठी एखाद्या विशिष्ट मिळकतीतील हक्क तारण ठेवणे. तारणाची मिळकत स्थावर अगर जंगम असू शकते. दोन्ही प्रकारच्या तारणव्यवहारांस मराठी भाषेत ‘गहाण’ असा एकच शब्द वापरतात. इंग्रजीत त्याला ‘मॉर्गिज’ आणि ‘प्लेज’ अशा संज्ञा असून दोन्हींसाठी कायद्यात निरनिराळ्या तरतुदी आहेत.

प्राचीन रोमन कायद्यानुसार ठराविक मुदतीत कर्ज परत न केल्यास अगदी भारी किंमतीचा मिळकतसुद्धा गहाण घेणाऱ्याच्या कायम मालकीची होत असे. नंतर मात्र या कायद्यात सुधारणा झाली. इंग्‍लंडमध्ये अँग्‍लो-सॅक्सन व नॉर्मन काळांमध्ये फक्त फलयोग्य ताबेगहाण विधिसंमत होते. गहाणाच्या उत्पन्नातून करावयाची फेड मुद्दलाचीही असल्यास त्यास जिवंत गहाण व फक्त व्याजाचीच असल्यास त्यास मृत गहाण (मॉर्ट = मृत, गेज = तारण) अशा संज्ञांनी ओळखले जाई. सतराव्या शतकात सशर्त विक्री गहाण विधिमान्य झाले. नंतर १९२५ साली मिळकतीच्या हक्काचा कायदाच अस्तित्वात आला. इस्लाम धर्मात व्याज घेणे हे निषिद्ध असले, तरी ‘रेहान’ व ‘बाय-बिल-वफा’ नावाचे मिळकतीचे भाडे व उत्पन्न घेता येणारे फलभोग्य ताबेगहाण त्यात मान्य आहे. गहाणास प्राचीन भारतीय ग्रंथात ‘आधि’ अशी संज्ञा आढळते. नारदस्मृतीत गहाणाचे ‘कृतकालापनेय’ व ‘यावद्देयोद्यत’ असे मुख्य व तदंतर्गत ‘गोप्य’ व ‘भोग्य’ असे प्रकार दिले असून याज्ञवल्क्यस्मृतीत ‘कालकृत’ व ‘फलभोग्य’ हे प्रकार आहेत.

स्थावरगहाण: स्थावर गहाण सहा प्रकारांनी करता येते. याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदी मिळकत हस्तांतर अधिनियमांतील कलम ५८ ते १०४ मध्ये आहेत.

(१)साधे किंवा नजर गहाण: मिळकतीचा ताबा न देता त्यातील फक्त विक्रीचा हक्क तारण ठेवणे. या प्रकारात गहाण घेणाऱ्यास मिळकतीचा ताबा मिळत नाही. फक्त विक्रीचा हक्क प्राप्त होतो. कर्जफेडीस गहाणदार व्यक्तिशः जबाबदार असतो. कर्जवसुलीसाठी गहाण घेणाऱ्यास गहाणदाराविरूद्ध व्यक्तिगत स्वरूपाचा दावा लावता येतो. शिवाय गहाण ठेवलेल्या अगर मिळकतीच्या विक्रीचाही दावा लावता येतो.

(२) सशर्त विक्री गहाण : विक्रीची अट घालून केलेले गहाण यात मिळकतीची प्रायः विक्री केलेली असते. मात्र ठरलेल्या मुदतीत कर्जफेड केल्यास खरेदी रद्द होण्याची वा न केल्यास खरेदी कायम रहावयाची शर्त गहाणपत्रात घातलेली असते. कर्जवसुलीसाठी गहाण घेणाऱ्यास गहाणदाराचा गहाणावरील हक्कसमाप्तीचा दावा लावता येतो.

(३) फलभोग्य गहाण : कर्जफेड होईपर्यंत मिळकत उपभोगण्याचे गहाण. या प्रकारात गहाण घेणाऱ्यास कर्जफेड होईपर्यंत गहाण मिळकत ताब्यात ठेवून तिचे उत्पन्न व्याजापोटी अगर मुद्दलापोटी उपभोगण्याचा हक्क असतो. कर्जवसुलीसाठी गहाण घेणाऱ्यास गहाण मिळकत विक्रिचा अगर गहाणदाराचा हक्कसमाप्तीचा दावा लावता येत नाही.

(४) इंग्‍लिश गहाण : कर्जाची फेड ठराविक तारखेस करण्याची शर्त घालून केलेले गहाण. या प्रकारातही मिळकत पूर्णपणे गहाण घेणाऱ्याच्या ताब्यात दिली जाते. यात कर्जफेड करण्यास गहाणदार व्यक्तिशः जबाबदार असतो. कर्जवसुलीसाठी गहाण घेणाऱ्यास गहाण मिळकतीच्या विक्रीसाठी दावा करता येतो.

(५) विश्वास किंवा समन्याय गहाण : मिळकतीवरील हक्कदर्शक कागदपत्रे अनामत ठेवून केलेले गहाण. व्यापारी वर्गाच्या सोयीसाठी मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे या प्रकारच्या गहाणाचा व्यवहार होतो. या गहाणाच्या तरतुदी साध्या इतर गहाणाच्या तरतुदीप्रमाणेच असतात. यात गहाण मिळकत ही उपरिनिर्दिष्ट शहराबाहेरचीही असू शकतो.

(६) असंगत गहाण : या प्रकारात वरील पाचही प्रकारांव्यतिरिक्त इतर स्वरूपाच्या किंवा स्थानिक रूढींप्रमाणे गहाणाच्या शर्तीवर असतात. कर्जवसुलीसंबंधीची उपाययोजना गहाणपत्रातील शर्तीवर व गहाण मिळकतीचा ताबा देणे अगर न देणे, हे ठरविण्यावर अवलंबून असते.

जंगम गहाण: या प्रकारामध्ये जंगम स्वरूपाची गहाण मिळकत, उदा., दागदागिने, भांडीकुंडी इ. सावकाराकडे तारण ठेवलेली असते. यामध्ये जंगम मालमत्तेचा ताबा गहाण घेणाऱ्याकडे द्यावाच लागतो. कर्जवसुलीसाठी गहाण घेणारा गहाणदारास नोटीस देऊन स्वतः अगर न्यायालयामार्फत तिची विक्री करू शकतो. मात्र विक्रीची रक्कम जास्त आल्यास ती गहाणदारास परत करावी लागते. गहाण घेणाऱ्यास मुद्दल, त्यावरील व्याज व तिच्या संरक्षणासाठी झालेला खर्चही वसूल करता येतो. गहाण ठेवणाऱ्यास गहाणदाराच्या अन्य कर्जासाठी जंगम मालमत्ता स्वतःकडे ठेवता येत नाही. जंगम गहाणबाबतच्या सर्व तरतुदी भारतीय संविदा अधिनियमाच्या १७२ ते १७९ या कलमांत आहेत.

गहाण व नोंदणी: विधिमान्यता मिळविण्यासाठी १०० रूपयांवरील रकमेचा गहाण व्यवहार नोंदवणे जरूरीचे असते पण १०० रूपयांखालील व्यवहारांत गहाण मिळकतीचा ताबा गहाण घेणाऱ्यास द्यावा लागतो. मात्र साध्या गहाणास १०० रूपयांखालील रकमेससुद्धा नोंदणीची आवश्यकता असते. विश्वास किंवा समन्याय गहाणास नोंदणीची जरूरी नाही.

कायद्याने गहाण स्वरूपाचे हस्तांतर हे कायमचे गहाण स्वरूपाचेच राहिले असे मानले आहे. त्यांमुळे गहाण-विमोचनाच्या हक्काला बाध असणाऱ्या शर्ती अवैध समजल्या जातात. सामान्यतः कर्जाची भागशः फेड करून गहाण मिळकतीचे भागशः विमोचन करता येत नाही.

हक्क व कर्तव्ये : गहाण ठेवणाऱ्याचे किंवा गहाण घेणाऱ्याचे हक्क व कर्तव्ये ही त्या गहाणाच्या प्रकार आणि गहाणाच्या कराराच्या अटींवर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे गहाणप्रकारामध्ये मिळकतीचा ताबा ज्याच्याकडे असेल, त्याच्यावर त्या मिळकतीचा नाश न होता ती योग्य स्थितीत राहील, याबद्दल काळजी घेण्याची जबाबदारी असते. तसेच मिळकतीचा सारा, भाडे, विम्याचा हप्ता वगैरे देणी वेळेवर देण्याची व तिचे भाडे, उत्पन्न विनाकसूर गोळा करण्याची जबाबदारी असते. मिळकतीचा ताबा गहाण ठेवणाऱ्याकडे असल्यास त्याच्यावर वरील बाबींशिवाय मिळकत जर आधी गहाण ठेवली असेल, तर आधीच्या गहाणाते व्याज वेळच्या वेळी देण्याची व मुद्दलफेड करण्याची जबाबदारी असते. मिळकतीचा ताबा गहाण घेणाऱ्याकडे असल्यास वरील बाबींव्यतिरिक्त त्याच्यावर मिळकत जर आधी गहाण ठेवली असेल, तर आधीच्या गहाणाचे व्याज वेळच्या वेळी देण्याची आणि मुद्दलफेड करण्याची त्याचप्रमाणे मिळकतीची जरूर ती दुरूस्ती करण्याची, मिळकतीबाबत जमाखर्च ठेवून तो गहाण ठेवणाराला दाखविण्याची व कर्जाची फेड झाल्यावर मिळकतीचा ताबा गहाण ठेवणाऱ्यास देण्याची जबाबदारी असते. गहाण ठेवणाऱ्यास गहाण मिळकतीवरील त्याची मालकी निर्वेध असण्याची जबाबदारी आहे व तशी त्याची मालकी नाशाबित झाल्यास गहाण घेणाऱ्यास त्याबाबत नुकसान मागण्याचा हक्क आहे. गहाण ठेवणाऱ्याच्या मालकी हक्काचा पाठपुरावा करण्यासाठी व त्याच्याविरूद्ध स्वतःचा हक्क शाबित करण्यासाठी झालेला खर्च वसूल करण्याचा हक्क गहाण घेणाऱ्यास असतो. विमोचनानंतर गहाण-मिळकतीचा ताबा, गहाण-खतादी हक्कदर्शकपत्रे गहाण घेणाऱ्याकडून परत मिळविण्याचा हक्क गहाण ठेवणाऱ्यास असतो.

तारणाची क्रमरचना : (मार्शलिंग). जेव्हा गहाण ठेवणारा, त्याची मिळकत किंवा अनेक मिळकती निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या गहाण घेणाऱ्यांकडे गहाण टाकतो. त्यावेळी गहाण घेणाऱ्याचे हक्क त्यांच्या व्यवहाराच्या कालक्रमाप्रमाणे अस्तित्वात येतात. त्याचप्रमाणे पहिल्या गहाणदाराच्या हक्कास बाध न येता त्याच्यानंतर मिळकत गहाण घेणाऱ्यास स्वतःकडे गहाण न ठेवल्या गेलेल्या मिळकतीतूनही, तिची व्याप्ती असेल तेथपर्यंत, गहाणाची फेड करण्याचा हक्क विधिमान्य आहे.

सरकारी धोरणाचा परिणाम: गहाणाचे गैरकायदेशीर व्यवहार होऊन सामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे आढळल्याने महाराष्ट्रात डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट्स रिलीफ ॲक्ट १८७९ व बॉम्बे ॲग्रिकल्चरल डेटर्स रिलीफ ॲक्ट १९३९ अस्तित्वात आले. या कायद्यांचा बराच परिणाम स्थावर गहाणावर झाला शिवाय सावकारी नियंत्रण कायदा अस्तित्वात आल्याने त्याचा जंगम गहाणावर प्रामुख्याने परिणाम झाला. शासनही सध्या शेतकऱ्यांना त्यांची मालमत्ता गहाण ठेवून तगाई देते. भूतारण बँका व अन्य बँकाही गरजूंना कर्जे देतात. खाजगी गहाणाच्या व्यवहारांवर याचा फार मोठा परिणाम झाला आहे.

नाईक, सु. व.