मृगळ : हा सायप्रिनिडी या कुलातील मासा आहे. याचे शास्त्रीय नाव सिऱ्हिनस मृगाला हे आहे. हा भारतात पंजाब, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि दख्खन या भागांतल्या नद्यांत व तळ्यांत आढळतो. याचे रोहू (लेबिओ रोहिटा) माशाशी पुष्कळ साम्य आहे. याची लांबी सु. ५६ ते ६६ सेंमी. आणि वजन सु. १० किग्रॅ. पर्यंत असू शकते. एवढी वाढ होण्यास त्यास ४ ते ६ वर्षे लागतात.
मुळच्या शरीरीचा रंग रुपेरी असतो. पाठ काळसर करड्या रंगाची असून तिच्यावर तांबूस झाक असते. नर एक वर्षाचा झाला म्हणजे वयात येतो, तर मादीस यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. यांचा विणीचा हंगाम साधारण पावसाळ्यापूर्वी सुरू होतो व जुलै ते सप्टेंबरपर्यंत असतो. नदीस आलेल्या पुराच्या पाण्यात मादी अंडी घालते. पावसाचे वाहते पाणी सोडून तळ्यातील पाणी खेळत ठेवल्यास व नंतर त्यात पक्व (प्रजननक्षम) नरमाद्या सोडल्यास यांचे चांगल्या प्रकारे प्रजनन होते. असे प्रजनन मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम बंगाल वगैरे भागांत करण्यात येऊ लागले आहे. दोन किग्रॅ. वजनाच्या मादीत सु. २ लाख अंडी असू शकतात परंतु ही सर्वच पाण्यात सोडली जातात किंवा फलित होतात असे नाही. सोडलेली व फलित झालेली अंडी पाण्याबरोबर वाहत जातात व १८ ते २० तासांत त्यांतून सूक्ष्म आकाराची पिले बाहेर पडतात. ही पिले पकडून तळ्यात सोडणे व तेथे ती वाढविणे हाही मत्स्योद्योगाचा एक भाग आहे.
तळाशी असणारे सूक्ष्मजीव, शेवाळ इ. यांचे खाद्य होय. तीळ, भुईमुगाची पेंड यांसारखे वनस्पतिज पदार्थही अन्न म्हणून या माशास चालतात. हा मुख्यतः वनस्पतिज खाद्य व सूक्ष्मजीवांवर जगत असल्यामुळे यापासून इतर माशांची हानी होत नाही. कटला व रोहू अशा मत्स्यसंवर्धनास उपयोगी असणाऱ्या माशांइतकेच मृगळ मत्स्यसंवर्धन व खाद्य म्हणून महत्त्वाचा आहे.
कुलकर्णी, चं. वि.
“