मूकनाट्य : (पँटोमाइम). प्राचीन काळापासून चालत आलेला एक नाटककार. ‘पँटोमिमस’ या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ सर्व तऱ्हेच्या भूमिका करणारा अथवा सर्व माणसांच्या किंवा पशुपक्ष्यांच्या नकला करणारा, असा आहे. रोमन साम्राज्यकाळी नाट्यगृहात करमणूक करणारा नट आणि त्याचा खेळ यांना उद्देशून ही संज्ञा वापरली जाई. केवळ शारीरिक हालचाली, अंगविक्षेप, हातवारे यांच्या साहाय्याने पण मूकपणाने एखादी पौराणिक कथा आणि त्या कथेतील सर्व पात्रे यांचे दर्शन घडविणे म्हणजे मूकनाट्य होय. रोमन सम्राट ऑगस्टन (इ. स. पू. पहिले शतक) याच्या प्रोत्साहनाने रोमन मूकनाट्याचा पहिला प्रयोग इ. स. पू. २२ या वर्षी करण्यात आला. त्या काळात पायलेडीस व बॅथिलस हे अनुक्रमे शोकात्म व दुःखात्म मूकनाट्याचे नट प्रसिद्ध होते. ते प्राणिकथा पूर्णपणे साकार करीत सर्व पात्रांची सोंगे वठवीत. मूकनाट्याच्या या प्रयोगाला काही वेळेस ⇨ समूहगान (कोरस) आणि वाद्यसंगीत यांची साथ असे. ग्रीक रंगभूमीवर टेलेस्टेस या मूकनाट्य-कलावंताची योजना एस्किलसने आपल्या सेव्हन अगेन्स्ट थीब्ज या नाटकाच्या प्रयोगांत केली होती (इ. स. पू. ४६७).

साम्‌सातचा रहिवासी लूशन (इ. स. १२५–१९०) याने द साल्तातिओने नावाचा एक संवादात्मक ग्रंथ मूकनाट्याच्या प्रशस्तिपर लिहिला आहे. त्याच्या मते, मूकनाट्याच्या अभिनेत्याला पुढील गुण आवश्यक असतात. (१) पौराणिक कथा आणि संगीत यांचे सखोल ज्ञान (२) उत्कृष्ट स्मरणशक्ती (३) पराकोटीची संवेदनक्षमता (४) कमावलेल्या शरीराची ताकद आणि तितकाच अंगाचा लवचिकपणा असलेले अत्यंत सुडौल शरीर. लूशनने जगाची उत्पत्ती ते क्लीओपात्राची नाटकी भाषणे अशा अनेक विषयांची मूकनाट्याला उपयुक्त अशी यादीच दिली आहे.

या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन इंग्लंडमध्ये मूकनाट्य अवतरले. ‘ड्रुरी लेन’ नाट्यगृहाचा नृत्याचार्य जॉन वीव्हर याने इ. स. १७०२ मध्ये मूकनाट्याचा पहिला प्रयोग केला. दुसरा प्रयोग १७०६ मध्ये ‘लव्हज् ऑफ मार्स् अँन्ड व्हीनस्’ या विषयावरचा होता. वीव्हरच्या प्रयोगाचे स्वरुप नृत्यनाट्याप्रमाणे होते [⟶ बॅले]. रोमन मूकनाट्याप्रमाणे हा एकपात्री प्रयोग [⟶ बहुरूपी खेळ] नव्हता तरी ‘पँटोमाइम’ म्हणूनच ते प्रसिद्धी पावले. इ. स. १७५८ मध्ये ग्रिमाल्डीने काही प्रयोग केले. अठराव्या शतकापर्यंत चाललेल्या या परंपरेत ‘लिकन्स् इन् फील्ड्’ या नाट्यगृहात जॉन रिचने केलेले प्रयोग विशेष महत्त्वाचे होते. त्याने अभिजात कथाविषयक आणि हास्यास्फोटक प्रसंग यांचे मिश्रण व पादान्तयमकाच्या श्लोकांत रचलेल्या परिकथा, यांचा उपयोग केला. तसेच जीवनातील विनोदी प्रसंग, हास्याकारक गीते आणि नाच यांवर आधारलेल्या कृती व लोकप्रिय गीते इत्यादींचाही वापर केला.

आधुनिक काळातही विशेषतः नाताळच्या सणात मूकनाट्याचे प्रयोग होत असतात. त्यांचे स्वरूप मात्र विनोदी नृत्यनाट्यासारखे असते. बहुधा परिकथेतला नायक आणि त्याची आई ही पात्रे त्यांत असतात नायकाचे सोंग एखादी मुलगी घेते तर आईची भूमिका एखादा लोकप्रिय विनोदी नट करतो. इतर कथांतून पँटालून, हार्लोक्लिन्, कोलंबाईन् ही पात्रे असतात.

इटलीच्या ‘कॉलेदिया देल आर्ते’ या नाट्यप्रकारात अनेक प्रसंग असे असतात की जे मूक अभिनयानेच व्यक्त करावे लागतात.

फ्रान्समध्ये मूकनाट्याची परिणती बॅलेच्या रूपाने झाल्याचे दिसते. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत ‘बॅले’ प्रकार खूपच लोकप्रिय होता. आधुनिक काळातील मूकनाट्याचा सर्वश्रेष्ठ फ्रेंच अभिनेता मार्सो मार्सेल हा एकपात्री प्रयोग करतो. कोणाही व्यक्तीचे किंवा कशाचेही अनुकरण करावे, ते मार्सेनेच अशी त्याची ख्याती आहे.

भारतातील मूकनाट्याचे स्वरूप सांगणे कठीण आहे परंतु हावभाव, हालचाली यांनीच संवादाशिवाय आणि एक किंवा अनेक पात्रांद्वारे, एखाद्या पौराणिक किंवा लोककथेचे नाट्यदर्शन घडविणे हे जर मूकनाट्याचे तत्त्व मानले, तर संस्कृत नाट्याच्या आरंभकाळी, भरताने अमृतमंथन आणि त्रिपुरदाह नामक ज्या ‘अनुकृती’ करून दाखविल्याचा निर्देश नाट्यशास्त्रात आहे, त्यांचे आणि पतंजलीने उल्लेखिलेल्या कंसवधबलिबंध या नाट्यप्रयोगांचे स्वरूपही मूकनाट्याचे दिसते. या प्रयोगांत संवाद नव्हते हालचाली, हातवारे, भावदर्शन यांनीच कथा साकार होई. यांखेरीज, संस्कृत नाट्याच्या इतिहासात नेपथ्य आणि पडदा यांचा वापर उशिरा (दहाव्या शतकापासून) झाल्याने, संवाद असलेल्या नाट्यांतही रथगती, रथारोहण, प्रवास, अग्निदाह, युद्ध असे प्रसंग व कथेतील विविध स्थले आणि कालाचे तसेच ऋतूंचे संदर्भ इत्यादींची कल्पना, शाब्दिक वर्णन सोडल्यास, मूक व आंगिक अभिनयानेच करून द्यावी लागे.

त्याचप्रमाणे पुढील काळातील नृत्य-गीत-प्रधान उपरूपकात आणि भरतनाट्यम् या नृत्यप्रकारात कृष्णाच्या बालजीवनातील लोणी चोरून खाण्यासारखे प्रसंग दाखविताना नृत्यात्मक हालचाली आणि आंगिक अभिनय यांच्या रूपाने मूकनाट्याचाच अवलंब करावा लागतो.

लोकप्रिय पातळीवर सर्कशीतील विदूषकांची भूमिका मूकनाट्याच्या प्रकारात येते. सचिन शंकर यांनी सादर केलेले शिवाजीची आग्र्याहून सुटका हे नृत्यनाट्य (बॅले) व राष्ट्र सेवा दलाने शिवराज्यरोहणाचेघडविलेले नाट्यदर्शनही मूकनाट्याचीच उदाहरणे होत. अनुकृतीचा उपयोग नाट्यप्रयोगांत आजही होत आहे परंतु यूरोप वा इंग्लंडप्रमाणे भारतात केवळ मूकनाट्य तेवढे लोकप्रिय असल्याचे दिसत नाही.

संदर्भ : 1. Bieber, Maragarete, The History of the Greek and The Roman Theatre, Oxford, 1950.

             2. Billington, Michael, Ed. Performing Arts, London, 1980.

             3. Broadbent, R. J. A History of Pantomime, New York, 1901.

             4. Weaver, J. The History of the Mimes and The Pantomimes, 1728.

             5. Wilson, A. E. The Story of Pantomime, 1950.

भट, गो. के.