संयुक्त सार्वभौमत्व : (कंडोमिनिअम). सामान्यत: विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर एकाच सत्तेचे प्रभुत्व असते. अपवादात्मक परिस्थितीत एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिक त्या क्षेत्रांबाहेरच्या सत्ता आपले प्रभुत्व गाजवतात. दोन वंशाचे अगर देशमूलाचे नागरिक त्या क्षेत्रात राहत असतील, तर आपापल्या नागरिकांचे रक्षण व नियंत्रण यांसाठी अशी व्यवस्था करण्यात येते. अशा प्रदेशावरील भौगोलिक सत्ता मात्र दोन किंवा अधिक राज्ये संयुक्तपणे उपभोगतात.

आंतरराष्ट्रीय कायदयात उपयोगात येणारी ही संज्ञा काही देशांत (उदा., कॅनडा) घराच्या मालकीसंदर्भातही वापरतात. अशा व्यवस्थेत एखादे अपार्टमेंट वापरणाऱ्याची मालकी व्यक्तिश: असते परंतु त्यातील सामुदायिक सज्जे, समोरची हिरवळ, मोकळी जागा हे सर्व त्या इमारतींच्या रहिवाशांनी मिळून स्थापन केलेल्या संयुक्त संस्थेच्या मालकीचे असते. चपळगावकर, नरेंद्र